Saturday, 17 September 2011

शेतकऱ्यांच्या आत्महत्या: एका वेगळ्या कोनातून


शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. आत्महत्यांची कारणमीमांसा करणारे विचार वेगवेगळ्या व्यासपीठांवर आणि माध्यमांमार्फत मांडले जात आहेत. आत्महत्यांचा अर्थ लावण्याचे आणि त्यानुसार धोरणांना दिशा देण्याचे प्रयत्नसुद्धा वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या आकलनानुसार आणि अजेंड्यानुसार करत आहेत. मॅक्स वेबर या समाजशास्त्रज्ञाची मदत घेऊन बोलायचे झाल्यास जो तो आपापल्या मूल्यचौकटीतून या घटनांकडे बघतो आहे. या बघण्याचे असे जितके जास्त कोन मिळतील तितके आपण त्या घटनांच्या मुळाशी पोहचू शकू. 

 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांचा आजवर घेतलेला तपास पाहता असे लक्षात येते की ’ भांडवली शेती समर्पक पध्दतीने करता न येणे आणि भांडवली शेती करण्यात आलेल्या अपयशाची नीट व्यवस्था लावता न येणे ’ या कारणाची संभवनीयता नीट तपासली गेलेली नाहीये.
इथे सुरुवातीलाच हे लक्षात घेतले पाहिजे की आत्महत्यांची समस्या ही गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांची नाही. गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की त्यांना मुळात भांडवली पध्दतीची शेती करण्याचा पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे तो पर्याय हाताळताना निर्माण होणाऱ्या दुःखाला त्यांना सामोरं जावं लागत नाही. 

भांडवली पध्दतीची शेती हा प्रकार पाश्चात्यांकडून आपल्याकडे पोहोचलेला आहे. त्याचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे पाश्चात्य मातीतच तयार झालेले आहे. प्रबोधन, औद्योगिक क्रांती, आधुनिकीकरण इ. चा इतिहास पाठीशी असणाऱ्या पाश्चात्य समाजांमध्ये स्वाभाविक पध्दतीने आणि स्वाभाविक गतीने भांडवली अर्थव्यवस्थेचा आणि तिचाच एक घटक म्हणून भांडवली शेतीचा उगम झाला. भांडवली शेतीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्रित विकास पावलेले आणि परस्परानुरूप असे आहे. 

हायब्रीड बी-बियाणांचा वापर, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर, यांत्रिकीकरण आणि या सगळ्यांसाठी जास्तीच्या पैशाची गरज ही भांडवली शेतीच्या हार्डवेअरची काही प्रमुख लक्षणे सांगता येतील. तर जमीन, पिके, पाणी यांच्याकडे निव्वळ उत्पादनाचे घटक म्हणून बघणे, शेतीची प्रक्रिया आध्यात्मिक, भावनिक ऊर्जा देणारी  प्रक्रिया न राहता मुख्यत्वेकरून आर्थिक प्रक्रिया बनणे, शेती ही सबंध जगण्याला तोलणारी गोष्ट न राहता जगण्याच्या काही ठराविक भागांपुरतीच उरणे, शेती करणाऱ्यांच्या संस्कृतीत, मनोभूमिकेमध्ये, सवयींमध्ये बदल होणे इत्यादी भांडवली शेतीच्या सॉफ्टवेअरची प्रमुख लक्षणे म्हणता येतील. पैकी मनोभूमिकेमधील बदलांची उदाहरणे म्हणून मनाचा खंबीरपणा, हिशेबी वृत्ती, खर्चाबद्दलचा संयम, लाभहानीच्या शक्यतांची नेमकी महिती करून घेण्याची सवय ही सांगता येतील. सणासमारंभांची असणारी संख्या, त्यावर खर्च होणारा वेळ व पैसा, त्याला असणारे महत्त्व हे कमी होणे, तसेच मानाच्या, प्रतिष्ठेच्या कल्पनांमध्ये बदल होणे इत्यादी संस्कृतीतील बदलांची काही उदाहरणे म्हणून सांगता येतील. आपल्या समाजात पाश्चात्यांकडून आलेल्या इतर सगळ्या आधुनिक गोष्टींचे जे झाले तेच भांडवली शेतीचेही होत आहे, असे म्हणता येईल. भांडवली शेतीचे हार्डवेअर  आपल्याकडे सहजी पोहोचलेले आहे, पण सॉफ्टवेअर अजून सर्वत्र मुरलेले नाही. खेड्यांमध्ये तर या सॉफ्टवेअरचा मागमूसही दिसत नाही. याचा परिणाम भांडवली शेतीत अपेक्षित यश न येण्यात आणि आलेल्या अपयशास नीट तोंड न देता येण्यात होऊ शकतो. 

