Friday, 15 July 2011

काळाची गोष्ट

माणसाला गोष्ट सांगण्याची खोड प्राचीन काळापासून आहे. गोष्ट सांगणारे कायम असतातच कुणी कुणी. शिवाय गोष्ट ऐकणारेसुद्धा असतातच सांगणाऱ्यांपेक्षा जास्त. गोष्टी सांगणे आणि ऐकणे यातूनच संस्कृतीच्या विकासाला हातभार लागतो असेही म्हणतात.

तर असाच एक गोष्ट सांगणारा होता. तो म्हणाला, मला एक गोष्ट सांगायचीय. अगदी व्यवस्थित सांगायचीय. छानपैकी. नेहमीसारखी सरधोपट नाही सांगायचीय. आरंभ अंत घटना प्रसंग वगैरे. काहीतरी वेगळा प्रयोग करता येणार असेल तर तोही करून बघायचाय. माझ्या मनात खदखदतंय तेही बाहेर निघायला पाहिजे आणि दर्दी मंडळींकडून वाहवा पण मिळाली पाहिजे. गोष्ट तशी भारत देशातलीच म्हणायला पाहिजे. कारण माझा सगळा प्रत्यक्ष अनुभव भारत देशातलाच आहे. एकदा पायी बॉर्डर क्रॉस करून नेपाळात किंचित जाऊन आलो होतो. पण नेपाळ तरी काय भारतासारखाच म्हणायचा.

गोष्ट भारत देशात नेमकी कुठे घडली हे सांगणं तसं अवघड आहे. हे मान्य आहे की आपल्या भारत देशात ठिकाण सांगण्याला फार महत्त्व आहे. म्हणजे एखाद्या माणसाला पक्का ओळखण्यासाठी त्याची जात आणि त्याचे ठिकाण या दोन गोष्टी कंपल्सरी लागतातच. पण तरी मला ठिकाण सांगणं तसं अवघडच जातंय. कारण एकदा मी काश्मीरमधल्या पूঁछ जिल्ह्यातल्या झुलास नावाच्या अगदी सीमेवरच्या गावात फिरत होतो, तर मला मी अगदी माझ्या गावात फिरत असल्याचा भास होत होता. दार्जिलिंग जिल्ह्यातल्या एका डोंगराच्या कुशीत लपलेल्या दुर्गम खेड्यात मी नोकरीच्या निमित्ताने गेलो होतो तेव्हा तिथल्या मंडळींनी केलेला पाहुणचार आणि त्यांची वागणूक मला अगदी रोजच्या परिचयातली वाटली होती. हिंदी सिनेमातली गाणी, क्रिकेटचा खेळ, वडापिंपळाची झाडं, नद्या ओलांडताना नद्यांमध्ये प्रवाशांकडून टाकली जात असताना उन्हात चमकणारी नाणी या सगळ्यांप्रमाणेच इतरही अशा अनेक अदृश्य गोष्टी मला जाणवलेल्या आहेत ज्या भारतात सगळीकडे सारख्याच; अगदी हवेसारख्या भरून राहिलेल्या आहेत.

गोष्ट तशी फार वर्षांपूर्वीची नसावी खरं तर. किंवा तशी असूसुध्दा शकते खरं तर. गोष्टीचा काळ नेमका सांगणं हे तसं बघायला गेलं तर सोपं आणि अवघड काम म्हणायला पाहिजे. सोपं याकरता की हल्ली कॅलेंडरं काय दहा रुपये टाकले की हवी तसली मिळतात. त्यात महिन्यांची नावं असतात, तारखा लिहिलेल्या असतात, वर्षंही लिहिलेली असतात चार अंकांमध्ये. लोक कॅलेंडरं बघून पटकन तारीख सांगतात. जे छापलंय ते आणि जे सगळे खरं म्हणतात ते खरं या न्यायाने ही तारीख खरी असते. कॅलेंडरातली तारीख म्हणजे तरी काय तर अमुक एका व्यक्तीच्या देहांतानंतर सूर्य कितीवेळा उगवला आणि कितीवेळा मावळला अशा प्रकारच्या बेरजांमधून मांडलेला ठोकताळा. बेरजा सूर्यावरून केल्या तरी संदर्भ शेवटी कुठल्यातरी घटनेचाच. अर्थात काळ सांगताना घटनांचा संदर्भ देणं हे ही तसं नेहमीचंच. जुनी माणसंसुध्दा काळ असा कुठल्यातरी घटनेशी जोडूनच सांगतात. कुणी मोठ्या दुष्काळाच्या वेळी जन्माला आलेलं असतं तर कुणाचा मृत्यू पटकीच्या मोठ्या साथीत झालेला असतो.

