ठार मारण्याच्या वेगवेगळ्या पध्दती असतात. वेगवेगळ्या समाजात, संस्कृतीत, देशात, प्रांतात त्या वेगवेगळ्या असतात. माणसांना ठार मारण्याचेच जर घेतले, तर असे दिसते की अमेरिकनांनी रेड इंडियनांच्या कत्तली केल्या. हाच पॅटर्न पुढे हिरोशिमा- नागासाकी, इराक युध्द, अफगणिस्तानावरचे हवाई हल्ले यामध्येही दिसून येतो.
मध्य आशियाई भागात प्रचलित असलेला सार्वजनिक आणि सविस्तर छ्ळ करून ठार मारणे, हा एक प्रकार झाला. शिवाय एस्किमोंमध्ये अगदी निराळाच, म्हाताऱ्या झालेल्या माणसांचा निर्लेपपणे अंत घडवण्याचा प्रकार असतोच. काही ठिकाणी ज्याला ठार मारायचंय त्याचाच ठार मारण्यासाठीही उपयोग केला जातो. भारतातल्या सतीप्रथेमधे हे दिसून येते.
माणसाच्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. ही नवनवोन्मेषशालिनी प्रतिभाच माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करते. या प्रतिभेने ठार मारण्याच्या पध्दतीत अनेक क्रांत्या घडवल्या. ठार मारण्याच्या पध्दती शोधण्यासाठीची माणसाच्या प्रतिभेची कोटिच्या कोटि उड्डाणे केवळ स्तिमित करणारी आहेत. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष न जातासुध्दा तिथे ठार मारण्याची प्रक्रिया घडवून आणणे हा एक प्रकार झाला. अणुबॉम्ब टाकणे, क्षेपणास्त्रे धाडणे, चालकविरहित विमानातून हल्ले करणे हे असेच एक उड्डाण म्हणता येईल.
जसजशी प्रगती होत गेली तसतसा माणसाला वेळ कमी पडू लागला. वेळ हा काही एक उत्पादन घडवण्यासाठी तरी असतो किंवा ते खर्च (कंझ्युम) करण्यासाठी तरी असतो हा समज रूढ झाल्यामुळे एखादी गोष्ट कमीतकमी वेळेत करणे यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे स्वाभाविकच कमीतकमी वेळात जास्तीत जास्त माणसे मारण्याचे एक मोठे आव्हान माणसापुढे निर्माण झाले. हे आव्हान माणसाने इतक्या समर्थपणे पेलले की काही सेकंदांमध्ये संपूर्ण पृथ्वी नष्ट करण्याइतपत कौशल्ये विकसित झाली. अशा प्रकारे सबंध पृथ्वीलाच धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच चाणाक्ष माणसांनी इतर ग्रहांवर मनुष्यवस्त्या करता येतील का या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. पण या प्रयत्नांबद्दल बोलणे हे विषयांतर होईल.
माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळा करणाऱ्या शिरपेचातला एक महत्त्वाचा तुरा म्हणजे तो आर्थिक प्राणी आहे हा. म्हणजे तो देवाणघेवाण करतो. गोष्टींचे मूल्य ठरवतो. चलने तयार करतो. या आर्थिकपणाचे माणसाने असे काही बुडबुडे तयार केले की थक्क होऊन जावे. देवाणघेवाणीचे माणसाने तयार केलेले जाळे इतके अफाट आहे की आता ते त्यालाही समजेनासे झाले. प्रगतीची ही गती नंतर इतकी वाढली की देवाणघेवाणीच्या या जाळ्याला artificial intelligence प्रदान करण्याचेही शोध काहीजणांनी लावले. असो. तर मुद्दा हा की ठार मारण्याच्या पध्दतींवरसुध्दा माणसाच्या या आर्थिकपणाचे परिणाम झाले. ठार मारण्याच्या साधनांचे केवळ कारखानेच नाही तर उद्योग निर्माण झाले. ठार मारण्याच्या साधनांच्या उद्योगांवर लाखोंचे रोजगार अवलंबून राहायला लागले.