भांडवली शेती ही आधी सांगितल्याप्रमाणे भांडवली अर्थव्यवस्थेचाच घटक आहे. तिचा उदय पाश्चात्य समाजांमध्ये झालेला आहे. मॅक्स वेबरने सिध्द केल्याप्रमाणे भांडवलशाहीचा उगम युरोपात अशाच समाजांमध्ये झाला जिथे समूहमनाची घडण भांडवलशाहीच्या उगमास प्रेरक अशी होती. प्रॉटेस्टंटांपैकी काल्विनपंथीयांमध्ये जीवनविषयक, आचार आणि विचारविषयक अशा श्रध्दा आणि समजुती होत्या ज्यांचा उपयोग भांडवलशाहीस प्रेरक अशी मनोभूमिका तयार होण्यात झाला असे त्याने त्याच्या ’ प्रॉटेस्टंट एथिक्स अ‍ॅन्ड स्पिरिट ऑफ कॅपिटॅलिझम’ या ग्रंथात मांडले आहे. याचाच विस्तार करून असे म्हणता येऊ शकते की भांडवली अर्थव्यवस्थेचा प्रसार/ विस्तार अशाच समाजांमध्ये जास्त वेगाने झाला जिथे समूहमनाची घडण भांडवलशाहीस जास्त पोषक व अनुकूल होती.  भांडवली अर्थव्यवस्था जगभर जवळपास सर्वत्र पसरलेली आहे. अर्थातच ज्या समाजांमध्ये या व्यवस्थेस पोषक अशी समूहघडण नाही  त्या समाजांमध्ये लोकांच्या आचारविचारांच्या सवयी, मूल्यरचना, समजुती इत्यादी सॉफ्टवेअरस्वरूप गोष्टींमध्ये अनुकूल अशा प्रकारचे बदल होण्याची प्रक्रिया चालू असताना दिसते. आपल्याइथे स्वाभाविकच महानगरांमध्ये ही प्रक्रिया जास्त वेगवान आहे. त्याखालोखाल शहरांमध्ये ही प्रक्रिया दिसून येते. खेडी मात्र अजूनही या प्रक्रियेपासून तशी दूरच आहेत. याचा परिणाम असा होतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत  हिरीरीने उडी घेऊ इच्छिणाऱ्या शहरी माणसाला पोषक मनोभूमिकेचा स्प्रिंगबोर्ड उपलब्ध असतो पण खेड्यातल्या असे धाडस करणाऱ्यांना तो उपलब्ध नसतो. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर जेव्हा जेव्हा चर्चा होते आणि त्यावर उपाय सुचवले जातात, तेव्हा केवळ हार्डवेअरच्या अंगानेच विचार केला जातो. आवश्यक पतपुरवठा, योग्य तो भाव मिळणे, शासनाकडून आर्थिक मदत मिळणे व यासारख्या इतर गोष्टींचा प्रामुख्याने उच्चार होतो. परंतू पूरक सॉफ्टवेअर तयार होण्याच्या दिशेने उपाय सुचवले जात नाहीत. आधुनिकीकरण, शहरीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण इ. प्रक्रियांचा परिणाम म्हणून ग्रामीण, तसेच शहरी समाजातील जुन्या संस्था- व्यवस्था- रचना संक्रमणाच्या अवस्थेत आहेत. शहरामध्ये या प्रक्रियांचा परिणाम म्हणून नव्या संस्था- व्यवस्था- रचना जन्म पावतानाही दिसतात, ज्या नव्या बदलांना अनुरूप आहेत. लाफ्टर क्लब, स्पोर्टस क्लब, रस्सा मंडळ, महिला मंडळ, सकाळी फिरायला जाणाऱ्यांचे मंडळ, भिशीमंडळ इत्यादींसारख्या गटरचना असोत वा पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दलची  वेगवेगळी पुस्तके/ मासिके असोत किंवा ताणतणावांपासून मुक्ती देणारे आधुनिक बाबा- बुवा असोत, ही त्यांची उदाहरणे म्हणून सांगता येतील. ग्रामसमाजात मात्र या  नव्या संस्था- व्यवस्था- रचना तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसत नाही. उलट पारंपारिक शेतीस अनुरूप असे जुने सॉफ्टवेअरसुध्दा सबंध स्वरूपात उपलब्ध नसल्याची दुर्धर परिस्थिती सध्या ग्रामीण समाजात आहे. 

उदाहरणार्थ पूर्वीचा ग्रामसमाज व्यक्तींच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्याचे कार्यसुध्दा करायचा, पण आता मनोरंजनविषयक कल्पनांमध्ये बदल झाला आहे. शिवाय त्या पूर्ण करण्याचं कार्यही पूर्वीच्या संस्था/ व्यवस्था पार पाडत नाहीत. 

भांडवली पध्दतीची शेती करावी की न करावी अशा प्रकारचा प्रश्नच बाद व्हावा अशी सध्याची परिस्थिती आहे. तेव्हा जे कुणी हा पर्याय वापरू इच्छितात, आर्थिक परिस्थिती नसतानाही तसे धाडस करू इच्छितात अशांना तसे करताना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांमध्ये सुयोग्य सॉफ्टवेअरचा अभाव हासुध्दा एक महत्त्वाचा घटक आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तणावप्रसंगी उपयोगाला येतील अशा आधार-व्यवस्था ( सपोर्ट सिस्टिम्स ) तयार करणे, नवउद्योजकांसाठी शहरांमध्ये प्रशिक्षणाच्या, मार्गदर्शनाच्या जशा सोयीसुविधा असतात, तशा सोयीसुविधा उपलब्ध करणे, भांडवली शेतीस आवश्यक असणाऱ्या हिशेबाच्या, खर्चाच्या, बचतीच्या आर्थिक सवयी व्यक्तींमध्ये, गटांमध्ये विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादींसारख्या उपाययोजनाही शासन किंवा स्वयंसेवी संस्था यासंदर्भात करू शकतात.  


