कार्यक्रम रंगात आला होता. कार्यक्रम रंगात ओला होता. प्रेक्षक मंडळी चिंब झाली होती. वर्षाऋतूवर आधारित गीतांचा कार्यक्रम चालू होता. सरकारी कार्यालयातील एका प्रशस्त हॉलमध्ये कार्यक्रम चालू होता. कर्मचारी मंडळी आटोपशीर बसली होती. सर्वात पुढे सर्वात सीनियर अधिकारी बसले होते. तल्लीन होवून माना डोलवत होते. त्यांच्या मानेच्या हेलकाव्यांबरहुकूम बऱ्याच माना हिंदकळल्या जात होत्या. काही स्वयंभूपणे डोलत होत्या, तर काही स्वयंभूपणे डोलत नव्हत्या. स्त्रियांसाठी बसण्याची वेगळी रांग होती. यातही सर्वात पुढे सर्वात सीनियर अधिकाऱ्याची सर्वात बायको बसली होती. बाकी इतर बायका सीनिऑरिटीच्या किंवा धैर्यशीलतेच्या किंवा उत्साहाच्या किंवा रसिकतेच्या किंवा भाबडेपणाच्या उतरत्या क्रमानुसार मागे मागे बसत गेल्या होत्या. गाणारणीच्या गळ्यातून सरी बरसत होत्या सुरांच्या. गाणाराही तानापिही झाला होता. साथ देणारी मंडळीही एकजीव झाली होती निपाजा.
निवृत्ती मागे कोपऱ्यात बसला होता आणि नव्हता. त्याच्याबिनइयत्तेच्या तुकड्या झाल्या होत्या. एक तुकडी गाणी ऐकत होती, मास्तर नसलेल्या तुकडीप्रमाणे गदारोळ करीत, तर दुसरी तुकडी आजूबाजूच्यांचं बारीक निरीक्षण करीत होती. ही ’अ’ तुकडी होती, जी नेहमीप्रमाणे आपोआपच कामाला लागली होती. ’फ’ तुकडी रेकॉर्डरूममध्ये गोंधाळ घालत होती. सकाळीच तो त्याच्या ऑफिसातल्या रेकॉर्डरूममध्ये गेला होता – इयत्तेचा आणि बिनतुकडीचा होवून. खिन्न आणि अस्वस्थ झाला होता देहासहित. देहापुरता बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर परत तुकड्या तुकड्या पडल्या, पण एक हट्टी आणि आडमुठी तुकडी आतच राहिली होती. आत्ता येताना इतर तुकड्यांना गोळा करत तो आला देहनिशी, पण ती तुकडी तशीच तिकडं.
निवृत्ती त्या सरकारी कार्यालयात नुकताच अधिकारी म्हणून लागला होता. उत्साहानिशी, बेतांच्या पुडक्यानिशी तो लागला, पण हळूहळू लागायला लागलं. कपचे उडायला लागले, तसा त्याच्या मध्यवर्ती चिवट आणि जिवट जीवनेच्छेच्या जोरावर या कपच्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्नही आपोआप त्याच्यात सुरू झाला होता. हे सगळं अर्थात त्याला नवीन नव्हतं – कपचे उडवून घेणं आणि परत कोवळेपणानं नव्या गोष्टी करत राहाणं. हे मुंगीसारखं भिंतीवरून पडपडून परंतू झडझडून परत परत चढत राहणं, परत परत करत राहणं.
पण आत्ता त्याच्या एकाग्रतेच्या अवयवाला मुंग्या आल्या होत्या. हलवून हलवून तो घालवू पाहात होता, पण निरुपाय. हिंदीत मुंग्या येणे यास ’सो जाना’ असे म्हणतात. त्याप्रमाणे एकाग्रतेचा अवयव हिंदीत झोपी गेला होता. गाणं ऐकणाऱ्या तुकडीतली पोरं गोंधळ घालत होती. मध्येच अचानक निमिषार्धात त्याचा रेझोनन्स व्हायचा मंचावरील इंद्रधनुष्याच्या सूरपाझराशी. त्यावेळी क्षणार्धात तो इयत्तेचा आणि बिनतुकडीचा व्हायचा, दणादण सगळ्या तुकड्यांचे आयकॉन अदृश्य माऊसद्वारा ड्रॅग केले जाऊन एकाच तुकडीत घातले जायचे. पण परत थोड्याच वेळात त्याचा SKINSAVER चालू व्हायचा.