तरीसुध्दा ठार मारण्याचे हे काही खरे प्रगत प्रकार नव्हेतच. ठार मारण्यातून जे साध्य करायचंय ते प्रत्यक्ष ठार न मारतासुध्दा घडवून आणणे हा यातला प्रगत प्रकार. जितका एखादा समाज किंवा संस्कृती जुनी तितका त्यांना हा प्रकार अवगत असण्याची शक्यता जास्त. अलीकडच्या काळातली नवी संस्कृती म्हणजे अमेरिकन लोकांची. या नवाड्यांनी अमेरिकेतल्या स्थानिक लोकांच्या थेट कत्तली केल्या. स्पॅनिश लोकांनी असाच माया संस्कृतीच्या लोकांचा (इंका) नायनाट केला. ठार मारण्याच्या इतिहासातले सगळ्यात अप्रगत आणि रानटी लोक म्हणजे युरोपियन मंडळी. तरी नंतर यांचीही थोडी प्रगती झाली. वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांचा थेट नाश न करता नाशातून जे साध्य करायचं ते जमवण्याचा प्रकार त्यांनी जगभर अवलंबला. ठिकठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या.
अर्थात या प्रगत प्रकारांमध्ये युरोपियनांचेही गुरू शोभण्याइतपत कौशल्ये भारतीयांकडे होती. फरक इतकाच की युरोपियन मंडळी जगभर हा प्रकार करण्यासाठी गेली. तर भारतीयांना जगभर जायची गरज नव्हती, सगळे जगच त्यांच्याकडे येत होते आणि पचवले जात होते. भारतात प्राचीनकाळी सध्याचे सगळेच प्रगत प्रकार अस्तित्वात होते असे मानणाऱ्या गौरववादी मंडळींनी हे कधी कसे मांडले नाही कोणास ठाऊक. पण प्राचीनकाळीच आपल्याइथे ठार मारण्याच्या पध्दतींमधला प्रगत प्रकार विकास पावला होता हे नक्की.
या प्रगत योजनेमध्ये एकट्यादुकट्या माणसांनाच नव्हे तर समूहच्या समूहांनाच फस्त करण्याच्या सुविधा होत्या. फस्त करण्याची पध्दत इतकी मस्त होती की फस्त करणारेही खूष आणि फस्त केले जाणारेही खूष. माणसाच्या शरीरामध्ये अन्नाचे साखरेमध्ये रूपांतर केले जावे तसे भारतात समूहांचे जाती आणि उपजातींमध्ये रूपांतर होत असे. रूपांतरणाचे आणि रूपांतरितांसाठीचे शास्त्र अतिशय बिनचूक रचले गेलेले होते. शास्त्र रचणाऱ्यांच्या या पध्दती अतिशय सफाईदार आणि बेमालूम होत्या. इतक्या की ठार मारल्या जाणाऱ्यांनाही कळू नये की ते ठार मारले गेले आहेत. ठार मारले जाण्याच्या तीव्रतेनुसार पिरॅमिड रचनाच तयार केलेली होती शास्त्रे रचणाऱ्यांनी.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या नानाविध गोष्टींसाठीच्या सविस्तर नियमावल्या प्रत्येक समूहासाठी अशा वेगवेगळ्या तयार असायच्या. इतकेच नव्हे, तर पूर्वजन्म आणि पुढचा जन्म अशी मजबूत बुचेही मारून ठेवली होती प्रत्येकाला. हे सगळं इतकं तपशीलवार आणि पर्फेक्ट होतं की विचार करण्याच्या अवयवास सुरुवातीपासूनच वाळवी लागावी. विचार करणे हा जो जिवंत राहण्यासाठीचा श्वास आहे तो शास्त्रे रचणाऱ्यांपुरताच उपलब्ध होता. बाकीची सगळी माणसे म्हणजे पेशीच जणू शास्त्रकारांच्या आत्म्याला शरीर पुरवण्यासाठीच्या.