                                                               (पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, मार्च २००७)

Friday, 22 July 2011

बिनइयत्तेच्या तुकड्या

कार्यक्रम रंगात आला होता. कार्यक्रम रंगात ओला होता. प्रेक्षक मंडळी चिंब झाली होती. वर्षाऋतूवर आधारित गीतांचा कार्यक्रम चालू होता. सरकारी कार्यालयातील एका प्रशस्त हॉलमध्ये कार्यक्रम चालू होता. कर्मचारी मंडळी आटोपशीर बसली होती. सर्वात पुढे सर्वात सीनियर अधिकारी बसले होते. तल्लीन होवून माना डोलवत होते. त्यांच्या मानेच्या हेलकाव्यांबरहुकूम बऱ्याच माना हिंदकळल्या जात होत्या. काही स्वयंभूपणे डोलत होत्या, तर काही स्वयंभूपणे डोलत नव्हत्या. स्त्रियांसाठी बसण्याची वेगळी रांग होती. यातही सर्वात पुढे सर्वात सीनियर अधिकाऱ्याची सर्वात बायको बसली होती. बाकी इतर बायका सीनिऑरिटीच्या किंवा धैर्यशीलतेच्या किंवा उत्साहाच्या किंवा रसिकतेच्या किंवा भाबडेपणाच्या उतरत्या क्रमानुसार मागे मागे बसत गेल्या होत्या. गाणारणीच्या गळ्यातून सरी बरसत होत्या सुरांच्या. गाणाराही तानापिही झाला होता. साथ देणारी मंडळीही एकजीव झाली होती निपाजा.

निवृत्ती मागे कोपऱ्यात बसला होता आणि नव्हता. त्याच्याबिनइयत्तेच्या तुकड्या झाल्या होत्या. एक तुकडी गाणी ऐकत होती, मास्तर नसलेल्या तुकडीप्रमाणे गदारोळ करीत, तर दुसरी तुकडी आजूबाजूच्यांचं बारीक निरीक्षण करीत होती. ही ’अ’ तुकडी होती, जी नेहमीप्रमाणे आपोआपच कामाला लागली होती. ’फ’ तुकडी रेकॉर्डरूममध्ये गोंधाळ घालत होती. सकाळीच तो त्याच्या ऑफिसातल्या रेकॉर्डरूममध्ये गेला होता – इयत्तेचा आणि बिनतुकडीचा होवून. खिन्न आणि अस्वस्थ झाला होता देहासहित. देहापुरता बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर परत तुकड्या तुकड्या पडल्या, पण एक हट्टी आणि आडमुठी तुकडी आतच राहिली होती. आत्ता येताना इतर तुकड्यांना गोळा करत तो आला देहनिशी, पण ती तुकडी तशीच तिकडं.

निवृत्ती त्या सरकारी कार्यालयात नुकताच अधिकारी म्हणून लागला होता. उत्साहानिशी, बेतांच्या पुडक्यानिशी तो लागला, पण हळूहळू लागायला लागलं. कपचे उडायला लागले, तसा त्याच्या मध्यवर्ती चिवट आणि जिवट जीवनेच्छेच्या जोरावर या कपच्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्नही आपोआप त्याच्यात सुरू झाला होता. हे सगळं अर्थात त्याला नवीन नव्हतं – कपचे उडवून घेणं आणि परत कोवळेपणानं नव्या गोष्टी करत राहाणं. हे मुंगीसारखं भिंतीवरून पडपडून परंतू झडझडून परत परत चढत राहणं, परत परत करत राहणं.

पण आत्ता त्याच्या एकाग्रतेच्या  अवयवाला मुंग्या आल्या होत्या. हलवून हलवून तो घालवू पाहात होता, पण निरुपाय. हिंदीत मुंग्या येणे यास ’सो जाना’ असे म्हणतात. त्याप्रमाणे एकाग्रतेचा अवयव हिंदीत झोपी गेला होता. गाणं ऐकणाऱ्या तुकडीतली पोरं गोंधळ घालत होती. मध्येच अचानक निमिषार्धात त्याचा रेझोनन्स व्हायचा मंचावरील इंद्रधनुष्याच्या सूरपाझराशी. त्यावेळी क्षणार्धात तो इयत्तेचा आणि बिनतुकडीचा व्हायचा, दणादण सगळ्या तुकड्यांचे आयकॉन  अदृश्य माऊसद्वारा ड्रॅग केले जाऊन एकाच तुकडीत घातले जायचे. पण परत थोड्याच वेळात त्याचा SKINSAVER चालू व्हायचा.

अचानक तुकड्यातुकड्यांमध्ये लहर पसरत गेली सुट्टीच्या अफवेच्या वेगाने. तसतसे सगळ्या तुकड्यांमध्ये अचानक सुरू झाले विविध वर्ग कदमताल. एका तुकडीत एक मास्तर आले संपूर्ण विलायती पोषाखात. एकदम कडक, एकदम शिस्तशीर, एकदम पाश्चिमात्य. त्यांच्या हालचालीच्या रेषा रेझरच्या पात्यासारख्या, त्यांचं बोलणं एकदम नेमकं, कणभरही शब्द वाया नाही, कणभर वावगा नाही. त्यांनी सुरू केला तास भारतीय कार्यालयातील कार्यपध्दतीवरचा. ते म्हणाले, “या भारतीय हरामखोरांनी मातेरं केलंय सगळ्या ब्यूरॉक्रसीच्या अत्यावश्यक तत्त्वांचं. यांची ही भारतीयपणाची कोंबडी घालत असते नंगानाच हारीनं मांडलेल्या सगळ्या तत्त्वनियमांवर.” ते तांबडेलाल झाले होते संतापाने, आणि अत्यंत तुच्छतेने पाहात होते मंचावरील गायकगायकिणीकडे आणि जमलेल्या श्रोतृवृंदाकडे. “ हा एक फसलेला प्रयोग आहे असे मला अत्यंत दुःखाने म्हणावेसे वाटते,” असे म्हणत त्यांनी हळुवारपणे खिशातला रुमाल काढून डोळे टिपले. “ खरंतर आमच्या हवामानात तयार केलेलं हे रोपटं इथं लावताना किती हुरूप आला होता,” असं ते गदगदून म्हणाले. परत त्यांच्या चेहेऱ्यावर कठोरपणाच्या रेषा उमटल्या आणि त्यांच्या बोलण्याचा आसूड तडतडायला लागला. “ अवैयक्तिकपणा हा एक महत्त्वाचा खांब आहे ब्यूरॉक्रसीचा. एक महत्त्वाची संकल्पना, जी जीवनरसासारखी भिनली पाहिजे संघटनेत, कर्मचाऱ्यांत, अधिकाऱ्यांत. पण यांनी इथं पूर्ण उलटं करून ठेवलंय. वैयक्तिकपणा यांच्यासाठी प्राणवायूसारखा. कामाशी निष्ठा नाही. कामचुकारपणाला शिक्षा नाही. संपूर्ण सरंजामी जीवनरस सळसळतोय संघटनाशरीरात. गुणाला मोल नाही, पदाला आहे – वर्णव्यवस्थेसमान, ज्येष्ठांची दहशत आहे, हुकूमत आहे, भीती आहे – संयुक्त कुटुंबासमान.”