अचानक तुकड्यातुकड्यांमध्ये लहर पसरत गेली सुट्टीच्या अफवेच्या वेगाने. तसतसे सगळ्या तुकड्यांमध्ये अचानक सुरू झाले विविध वर्ग कदमताल. एका तुकडीत एक मास्तर आले संपूर्ण विलायती पोषाखात. एकदम कडक, एकदम शिस्तशीर, एकदम पाश्चिमात्य. त्यांच्या हालचालीच्या रेषा रेझरच्या पात्यासारख्या, त्यांचं बोलणं एकदम नेमकं, कणभरही शब्द वाया नाही, कणभर वावगा नाही. त्यांनी सुरू केला तास भारतीय कार्यालयातील कार्यपध्दतीवरचा. ते म्हणाले, “या भारतीय हरामखोरांनी मातेरं केलंय सगळ्या ब्यूरॉक्रसीच्या अत्यावश्यक तत्त्वांचं. यांची ही भारतीयपणाची कोंबडी घालत असते नंगानाच हारीनं मांडलेल्या सगळ्या तत्त्वनियमांवर.” ते तांबडेलाल झाले होते संतापाने, आणि अत्यंत तुच्छतेने पाहात होते मंचावरील गायकगायकिणीकडे आणि जमलेल्या श्रोतृवृंदाकडे. “ हा एक फसलेला प्रयोग आहे असे मला अत्यंत दुःखाने म्हणावेसे वाटते,” असे म्हणत त्यांनी हळुवारपणे खिशातला रुमाल काढून डोळे टिपले. “ खरंतर आमच्या हवामानात तयार केलेलं हे रोपटं इथं लावताना किती हुरूप आला होता,” असं ते गदगदून म्हणाले. परत त्यांच्या चेहेऱ्यावर कठोरपणाच्या रेषा उमटल्या आणि त्यांच्या बोलण्याचा आसूड तडतडायला लागला. “ अवैयक्तिकपणा हा एक महत्त्वाचा खांब आहे ब्यूरॉक्रसीचा. एक महत्त्वाची संकल्पना, जी जीवनरसासारखी भिनली पाहिजे संघटनेत, कर्मचाऱ्यांत, अधिकाऱ्यांत. पण यांनी इथं पूर्ण उलटं करून ठेवलंय. वैयक्तिकपणा यांच्यासाठी प्राणवायूसारखा. कामाशी निष्ठा नाही. कामचुकारपणाला शिक्षा नाही. संपूर्ण सरंजामी जीवनरस सळसळतोय संघटनाशरीरात. गुणाला मोल नाही, पदाला आहे – वर्णव्यवस्थेसमान, ज्येष्ठांची दहशत आहे, हुकूमत आहे, भीती आहे – संयुक्त कुटुंबासमान.”
कमान. इंद्रधनुष्यासमान रसिकतेची, हॉलभर. सर्वात सीनियर तर बुडूनच गेले होते सूरसागरात. सगळे एकवर्ग झाले होते तुकडीहीन. फक्त निवृत्तीच होता वर्गाबाहेर वेगवेगळ्या तुकड्या सांभाळत. आंदोळत. क्लान्त. भ्रान्त.
एका तुकडीत वर्ग सुरू झाला रेकॉर्डकीपिंग या विषयावरती. यात मास्तर नव्हते. मल्टिमीडियाच्या मदतीनं संगणकाला जोडलेल्या प्रोजेक्टरमार्फत समोर पडद्यावर झरझर चित्रं. व्हिडिओक्लिपिंग्ज, आकडेवाऱ्या वगैरे उमटत होत्या. आदिम अवस्थेत असतानापासून ते आत्तापर्यंत हे शास्त्र कसकसं प्रगत होत गेलं हे उलगडवलं जात होतं. ख्रिस्तपूर्व १८००० ते २०००० साली आदिम माणसाने गुहांमध्ये चित्ररूपाने नोंदी करून ठेवल्या ही रेकॉर्डकीपिंगची आद्य सुरुवात. ख्रिस्तपूर्व ३५०० ते ३२५० साली सुमेरियनांनी दगड, धातू, मेण इत्यादींवर चित्रलिपीद्वारे नोंदी केल्या. ख्रिस्तपूर्व ५व्या शतकात ग्रीक, रोमन व इजिप्शियनांनी पॅपिरस या वनस्पतीचा लिहिण्यासाठी वापर केला. ख्रिस्तपूर्व १०५ साली चिनी लोकांनी कागदाचा वापर रेकॉर्डसाठी केला. नंतर लाकडी ठोकळ्याद्वारे त्यावर मुद्रण केले. इसवीसन ११२५ साली स्पेनमध्ये पहिली कागद बनवण्याची गिरणी सुरू झाली. इसवीसन १४५० साली गटेनबर्गने धातूच्या टाइपाची प्रिंटिंग प्रेस सुरू केली. १८३१ साली लुई दा गुरे याने पहिला फोटोग्राफ बनवला. इ.स. १८३७ साली सॅम्युएल मोर्सने पहिला टेलिग्राफ तयार केला.१८७१ साली रेने ड्रॅगनने फ्रान्स- रशिया युध्दात पॅरिसमधील ज्ञानभांडाराचे रक्षण करण्यासाठी मायक्रोफिल्मचा शोध लावला. १८७३ साली स्कोल्स आणि ग्लिडन यांनी टाइपरायटरचा शोध लावला. १८७६ साली अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने टेलिफोनचा शोध लावला. १९०० साली अॅनॉलॉग संगणक विकसित झाला आणि १९८४ साली पहिला सीडीरॉम वापरात आला. आत्ता २००३ साली रेकॉर्डकीपिंगचे काम अत्यंत प्रगत आहे. आणि पूर्वीच्या या शोधांच्या संशोधनाच्या बळावर आता अत्यंत गुंतागुंतीची व प्रचंड संख्येची माहिती अतिशय कमी जागेत व कमी ऊर्जेत साठवली जाऊ शकते. माहिती उलगडत होती. य सर्व संशोधनांसाठी आयुष्यच्या आयुष्य खर्ची घालणाऱ्या ध्यासवान लोकांची चरित्रे विशद होत होती.