विचार करण्याच्या विविध रीतींना आपल्या पोटात घ्यायचे, त्यांना गोठवून टाकायचे आणि तसेच गोठलेल्या स्वरूपात ठेवून त्यांच्यावर नियंत्रण मिळवायचे असेही एक अनोखे तंत्र शास्त्रकारांनी विकसित केले होते. ज्यू लोकांसारखी पृथ्वीवरची सगळ्यात तिरसट जमातसुध्दा शास्त्रकारांच्या या तडाख्यापासून बचावली नाही. त्यांच्या एका समूहाला कित्येक शतके एका भागात शनवारतेली या नावाने गोठवण्यात आलेले होते.
एका चोरामुळे दुसऱ्याचा काटा निघावा त्याप्रमाणे वसाहती करणाऱ्या युरोपियन ठारमाऱ्यांकडून या शास्त्रे रचणाऱ्या ठारमाऱ्यांना मोठ्ठाच धक्का बसला भारतात. त्यामुळेच फुले, शाहू, आंबेडकर इत्यादींसारख्या विचारांचा अवयव जागा असलेल्या आणि नाठार मंडळींनी वेळोवेळी युरोपियन ठारमाऱ्यांना शास्त्रवाल्या ठारमाऱ्यांविरोधात मदत केलेली दिसते.
ग्रीक आणि रोमनांच्या प्राचीन संस्कृतींमध्ये गुलामगिरीची अगदी परवाच्या शतकापर्यंत चालू राहिलेली ठार मारण्याची पध्दत विकसित पावलेली दिसते. पण हीसुध्दा तशी तितकी प्रगत मानता येणार नाहीच. कारण या पध्दतीत गुलामांना ते गुलाम आहेत ही जाणीव असे. वसाहतकार ठारमारे आणि भारतीय शास्त्रकार ठारमारे मात्र या बाबतीत फारच पोहोचलेले होते असे म्हणता येते.
अर्थात युरोपीय वसाहतकार ठारमारे हे ठार मारण्याच्या कलेतल्या प्रगत पायरीपर्यंत जरी पोहोचलेले असले, तरी भारतीय शास्त्रकारांइतका प्रगल्भपणा त्यांच्यात नव्हता असेच म्हणावे लागेल. या प्रगल्भपणाअभावीच त्यांची ठारमारकता दीडदोनशे वर्षांच्यावर टिकली नाही. भारतीय शास्त्रकारांची ठारमारकता मात्र जणू अमर आहे, अपौरुषेय आहे.
रामबाण ठारमारकतेसाठीच्या तंत्रांच्या आणि तत्त्वांच्या खाणीच भारतीय इतिहासात सापडू शकतात असे म्हणल्यास वावगे होणार नाही. एखाद्या ठिकाणी स्थानिकांशी कसलाही संबंध नसलेला तिसराच माणूस नेमून प्रशासन करवणे ही पध्दत ब्रिटिशांनी बसवली आणि अजूनही चालू आहे पोलादी पाचरासारखी. पण ही काही खरी नवी पध्दत नाही. अनेक शतकांपूर्वीच अशा पध्दतीचा वापर नियमितपणे होत असे.