कमान. इंद्रधनुष्यासमान रसिकतेची, हॉलभर. सर्वात सीनियर तर बुडूनच गेले होते सूरसागरात. सगळे एकवर्ग झाले होते तुकडीहीन. फक्त निवृत्तीच होता वर्गाबाहेर वेगवेगळ्या तुकड्या सांभाळत. आंदोळत. क्लान्त. भ्रान्त.

एका तुकडीत वर्ग सुरू झाला रेकॉर्डकीपिंग या विषयावरती. यात मास्तर नव्हते. मल्टिमीडियाच्या मदतीनं संगणकाला जोडलेल्या प्रोजेक्टरमार्फत समोर पडद्यावर झरझर चित्रं. व्हिडिओक्लिपिंग्ज, आकडेवाऱ्या वगैरे उमटत होत्या. आदिम अवस्थेत असतानापासून ते आत्तापर्यंत हे शास्त्र कसकसं प्रगत होत गेलं हे उलगडवलं  जात होतं. ख्रिस्तपूर्व १८००० ते २०००० साली आदिम माणसाने गुहांमध्ये चित्ररूपाने नोंदी करून ठेवल्या ही रेकॉर्डकीपिंगची आद्य सुरुवात. ख्रिस्तपूर्व ३५०० ते ३२५० साली सुमेरियनांनी दगड, धातू, मेण इत्यादींवर चित्रलिपीद्वारे नोंदी केल्या. ख्रिस्तपूर्व ५व्या शतकात ग्रीक, रोमन व इजिप्शियनांनी पॅपिरस या वनस्पतीचा लिहिण्यासाठी वापर केला. ख्रिस्तपूर्व १०५ साली चिनी लोकांनी कागदाचा वापर रेकॉर्डसाठी केला. नंतर लाकडी ठोकळ्याद्वारे त्यावर मुद्रण केले. इसवीसन ११२५ साली स्पेनमध्ये पहिली कागद बनवण्याची गिरणी सुरू झाली. इसवीसन १४५० साली गटेनबर्गने धातूच्या टाइपाची प्रिंटिंग प्रेस सुरू केली. १८३१ साली लुई दा गुरे याने पहिला फोटोग्राफ बनवला. इ.स. १८३७ साली सॅम्युएल मोर्सने पहिला टेलिग्राफ तयार केला.१८७१ साली रेने ड्रॅगनने फ्रान्स- रशिया युध्दात पॅरिसमधील ज्ञानभांडाराचे रक्षण करण्यासाठी मायक्रोफिल्मचा शोध लावला. १८७३ साली स्कोल्स आणि ग्लिडन यांनी टाइपरायटरचा शोध लावला. १८७६ साली अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने टेलिफोनचा शोध लावला. १९०० साली अ‍ॅनॉलॉग संगणक विकसित झाला आणि १९८४ साली पहिला सीडीरॉम वापरात आला. आत्ता २००३ साली रेकॉर्डकीपिंगचे काम अत्यंत प्रगत आहे. आणि पूर्वीच्या या शोधांच्या संशोधनाच्या बळावर आता अत्यंत गुंतागुंतीची व प्रचंड संख्येची माहिती अतिशय कमी जागेत व कमी ऊर्जेत साठवली जाऊ शकते. माहिती उलगडत होती. य सर्व संशोधनांसाठी आयुष्यच्या आयुष्य खर्ची घालणाऱ्या ध्यासवान लोकांची चरित्रे विशद होत होती.

वर्गात पुढे बसलेल्या काहींचे डोळे पाझरत होते. शरीरे थरथरत होती. रेकॉर्डकीपिंगच्या शास्त्रात भर घालण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्यांबद्दल त्यांना अनावर आपुलकी वाटत होती. थिजून गेले होते ते.

भिजून गेले होते ते, स्वरांच्या चिंब वर्षावात. एकापाठोपाठ एक सुंदर वर्षागीते सादर होत होती. मंडळी तल्लीन झाली होती. भिजून गेली होती. निवृत्तीच तेव्हढा होता कोरडा. त्याला ऐकू येत होता ओरडा खोंडाचा.