घटनांवरून काळ सांगायचा तर गोष्ट तेव्हाची म्हणता येईल; जेव्हा गाढवांच्या पाठीवर दगडांपासून बनवलेल्या पाट्या-वरवंट्यासारख्या वस्तू बांधून कुणीतरी रस्त्यानं ओरडत त्या वस्तू विकण्यासाठी चाललेलं होतं, कुठल्यातरी खेड्यात कुणीतरी उकळत्या तेलात हात घालून त्यातील नाणं काढून दाखवून आपलं निरपराधित्व सिध्द करू पाहत होतं, जातीबाहेरच्या पुरुषाबरोबर लग्न केल्याबद्दल एका तरण्याबांड मुलीचा गळा कुणीतरी चिरला होता, धनगर मंडळी मेंढ्यांचे कळपच्या कळप घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणाकडे चाललेली होती, कुठंतरी डोंगरावरच्या देवाची जत्रा भरली होती, नवसाला पावणाऱ्या देवीच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती, डोंगरउतारावरून घाईघाईत चादरीच्या झोळीत ठेवलेल्या म्हाताऱ्या बाईला घेऊन एक तरणा माणूस आणि एक म्हातारा माणूस पळत चालले होते, म्हातारीला जास्त झालेलं होतं आणि तरण्याला आणि म्हाताऱ्याला आपापलं बळ कमी पडत होतं. ही घटनांची यादी तशी बरीच मोठी आहे, पण गोष्टीला असणाऱ्या अवकाशाची मर्यादा लक्षात घेऊन मला ती थांबवावी लागणार आहे.

हे ऐकून गोष्ट ऐकणारा म्हणाला; याच्यावरून मला तरी काळाचा नक्की बोध होत नाहीय. ही गोष्ट कदाचित प्राचीन काळातली असू शकेल किंवा अगदी आत्ताच्या काळातली पण असू शकेल. यावर गोष्ट सांगणारा म्हणाला; तू खरोखरीच विचारी आणि सूज्ञ आहेस. तुझं म्हणणं अगदी खरं आहे. असे ऐकणारे असले की गोष्ट सांगायला वेगळीच मजा येते. आता मला आणखी घटनांचा संदर्भ देणे भाग आहे.

मग तो सांगायला लागला. गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा वस्तुस्थितीच्या सुरवंटाला पंख फुटले होते आणि ती ऐंद्रिय संवेदनांच्या कोषातून बाहेर पडून आभासी जगात उडायला लागली होती, वस्तुस्थितीच्या या आभासी फुलपाखराला स्वच्छंद विहरण्यासाठी इंटरनेटचा क्षणाक्षणाला प्रसरण पावणारा विराट अवकाश पुरत नव्हता, फोर्बच्या अब्जाधीशांच्या यादीत छ्त्तीस भारतीय आले होते, गावं तालुक्यासारखी, तालुके शहरासारखे आणि शहरं महानगरांसारखी दिसायला लागली होती, आर्थिक वाढीचा थेट संबंध षड्रिपूंना चेतवले जाण्याशी जोडला जात होता, विविध प्रकारच्या अनंत वस्तूंना चैतन्यरूप प्राप्त झालं होतं आणि चैतन्यालादेखील वस्तुरूप मिळायला लागलं होतं, पर्यावरणास बायोमास या नावाने संबोधले जात होते आणि हे सगळे मास एनर्जीत कन्व्हर्ट करण्यासाठी चढाओढ सुरू झालेली होती.