पुराव्यादाखल भीमनाथ नावाच्या इसवीसनाच्या अकराव्या शतकाच्या अखेरीच्या चालुक्यनृपती सहावा विक्रमादित्य याच्या प्रशासकाची गोष्ट सांगता येईल. भीमनाथाची माहिती गणेशवाडी, ता. निलंगा, जि. उस्मानाबाद येथे सापडलेल्या संस्कृतभाषेतील शिलालेखात मिळते. या भीमनाथाचे गोत्र आत्रेय असे होते आणि त्याचे मूळ घराणे हिमालय पर्वतातील काश्मीर देशचे होते. या भीमनाथाचे उल्लेख इतरही अनेक कानडी शिलालेखात असून त्याप्रमाणे हा कुणीतरी अगदीच वरच्या दर्जाचा प्रशासकीय अधिकारी होता असे दिसते. त्याला कानडीतून मनेवर्गडे(गृहखात्यावरील अधीक्षक), पट्टळेकरण(प्रांतिक नोंदणी अधिकारी) अशीही विशेषणे लावलेली दिसतात. थोडक्यात, तो तेव्हाचा महाराष्ट्र काडरचा अगदीच सीनियर आय. ए. एस. अधिकारी होता असे म्हणता येईल. तर हे भीमनाथ गृहस्थ छानपैकी चालुक्यांच्या राज्यात प्रशासन चालवीत होते. हे काश्मीरातून मराठवाड्यात कसे आले कळत नाही, पण शिलालेखात त्यांची क्वालिफिकेशन्स वेदशास्त्रसंपन्न इत्यादी दिसतात. थोडक्यात हे शास्त्रकारांच्या योजनेचे सभासद होते असे म्हणता येईल. त्या काळची ठार जनता कानडी प्रेमळपणाने या भीमनाथाला भिवणय्या असेही संबोधे असे शिलालेखावरून दिसते.
जगभर जाणिवांना आकार देण्याचे काम पूर्वी धर्ममार्तंड मंडळी जेवढ्या प्रमाणात करीत तेवढ्या प्रमाणात हल्ली मार्केटिंगवाली मंडळी करीत असतात. यासाठी वापरली जाणारी बरीचशी तंत्रे आणि पध्दती फार पूर्वीपासून शास्त्रकार वापरत आले आहेत. वित्तबळाद्वारे स्थानिक ब्रॅन्ड्स विकत घेऊन आपलाच तेवढा ब्रॅन्ड कसा बलवत्तर राहील हे बघणे, त्यासाठी स्थानिक ब्रॅन्डही जिवंत ठेवून त्यास प्रभावळीमध्ये वापरणे हे जरी कोक, पेप्सीसारखे ब्रॅन्ड आत्ता करीत असले तरी शास्त्रकारांनी हा फॉर्म्युला पूर्वीच विकसित केलेला होता. विष्णू हा आपला ब्रॅन्ड बलवत्तर ठेवण्यासाठी विठ्ठल, बालाजी असे प्रचंड पॉप्युलर असे स्थानिक ब्रॅन्ड्स धर्मबळाद्वारे प्राप्त करून शास्त्रकारांनी वापरले. फरक इतकाच की अमेरिकेत ठार मारण्याच्या प्रक्रियेचा एन्ड प्रॉडक्ट उपभोक्ता म्हणून ओळखला जातो, तर पूर्वीच्या काळी तो भक्त म्हणून ओळखला जात असे. अमुक भक्त, तमुक भक्त वगैरे. विविध तंत्रांद्वारे जणिवांवर ठाण मांडणे आणि विचारांचा अवयव बंद पाडणे हे सूत्र मात्र दोन्ही ठिकाणी. आणि आद्य वापर अर्थातच भारतामध्ये.
तर अशा या ठार मारण्याच्या वेगवेगळ्या पध्दती. वरचेवर बदलत गेलेल्या आणि जसजश्या प्रगत होत जातील तसतश्या गुंतागुंतीच्या आणि गोंडस होत गेलेल्या. धादांत, प्रांजळ क्रौर्यापासून ते चकचकीत, शहाजोग आणि अदृश्य क्रौर्यापर्यंतच्या प्रवासाने प्रभावित झालेल्या.
माणूस समूहात राहू लागला तेव्हापासून त्याने सामूहिक गोष्टी नियंत्रित करण्यासाठीच्या पध्दती आणि व्यवस्था शोधल्या. या पध्दती आणि व्यवस्था अधिकाधिक गुंतागुंतीच्या आणि प्रबळ होत गेल्या. त्या वरचेवर जास्तच जगड्व्याळ आणि बलवत्तर होत हाताबाहेर चाललेल्या दिसतात. इतक्या की ठार मारण्याच्या पध्दतींची म्हणून सुरू झालेली गोष्ट, ठार मारणाऱ्या पध्दतींची गोष्ट होऊन संपावी.
(पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू)
No comments:
Post a Comment