एका तुकडीत वर्गातला फळा काळानिळा होत गेला आणि प्रसरण पावत गेला चहूबाजूंनी. नंतर तो फळा आडवा झाला मंचासारखा. नंतर एका जोमदार आणि निरागस खोंडाला घेऊन आले पाचसहाजण त्या फळ्यावर. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “ आजचा धडा आता प्रत्यक्ष फळ्यावरच पाहा. खोंडाची त्वचा थरथरत होती तरंगत बेसावध. त्याची अणकुचीदार शिंगे घुसली होती हवेत आणि तो उभा होता तल्लख, तजेलदार आणि उत्सुक.इतक्यात त्या सगळ्यांनी सराईत हालचाली केल्या आणि पायात कासऱ्यांचे तिढे घालून त्याचे ते बेलगाम धूड फळ्यावर कोसळवले. प्रचंड आवाज झाला. खोंड फुसांडले. त्यांनी निर्विकारपणे त्याचे चारही पाय बांधले, एकाने त्याच्या सुकुमार तोंडावर पायाचा दाब दिला. एकाने शिंगे पकडली, दोघांनी पाय दाबले. उरलेल्याने विडी शिलगावली. संथपणे पिशवीतून छोट्या जाडीचे दोर काढले. दुसऱ्याच्या मदतीने खोंडाच्या आंडाला हात घातला तसे खोंड चवताळले. ठिकठिकाणच्यांनी ठिकठिकाणी जोराने दाबून धरले, आणि विडी पिणाऱ्याने आंडाभोवती दोऱ्या आवळ्ल्या आणि पिळायला सुरुवात केली आणि खोंडाच्या चित्कारांनी वर्ग दणाणला. भिंती धडधडल्या. विडी पिणारा पिळे वळत गेला. खोंडाचा आव गळत गेला. टपटपला फेस होऊन तोंडाचा. विडी पिणारा म्हणाला, “ झाल्या कान्या वळून. साधला कार्यभाग. आला हा आपल्यात.” क्षणात त्या माणसांचे झाले रूपांतर बैलांमध्ये. बोथट शिंगांच्या, झुली बाळगणाऱ्या यथेच्छ अधिकारपदाच्या, डोलावत सूचनेबरहुकूम माना.

ताना. सुरेख ताना घेत होता गाणारा. करत होता आळवणी सुरांची. वीणेच्या तारेसारखे झंकारत होते त्याचे शरीर. देहभान हरपले होते. करपले होते चित्त निवृत्तीचे.

एका तुकडीत डॉक्युमेंटरी सुरू झाली होती. विषय होता – ’ सदानंद आत्मलुब्धे’ या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील विविध फाइल्स, नागरिकांकडून जमा झालेल्या गेल्या १०-१२ वर्षातील माहितीचा दस्तऐवज आणि इतर कार्यालयीन कागदपत्रे इत्यादी रेकॉर्डसच्या व्यवस्थेची स्थिती. पडद्यावर पहिलीच फ्रेम उमटली ती आत्मलुब्धेच्या केबिनच्या दारावर एकाच खिळ्यावर लोंबकळणाऱ्या नावाच्या पाटीची. नंतर मग एकाच खोलीत युक्तीने व सुलभ हाताळणी करता येईल अशा पध्दतीने रचता येईल असे रेकॉर्ड एकूण चार ठिकाणच्या चार खोल्यात कसे अस्ताव्यस्त व दारुण अवस्थेत आहे हे अतिशय सहानुभूतिशून्य निर्दयतेने दाखवले जाऊ लागले. खरेतर त्यांच्याकडे केवळ सातशे नागरिकांचेच रेकॉर्ड जतन करावयाचे होते. परंतू ते सगळे अशा अनाकलनीय अव्यवस्थेत अरचले गेले होते की एखाद्या व्यक्तीचे सलग पाच वर्षांचे रेकॉर्ड शोधायचे झाल्यास सात तास तरी खरचले जातील. एका खोलीत जुन्या अक्षरशः लगदा व्हायच्या मार्गावर असलेल्या फायली पसरलेल्या होत्या. खोलीत सर्वत्र धूळच धूळ होती. रेकॉर्डची इतकी वाईट स्थिती असूनही कर्मचारी मंडळी मात्र मजेच्या मनःस्थितीत होती. रेकॉर्डशी त्यांचा कसलाही बंध नव्हता. रेकॉर्डबाबत त्यांची वृत्ती स्थितप्रज्ञ होती. आत्मलुब्धेंना तर स्वतःतून फुर्सतच नव्हती. रेकॉर्डच्या चिखलात ते कमळासारखे फुलून आले होते.

एका तुकडीत भ्रष्टाचार या विषयावर सगळे गप्प होते.

एका तुकडीत कार्यक्षमता या विषयावर सगळे गप्प होते.

गाण्यात मात्र निवृत्तीशिवाय सगळेच गुंग होते.

एका तुकडीत समोर पांढऱ्याशुभ्र पडद्यावर गोठले होते दृश्य हॉलमधल्या मैफलीचे. क्षणार्धात चित्रातील सजीवांचे आणि निर्जीवांचे रूपांतर अ‍ॅनिमेशनमधे झाले. आणि त्यानंतर या अ‍ॅनिमेटेड वस्तू आणि जीव विविध वस्तूंमधे आणि जीवांमधे रूपांतरित व्हायला लागले. गायकासमोरील हार्मोनियमचे रूपांतर लगदा होऊ घातलेल्या, जुन्या- पुराण्या फायलींच्या ढिगात झाले. अ‍ॅनिमेटेड गाणारा अनलिमिटेड घोरू लागला. गाणारीच्या ताना घेतानाच्या हालचाली मंदावत गेल्या. तिच्या हातात अचानक लोकरीच्या धाग्यांचा मोठ्ठा गोल प्रकट झाला, दोन मोठ्या विणायच्या सुया प्रकट झाल्या आणि ती संथ गतीनं विणकाम करायला लागली. निवेदकाचे रूपांतर इरसाल शिपायात झाले, कानाला विडी लावून त्याने चकाट्या पिटायला सुरुवात केली. माइकचा सर्रकन सळसळणारा साप झाला, सापाचा वळवळणारा गांडूळ झाला, गांडुळाची बारीक कसर झाली आणि ती सर्रकन फायलींच्या चळणीत जाऊन बसली. तब्बलजीची थिरकणारी कुसरदार बोटे बोजड झाली. डग्ग्याची तंबाखूची डबी झाली, तबल्याची चुन्याची डबी झाली, तब्बलजी डब्बल झाला आणि तंबाखू मळीत बसला.

