Tuesday 23 October 2018

किमया: अभिवाचनाचा सुंदर आणि अनोखा प्रयोग


नुकताच अतुल पेठे  आणि अमोल चाफळकर यांनी सादर केलेला ‘किमया’ नावाचा अभिवाचनाचा प्रयोग बघितला. ‘किमया’ या माधव आचवलांच्या पुस्तकातल्या निवडक मजकुराचे नाटकवाल्यांनी संगीत, प्रकाश, मांडणीशिल्प, प्रत्यक्ष वास्तू-अनुभव यांच्या सहाय्याने केलेले अनोखे वाचन असे या प्रयोगाचे वर्णन करता येईल. किमया हा १९६१ साली प्रकाशित झालेला माधव आचवलांच्या ललितनिबंधांचा संग्रह आहे. आपल्या रोजच्या जगण्यात सौंदर्याचा आस्वाद कसा घेतला जाऊ शकतो याचे सुंदर वर्णन या पुस्तकात आहे. रंग, गंध, अवकाश, घनाकार, प्रकाश, पाणी याबाबतच्या सौंदर्यपूर्ण संवेदनांच्या विसरलेल्या विश्वाची नव्याने ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. यातले लिखाण आसमंतातल्या सगळ्याच गोष्टींना जरी कवेत घेत असले तरी वास्तुकलेचा विचार यात प्राधान्याने आहे. अर्धशतकाहून जास्त काळापूर्वी लिहिलेले असले तरी हे पुस्तक आजही तितकेच प्रस्तुत आहे. 

किमया हे तसे वैचारिक गाभा असलेले ललित स्वरूपाचे लेखन आहे. सौन्दर्यविचार, जो अन्यथा वाचायला जड आणि कष्टप्रद वाटू शकतो, तो आचवलांनी भाषिक हुकमतीच्या जोरावर सुलभ आणि रसदार केला आहे. लिखित भाषेच्या मर्यादा लांघण्याचे त्यांचे प्रयत्न पुस्तकात दिसत राहतात. पुस्तकात एके ठिकाणी आचवल लिहितात, “पहिला झुरका आत ओढताना जो असा वर खेचलेला आवाज येतो, तो लिहायचा असला तर कसा लिहिणार? काय पण भाषा आहे? खरे म्हणजे आपण सरळ ओळीत का लिहितो? ओळीसुद्धा शब्दांच्या नादाबरोबर वर-खाली व्हायला हव्या.” अतुल पेठेंच्या प्रयोगात आचवलांचा विचार भाषेच्या बंधनातून मोकळा करत पोहोचवण्याचा एक उत्कृष्ट प्रयत्न आहे. सौंदर्यविचार व्यक्त करत असताना आचवलांना आवश्यक वाटलेली सुलभता आणि रसपूर्णता या प्रयोगात पुरेपूर खुलवलेली आहे. 


संदेशवहनाची मूळ पद्धत खरं तर मौखिकच होती. जे सांगायचं ते पुस्तकात छापणे आणि लोकांनी ते वाचणे ही सोयीसाठी केलेली तडजोड आहे. अर्थात या तडजोडीचे म्हणून खास असे काही फायदेही असणारच. जसे की छापलेले वाचताना, वाचक हवे तिथे विश्राम घेऊ शकतो, विचारात बुडू शकतो आणि अशा प्रकारे स्वतःच्या या स्वातंत्र्याचा उपयोग करून तो स्वतःपुरती त्या संहितेची वेगळीच निर्मिती करू शकतो. अभिवाचनाच्या या प्रयोगात  पुस्तकातला भाग हवा तसा जोडून घेऊन, हवे तसे पॉझेस घेऊन, हव्या त्या पद्धतीने संगीत, प्रकाश, वाचिक अभिनय, शारीर अभिनय आणि मांडणीशिल्प यांच्या सहाय्याने जेंव्हा संस्कारित केला जातो तेंव्हा एकीकडे आपण वाचक म्हणून असलेल्या स्वातंत्र्याला पारखे होतो पण दुसरीकडे आपल्याला त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळतं.



अभिवाचनाचा प्रयोग राहत्या वास्तूमध्ये केला गेला. यामागे लिखाणातल्या वास्तूविषयीच्या विचारांना अनुभवाने जोडण्याचे प्रयोजन दिसले. अभिवाचनात ठराविक ठिकाणी केलेला मांडणीशिल्पांचा वापरही परिणामकारक होता. नरेंद्र भिडेंचे संगीत-संयोजन देखिल सुरेख होते. हव्या त्या ठिकाणी, हवे तितकेच आणि संहितेच्या अंगच्या सौन्दर्याला खुलवणारे. 


सध्याच्या जीवनातील वेगामुळे, धकाधकी मुळे आणि कोलाहलामुळे खोलवरच्या आणि तरल अनुभूतींसाठी आणि विचारप्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या अवस्थेला आपण पारखे होत आहोत. या प्रयोगात मात्र श्रोत्यांना अलगदपणे त्या अवस्थेत नेण्याची किमया केली गेली. 
सौन्दर्यविचार समजावून घेण्याचा आनंद तसेच तो सुंदरपणे ग्रहण करण्याचा आनंद असा दुहेरी आनंद, किमया या पुस्तकाच्या थेट वाचनात असू शकतो. या दोन्ही आनंदांना नव्या मिती या प्रयोगात मिळतात. 

मला हा प्रयोग अनुभवताना निराळ्याच प्रकारचा आनंद झाला. दुर्मिळ आणि जपून ठेवावी अशी अनुभूती मिळाली.