गोष्ट ऐकणारा म्हणाला; आत्ता मला कळाले की तू सध्याच्या काळातलीच गोष्ट सांगतो आहेस. पण मला हे कळत नाहीय की मग आधीच्या त्या सगळ्या घटनांची जंत्री तू कशाला सांगत बसला आहेस. याच घटना सांगायला हव्या होत्या नुसत्या. चुटकीसरशी काळनिश्चिती झाली असती. गोष्ट सांगणारा म्हणाला; पण मला तर त्या सगळ्या लोकांची पण गोष्ट सांगायचीय. त्यांचे उल्लेख टाळून मला कसे चालेल काळनिश्चिती करताना. गोष्टीचा काळ सांगायचा तर गोष्टीत असणाऱ्या सगळ्यांचाच संदर्भ घ्यायलाच हवाय ना मला. गोष्ट ऐकणारा विचारात पडला. म्हणाला; हे सगळं गोंधळ निर्माण करणारं आहे. यापेक्षा तू सरळ तारीख सांगून मोकळा हो. मलासुद्धा फार वेळ नाहीय. इथे तू नमनालाच घडाभर तेल खर्चत आहेस. गोष्ट सांगणारा म्हणाला; हा सतत कॅलेंडर वापरण्याच्या आणि प्रत्येक दिवसाला तारखा चिकटवण्याच्या सवयीचा दुष्परिणाम आहे. हेसुध्दा एकप्रकारचं सपाटीकरणच आहे काळाचं. मला हे होऊ द्यायचं नाहीय. मला हे तीव्रपणे जाणवतंय, की गाढवांच्या पाठीवर अश्मयुगीन वस्तू बांधून भटकणारे आणि इंटरनेटवर प्रत्यक्ष कधीच न भेटलेल्या माणसाशी केवळ मेंदूनिशी संग करणारे, हे एकाच काळात असूच शकत नाहीत. मग मी त्यांना एकाच तारखेच्या गाठोड्यात एकत्र का बांधावं?