हसला. सगळा हॉल हसला निवेदकाच्या खुमासदार विनोदाला. अधूनमधून त्याची समयोचित विनोदांची, चुटक्यांची पखरण चालली होती. श्रोतृवर्ग हास्यरसाच्या अधूनमधून येणाऱ्या फवाऱ्यांनी ताजातवाना होत होता. सुरांच्या लहरी लहरी पसरल्या होत्या सर्वत्र. डुंबत होते सगळेच. निवृत्ती मात्र गटांगळ्या खात होता, फुटलेल्या जहाजासारखा तुकड्यातुकड्यांमधे.  तुकड्यातुकड्यातले वर्ग सांभाळत. सहन करत.   

(पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, जून २००५)    

Wednesday, 20 July 2011

ठार मारण्याच्या पध्दतींची गोष्ट


ठार मारण्याच्या वेगवेगळ्या पध्दती असतात. वेगवेगळ्या समाजात, संस्कृतीत, देशात, प्रांतात त्या वेगवेगळ्या असतात. माणसांना ठार मारण्याचेच जर घेतले, तर असे दिसते की अमेरिकनांनी रेड इंडियनांच्या कत्तली केल्या. हाच पॅटर्न पुढे हिरोशिमा- नागासाकी, इराक युध्द, अफगणिस्तानावरचे हवाई हल्ले यामध्येही दिसून येतो. 

मध्य आशियाई भागात प्रचलित असलेला सार्वजनिक आणि सविस्तर छ्ळ करून ठार मारणे, हा एक प्रकार झाला. शिवाय एस्किमोंमध्ये अगदी निराळाच, म्हाताऱ्या झालेल्या माणसांचा निर्लेपपणे अंत घडवण्याचा प्रकार असतोच. काही ठिकाणी ज्याला ठार मारायचंय त्याचाच ठार मारण्यासाठीही उपयोग केला जातो. भारतातल्या सतीप्रथेमधे हे दिसून येते.

माणसाच्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. ही  नवनवोन्मेषशालिनी प्रतिभाच माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करते. या प्रतिभेने ठार मारण्याच्या पध्दतीत  अनेक क्रांत्या घडवल्या.  ठार मारण्याच्या पध्दती शोधण्यासाठीची माणसाच्या प्रतिभेची कोटिच्या कोटि उड्डाणे केवळ स्तिमित करणारी आहेत. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष न जातासुध्दा तिथे ठार मारण्याची प्रक्रिया घडवून आणणे हा एक प्रकार झाला. अणुबॉम्ब टाकणे, क्षेपणास्त्रे धाडणे, चालकविरहित विमानातून हल्ले करणे हे असेच एक उड्डाण म्हणता येईल. 

जसजशी प्रगती होत गेली तसतसा माणसाला वेळ कमी पडू लागला. वेळ हा काही एक उत्पादन घडवण्यासाठी तरी असतो किंवा ते खर्च (कंझ्युम) करण्यासाठी तरी असतो हा समज रूढ झाल्यामुळे एखादी गोष्ट कमीतकमी वेळेत करणे यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे स्वाभाविकच  कमीतकमी वेळात जास्तीत जास्त माणसे मारण्याचे एक मोठे आव्हान माणसापुढे निर्माण झाले. हे आव्हान माणसाने इतक्या समर्थपणे पेलले की काही सेकंदांमध्ये संपूर्ण पृथ्वी नष्ट करण्याइतपत कौशल्ये विकसित झाली. अशा प्रकारे सबंध पृथ्वीलाच धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच चाणाक्ष माणसांनी इतर ग्रहांवर मनुष्यवस्त्या करता येतील का या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. पण या प्रयत्नांबद्दल बोलणे हे विषयांतर होईल. 

माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळा करणाऱ्या शिरपेचातला एक महत्त्वाचा तुरा म्हणजे तो आर्थिक प्राणी आहे हा. म्हणजे तो देवाणघेवाण करतो. गोष्टींचे मूल्य ठरवतो. चलने तयार करतो. या आर्थिकपणाचे माणसाने असे काही बुडबुडे तयार केले की थक्क होऊन जावे. देवाणघेवाणीचे माणसाने तयार केलेले जाळे इतके अफाट आहे की आता ते त्यालाही समजेनासे झाले. प्रगतीची ही गती नंतर इतकी वाढली की  देवाणघेवाणीच्या या जाळ्याला artificial intelligence प्रदान करण्याचेही शोध काहीजणांनी लावले. असो. तर मुद्दा हा की  ठार मारण्याच्या पध्दतींवरसुध्दा माणसाच्या या आर्थिकपणाचे परिणाम झाले. ठार मारण्याच्या साधनांचे केवळ कारखानेच नाही तर उद्योग निर्माण झाले. ठार मारण्याच्या साधनांच्या उद्योगांवर लाखोंचे रोजगार अवलंबून राहायला लागले. 

तरीसुध्दा ठार मारण्याचे हे काही खरे प्रगत प्रकार नव्हेतच. ठार मारण्यातून जे साध्य करायचंय ते प्रत्यक्ष ठार न मारतासुध्दा घडवून आणणे हा यातला प्रगत प्रकार. जितका एखादा समाज किंवा संस्कृती जुनी तितका त्यांना हा प्रकार अवगत असण्याची शक्यता जास्त. अलीकडच्या काळातली नवी संस्कृती म्हणजे अमेरिकन लोकांची. या नवाड्यांनी अमेरिकेतल्या स्थानिक लोकांच्या थेट कत्तली केल्या. स्पॅनिश लोकांनी असाच माया संस्कृतीच्या लोकांचा (इंका) नायनाट केला. ठार मारण्याच्या इतिहासातले सगळ्यात अप्रगत आणि रानटी लोक म्हणजे युरोपियन मंडळी. तरी नंतर यांचीही थोडी प्रगती झाली. वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांचा थेट नाश न करता नाशातून जे साध्य करायचं ते जमवण्याचा प्रकार त्यांनी जगभर अवलंबला. ठिकठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या. 