वर्गात पुढे बसलेल्या काहींचे डोळे पाझरत होते. शरीरे थरथरत होती. रेकॉर्डकीपिंगच्या शास्त्रात भर घालण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्यांबद्दल त्यांना अनावर आपुलकी वाटत होती. थिजून गेले होते ते.
भिजून गेले होते ते, स्वरांच्या चिंब वर्षावात. एकापाठोपाठ एक सुंदर वर्षागीते सादर होत होती. मंडळी तल्लीन झाली होती. भिजून गेली होती. निवृत्तीच तेव्हढा होता कोरडा. त्याला ऐकू येत होता ओरडा खोंडाचा.
एका तुकडीत वर्गातला फळा काळानिळा होत गेला आणि प्रसरण पावत गेला चहूबाजूंनी. नंतर तो फळा आडवा झाला मंचासारखा. नंतर एका जोमदार आणि निरागस खोंडाला घेऊन आले पाचसहाजण त्या फळ्यावर. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “ आजचा धडा आता प्रत्यक्ष फळ्यावरच पाहा. खोंडाची त्वचा थरथरत होती तरंगत बेसावध. त्याची अणकुचीदार शिंगे घुसली होती हवेत आणि तो उभा होता तल्लख, तजेलदार आणि उत्सुक.इतक्यात त्या सगळ्यांनी सराईत हालचाली केल्या आणि पायात कासऱ्यांचे तिढे घालून त्याचे ते बेलगाम धूड फळ्यावर कोसळवले. प्रचंड आवाज झाला. खोंड फुसांडले. त्यांनी निर्विकारपणे त्याचे चारही पाय बांधले, एकाने त्याच्या सुकुमार तोंडावर पायाचा दाब दिला. एकाने शिंगे पकडली, दोघांनी पाय दाबले. उरलेल्याने विडी शिलगावली. संथपणे पिशवीतून छोट्या जाडीचे दोर काढले. दुसऱ्याच्या मदतीने खोंडाच्या आंडाला हात घातला तसे खोंड चवताळले. ठिकठिकाणच्यांनी ठिकठिकाणी जोराने दाबून धरले, आणि विडी पिणाऱ्याने आंडाभोवती दोऱ्या आवळ्ल्या आणि पिळायला सुरुवात केली आणि खोंडाच्या चित्कारांनी वर्ग दणाणला. भिंती धडधडल्या. विडी पिणारा पिळे वळत गेला. खोंडाचा आव गळत गेला. टपटपला फेस होऊन तोंडाचा. विडी पिणारा म्हणाला, “ झाल्या कान्या वळून. साधला कार्यभाग. आला हा आपल्यात.” क्षणात त्या माणसांचे झाले रूपांतर बैलांमध्ये. बोथट शिंगांच्या, झुली बाळगणाऱ्या यथेच्छ अधिकारपदाच्या, डोलावत सूचनेबरहुकूम माना.
ताना. सुरेख ताना घेत होता गाणारा. करत होता आळवणी सुरांची. वीणेच्या तारेसारखे झंकारत होते त्याचे शरीर. देहभान हरपले होते. करपले होते चित्त निवृत्तीचे.