एकच काळ गृहीत धरण्याची पध्दत खरंतर भारतीय नाहीय. गोऱ्या युरोपियन माणसांचीच ही पध्दत आहे. ही माणसे अमेरिकेत पोहोचली तेव्हा तिथली स्थानिक रेड इंडियन मंडळी वेगळ्या काळात जगत होती. परकीय युरोपियन मंडळींना हे काळाचं वैविध्य किंवा एकुणातच वैविध्य मानवत नसल्यामुळे त्यांनी स्वतःचाच काळ सगळीकडे प्रस्थापित करून टाकला. परिणामी स्थानिक रेड इंडियन मंडळी त्यांच्या काळासकट नष्ट झाली. गोष्ट ऐकणारा म्हणाला; तू काळाबद्दल बोलतो आहेस की संस्कृतीबद्दल हे मला कळेनासे झाले आहे. गोष्ट सांगणारा म्हणाला; संस्कृतीचा आणि काळाचा घनिष्ट संबंध असतो. प्रत्येक संस्कृतीची काळाबद्दल विशिष्ट आणि स्वतंत्र अशी कल्पना असते. कित्येक आदिवासी संस्कृतींमध्ये काळाचा फार बडिवार माजवलेला नसतो. उलट आधुनिक पाश्चात्य समाजांमध्ये काळाचा नको तितका बडिवार माजवलेला आहे. त्यांना आपल्यापेक्षा वेगळा असा काळ खपत देखील नाही. ते आपलाच काळ तेव्हढा खरा मानतात. ते इतर काळांचा कसलाच आदर ठेवत नाहीत. तरीही खुद्द अमेरिकेतसुद्धा “आमिश” नावाची एक हट्टी जमात आहे, ज्यांनी आपला वेगळा असा काळ जतन करून ठेवलेला आहे. ही मंडळी वीज, यांत्रिक वाहने इत्यादींसारख्या आधुनिक काळात घेऊन जाणाऱ्या कन्व्हेयर बेल्टपासून दूर आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक आधुनिकपूर्व काळात राहायचं ठरवलंय. गोष्ट ऐकणारा म्हणाला; गोष्ट अजून नीट सुरू झालेली नाहीय याची आठवण मी तुला करून देतो. शिवाय आधुनिक पाश्चात्य समाजांवर टीका करणे फॅशनेबल जरी असले तरी सगळेच जण त्यातून होणाऱ्या फायद्यात डुंबत असतात हे मी नमूद करू इच्छितो. गोष्ट सांगणारा म्हणाला; गोष्टीबद्दलच्या आणि फायद्याबद्दलच्या रूढ कल्पना मला मान्य नाहीत. आधुनिक पाश्चात्य संस्कृतीची इंजिने षड्रिपूंच्या इंधनावर चालत असल्याचा परिणाम काळाचं ते काय करतात याच्यावरही होतो. इतर अनेक वस्तूंप्रमाणे काळ हीसुध्दा अपरिमित कंझ्यूम करायची गोष्ट आहे असं ते समजतात. त्यामुळे प्रत्येकाला जास्तीत जास्त काळ हवा असतो. याचाच परिणाम म्हणून जास्तीत जास्त वेगाने काळ पुढे नेण्याची चढाओढ सुरू झालेली दिसते. आजूबाजूच्या गोष्टी जेव्हढ्या वेगाने बदलतील, तेव्हढ्या वेगाने काळ पुढे गेल्याचा अनुभव येणार. त्यामुळे सगळंच सतत कॅलेडिओस्कोपसारखं बदलणारं आणताहेत ते. काहीच टिकाऊ नको आहे त्यांना. अगदी सामाजिक संस्था आणि नातेसंबंधसुध्दा. खूप भविष्यग्रस्त झाल्याने त्यांनी वर्तमानकाळ नासवून ठेवलाय त्यांचा. दग्धभू धोरणच म्हणायचं हे एकप्रकारचं. गोष्ट ऐकणारा म्हणाला; ही फारच तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया झाली. सगळी माणसं ज्या दिशेने चालली आहेत त्याच्या अगदी उलट आणि प्रतिगामी स्वरूपाचं असं काहीतरी बोलतो आहेस तू. जुन्या वेगवेगळ्या काळात राहणारी माणसं फार चांगल्या राहणीमानाचं जीवन जगताहेत असंही गृहीतक यामध्ये आहे. गोष्ट सांगणारा म्हणाला; केवळ सध्याच्या राहणीमानावरच सगळ्या गोष्टी तोलायच्या हे काही सूज्ञपणाचं नाही. हे जे समूह सतत अमर्यादित वेगाने नव्या काळात जायचा हव्यास बाळगून आहेत ते इतरांना रेटतच सतत पुढे जात राहतात आणि म्हणूनच इतरांचे राहणीमान बिघडवण्यास ते जबाबदार असतात. गांधीजींनी हिंदस्वराज्य या त्यांच्या पुस्तकात या सगळ्या गोष्टींचा घेतलेला कडक समाचार तू वाचलेला दिसत नाहीस. अगदी रेल्वे, इस्पितळे, न्यायालये यासारख्या गोष्टींनासुध्दा त्यांनी तीव्र नकार का दिला होता हे खरोखरी समजावून घेण्यासारखे आहे. त्यांनी प्रतीकासारख्या वापरलेल्या चरख्याला हा काळाचा संदर्भसुध्दा होताच. त्यांना चरख्याच्या चाकाने हा काळाचा वरवंटा रोखायचा होता. गोष्ट ऐकणारा म्हणाला; गांधीवादाचं प्रचारकी समर्थन करणारी सामाजिक गोष्ट सांगणार आहेस की काय तू. गोष्ट सांगणारा म्हणाला; मी काळाबद्दल बोलतो आहे हे तू लक्षात घेणं फार आवश्यक आहे. तुझ्या चिकाटीवर आणि लवचिक आकलनक्षमतेवर माझी सगळी भिस्त आहे.

गोष्ट ऐकणारा म्हणाला; अशानं तू तुझी गोष्ट कधीच पूर्ण करू शकणार नाहीस.

काळाचं सांगण्यातच संपून जाईल सगळा अवकाश.

(पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, जून २००७)

No comments:

Post a Comment