अर्थात या प्रगत प्रकारांमध्ये युरोपियनांचेही गुरू शोभण्याइतपत कौशल्ये भारतीयांकडे होती. फरक इतकाच की युरोपियन मंडळी जगभर हा प्रकार करण्यासाठी गेली. तर भारतीयांना जगभर जायची गरज नव्हती, सगळे जगच त्यांच्याकडे येत होते आणि पचवले जात होते. भारतात प्राचीनकाळी सध्याचे सगळेच प्रगत प्रकार अस्तित्वात होते असे मानणाऱ्या गौरववादी मंडळींनी हे कधी कसे मांडले नाही कोणास ठाऊक. पण प्राचीनकाळीच आपल्याइथे ठार मारण्याच्या पध्दतींमधला प्रगत प्रकार विकास पावला होता हे नक्की.

या प्रगत योजनेमध्ये एकट्यादुकट्या माणसांनाच नव्हे तर समूहच्या समूहांनाच फस्त करण्याच्या सुविधा होत्या. फस्त करण्याची पध्दत इतकी मस्त होती की फस्त करणारेही खूष आणि फस्त केले जाणारेही खूष. माणसाच्या शरीरामध्ये अन्नाचे साखरेमध्ये रूपांतर केले जावे तसे भारतात समूहांचे जाती आणि उपजातींमध्ये रूपांतर होत असे. रूपांतरणाचे आणि रूपांतरितांसाठीचे शास्त्र अतिशय बिनचूक रचले गेलेले होते. शास्त्र रचणाऱ्यांच्या या पध्दती अतिशय सफाईदार आणि बेमालूम होत्या. इतक्या की ठार मारल्या जाणाऱ्यांनाही कळू नये की ते ठार मारले गेले आहेत. ठार मारले जाण्याच्या तीव्रतेनुसार पिरॅमिड रचनाच तयार केलेली होती शास्त्रे रचणाऱ्यांनी.   

        
जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या नानाविध गोष्टींसाठीच्या सविस्तर नियमावल्या प्रत्येक समूहासाठी अशा वेगवेगळ्या तयार असायच्या. इतकेच नव्हे, तर पूर्वजन्म आणि पुढचा जन्म अशी मजबूत बुचेही मारून ठेवली होती प्रत्येकाला. हे सगळं इतकं तपशीलवार आणि पर्फेक्ट होतं की विचार करण्याच्या अवयवास सुरुवातीपासूनच वाळवी लागावी. विचार करणे हा जो जिवंत राहण्यासाठीचा श्वास आहे तो शास्त्रे रचणाऱ्यांपुरताच उपलब्ध होता. बाकीची सगळी माणसे म्हणजे पेशीच जणू शास्त्रकारांच्या आत्म्याला शरीर पुरवण्यासाठीच्या. 

विचार करण्याच्या विविध रीतींना आपल्या पोटात घ्यायचे, त्यांना गोठवून टाकायचे आणि तसेच गोठलेल्या स्वरूपात ठेवून त्यांच्यावर नियंत्रण मिळवायचे असेही एक अनोखे तंत्र शास्त्रकारांनी विकसित केले होते. ज्यू लोकांसारखी पृथ्वीवरची सगळ्यात तिरसट जमातसुध्दा शास्त्रकारांच्या या तडाख्यापासून बचावली नाही. त्यांच्या एका समूहाला कित्येक शतके एका भागात शनवारतेली या नावाने गोठवण्यात आलेले होते. 

एका चोरामुळे दुसऱ्याचा काटा निघावा त्याप्रमाणे वसाहती करणाऱ्या युरोपियन ठारमाऱ्यांकडून या शास्त्रे रचणाऱ्या ठारमाऱ्यांना मोठ्ठाच धक्का बसला भारतात. त्यामुळेच फुले, शाहू, आंबेडकर इत्यादींसारख्या विचारांचा अवयव जागा असलेल्या आणि नाठार मंडळींनी वेळोवेळी  युरोपियन ठारमाऱ्यांना  शास्त्रवाल्या ठारमाऱ्यांविरोधात मदत केलेली दिसते. 

ग्रीक आणि रोमनांच्या प्राचीन संस्कृतींमध्ये गुलामगिरीची अगदी परवाच्या शतकापर्यंत चालू राहिलेली ठार मारण्याची पध्दत विकसित पावलेली दिसते. पण हीसुध्दा तशी तितकी प्रगत मानता येणार नाहीच. कारण या पध्दतीत गुलामांना ते गुलाम आहेत ही जाणीव असे. वसाहतकार ठारमारे आणि भारतीय शास्त्रकार ठारमारे मात्र या बाबतीत फारच पोहोचलेले होते असे म्हणता येते.

अर्थात युरोपीय वसाहतकार ठारमारे हे ठार मारण्याच्या कलेतल्या प्रगत पायरीपर्यंत जरी पोहोचलेले असले, तरी भारतीय शास्त्रकारांइतका प्रगल्भपणा त्यांच्यात नव्हता असेच म्हणावे लागेल. या  प्रगल्भपणाअभावीच त्यांची ठारमारकता दीडदोनशे वर्षांच्यावर टिकली नाही. भारतीय शास्त्रकारांची ठारमारकता मात्र जणू अमर आहे, अपौरुषेय आहे. 