एका तुकडीत डॉक्युमेंटरी सुरू झाली होती. विषय होता – ’ सदानंद आत्मलुब्धे’ या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील विविध फाइल्स, नागरिकांकडून जमा झालेल्या गेल्या १०-१२ वर्षातील माहितीचा दस्तऐवज आणि इतर कार्यालयीन कागदपत्रे इत्यादी रेकॉर्डसच्या व्यवस्थेची स्थिती. पडद्यावर पहिलीच फ्रेम उमटली ती आत्मलुब्धेच्या केबिनच्या दारावर एकाच खिळ्यावर लोंबकळणाऱ्या नावाच्या पाटीची. नंतर मग एकाच खोलीत युक्तीने व सुलभ हाताळणी करता येईल अशा पध्दतीने रचता येईल असे रेकॉर्ड एकूण चार ठिकाणच्या चार खोल्यात कसे अस्ताव्यस्त व दारुण अवस्थेत आहे हे अतिशय सहानुभूतिशून्य निर्दयतेने दाखवले जाऊ लागले. खरेतर त्यांच्याकडे केवळ सातशे नागरिकांचेच रेकॉर्ड जतन करावयाचे होते. परंतू ते सगळे अशा अनाकलनीय अव्यवस्थेत अरचले गेले होते की एखाद्या व्यक्तीचे सलग पाच वर्षांचे रेकॉर्ड शोधायचे झाल्यास सात तास तरी खरचले जातील. एका खोलीत जुन्या अक्षरशः लगदा व्हायच्या मार्गावर असलेल्या फायली पसरलेल्या होत्या. खोलीत सर्वत्र धूळच धूळ होती. रेकॉर्डची इतकी वाईट स्थिती असूनही कर्मचारी मंडळी मात्र मजेच्या मनःस्थितीत होती. रेकॉर्डशी त्यांचा कसलाही बंध नव्हता. रेकॉर्डबाबत त्यांची वृत्ती स्थितप्रज्ञ होती. आत्मलुब्धेंना तर स्वतःतून फुर्सतच नव्हती. रेकॉर्डच्या चिखलात ते कमळासारखे फुलून आले होते.
एका तुकडीत भ्रष्टाचार या विषयावर सगळे गप्प होते.
एका तुकडीत कार्यक्षमता या विषयावर सगळे गप्प होते.
गाण्यात मात्र निवृत्तीशिवाय सगळेच गुंग होते.
एका तुकडीत समोर पांढऱ्याशुभ्र पडद्यावर गोठले होते दृश्य हॉलमधल्या मैफलीचे. क्षणार्धात चित्रातील सजीवांचे आणि निर्जीवांचे रूपांतर अॅनिमेशनमधे झाले. आणि त्यानंतर या अॅनिमेटेड वस्तू आणि जीव विविध वस्तूंमधे आणि जीवांमधे रूपांतरित व्हायला लागले. गायकासमोरील हार्मोनियमचे रूपांतर लगदा होऊ घातलेल्या, जुन्या- पुराण्या फायलींच्या ढिगात झाले. अॅनिमेटेड गाणारा अनलिमिटेड घोरू लागला. गाणारीच्या ताना घेतानाच्या हालचाली मंदावत गेल्या. तिच्या हातात अचानक लोकरीच्या धाग्यांचा मोठ्ठा गोल प्रकट झाला, दोन मोठ्या विणायच्या सुया प्रकट झाल्या आणि ती संथ गतीनं विणकाम करायला लागली. निवेदकाचे रूपांतर इरसाल शिपायात झाले, कानाला विडी लावून त्याने चकाट्या पिटायला सुरुवात केली. माइकचा सर्रकन सळसळणारा साप झाला, सापाचा वळवळणारा गांडूळ झाला, गांडुळाची बारीक कसर झाली आणि ती सर्रकन फायलींच्या चळणीत जाऊन बसली. तब्बलजीची थिरकणारी कुसरदार बोटे बोजड झाली. डग्ग्याची तंबाखूची डबी झाली, तबल्याची चुन्याची डबी झाली, तब्बलजी डब्बल झाला आणि तंबाखू मळीत बसला.
हसला. सगळा हॉल हसला निवेदकाच्या खुमासदार विनोदाला. अधूनमधून त्याची समयोचित विनोदांची, चुटक्यांची पखरण चालली होती. श्रोतृवर्ग हास्यरसाच्या अधूनमधून येणाऱ्या फवाऱ्यांनी ताजातवाना होत होता. सुरांच्या लहरी लहरी पसरल्या होत्या सर्वत्र. डुंबत होते सगळेच. निवृत्ती मात्र गटांगळ्या खात होता, फुटलेल्या जहाजासारखा तुकड्यातुकड्यांमधे. तुकड्यातुकड्यातले वर्ग सांभाळत. सहन करत.
(पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, जून २००५)