रामबाण ठारमारकतेसाठीच्या तंत्रांच्या आणि तत्त्वांच्या खाणीच भारतीय इतिहासात सापडू शकतात असे म्हणल्यास वावगे होणार नाही. एखाद्या ठिकाणी स्थानिकांशी कसलाही संबंध नसलेला तिसराच माणूस नेमून प्रशासन करवणे ही पध्दत ब्रिटिशांनी बसवली आणि अजूनही चालू आहे पोलादी पाचरासारखी. पण ही काही खरी नवी पध्दत नाही. अनेक शतकांपूर्वीच अशा पध्दतीचा वापर नियमितपणे होत असे.

पुराव्यादाखल भीमनाथ नावाच्या इसवीसनाच्या अकराव्या शतकाच्या अखेरीच्या चालुक्यनृपती सहावा विक्रमादित्य याच्या प्रशासकाची गोष्ट सांगता येईल. भीमनाथाची माहिती गणेशवाडी, ता. निलंगा, जि. उस्मानाबाद येथे सापडलेल्या संस्कृतभाषेतील शिलालेखात मिळते. या भीमनाथाचे गोत्र आत्रेय असे होते आणि त्याचे मूळ घराणे हिमालय पर्वतातील काश्मीर देशचे होते. या भीमनाथाचे उल्लेख इतरही अनेक कानडी शिलालेखात असून त्याप्रमाणे हा कुणीतरी अगदीच वरच्या दर्जाचा प्रशासकीय अधिकारी होता असे दिसते. त्याला कानडीतून मनेवर्गडे(गृहखात्यावरील अधीक्षक), पट्टळेकरण(प्रांतिक नोंदणी अधिकारी) अशीही विशेषणे लावलेली दिसतात. थोडक्यात, तो तेव्हाचा महाराष्ट्र काडरचा अगदीच सीनियर आय. ए. एस. अधिकारी होता असे म्हणता येईल. तर हे भीमनाथ गृहस्थ छानपैकी चालुक्यांच्या राज्यात प्रशासन चालवीत होते. हे काश्मीरातून मराठवाड्यात कसे आले कळत नाही, पण शिलालेखात त्यांची क्वालिफिकेशन्स वेदशास्त्रसंपन्न इत्यादी दिसतात. थोडक्यात हे शास्त्रकारांच्या योजनेचे सभासद होते असे म्हणता येईल. त्या काळची ठार जनता कानडी प्रेमळपणाने या भीमनाथाला भिवणय्या असेही संबोधे असे शिलालेखावरून दिसते. 

जगभर जाणिवांना आकार देण्याचे काम पूर्वी धर्ममार्तंड मंडळी जेवढ्या प्रमाणात करीत तेवढ्या प्रमाणात हल्ली मार्केटिंगवाली मंडळी करीत असतात. यासाठी वापरली जाणारी बरीचशी तंत्रे आणि पध्दती फार पूर्वीपासून शास्त्रकार वापरत आले आहेत. वित्तबळाद्वारे स्थानिक ब्रॅन्ड्स विकत घेऊन आपलाच तेवढा ब्रॅन्ड कसा बलवत्तर राहील हे बघणे, त्यासाठी स्थानिक ब्रॅन्डही जिवंत ठेवून त्यास प्रभावळीमध्ये वापरणे हे जरी कोक, पेप्सीसारखे ब्रॅन्ड आत्ता करीत असले तरी शास्त्रकारांनी हा फॉर्म्युला पूर्वीच विकसित केलेला होता. विष्णू हा आपला ब्रॅन्ड बलवत्तर ठेवण्यासाठी विठ्ठल, बालाजी असे प्रचंड पॉप्युलर असे स्थानिक ब्रॅन्ड्स धर्मबळाद्वारे प्राप्त करून शास्त्रकारांनी वापरले. फरक इतकाच की अमेरिकेत ठार मारण्याच्या प्रक्रियेचा एन्ड प्रॉडक्ट उपभोक्ता म्हणून ओळखला जातो, तर पूर्वीच्या काळी तो भक्त म्हणून ओळखला जात असे. अमुक भक्त, तमुक भक्त वगैरे. विविध तंत्रांद्वारे जणिवांवर ठाण मांडणे आणि विचारांचा अवयव बंद पाडणे हे सूत्र मात्र दोन्ही ठिकाणी. आणि आद्य वापर अर्थातच भारतामध्ये.


 तर अशा या ठार मारण्याच्या वेगवेगळ्या पध्दती. वरचेवर बदलत गेलेल्या आणि जसजश्या प्रगत होत जातील तसतश्या गुंतागुंतीच्या आणि गोंडस होत गेलेल्या. धादांत, प्रांजळ क्रौर्यापासून ते चकचकीत, शहाजोग आणि अदृश्य क्रौर्यापर्यंतच्या प्रवासाने प्रभावित झालेल्या.

माणूस समूहात राहू लागला तेव्हापासून त्याने सामूहिक गोष्टी नियंत्रित करण्यासाठीच्या पध्दती आणि व्यवस्था शोधल्या. या पध्दती आणि व्यवस्था अधिकाधिक गुंतागुंतीच्या आणि प्रबळ होत गेल्या. त्या वरचेवर जास्तच जगड्व्याळ आणि बलवत्तर होत हाताबाहेर चाललेल्या दिसतात. इतक्या की ठार मारण्याच्या पध्दतींची म्हणून सुरू झालेली गोष्ट, ठार मारणाऱ्या पध्दतींची गोष्ट होऊन संपावी.       

(पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू)

 

Friday, 15 July 2011

काळाची गोष्ट

माणसाला गोष्ट सांगण्याची खोड प्राचीन काळापासून आहे. गोष्ट सांगणारे कायम असतातच कुणी कुणी. शिवाय गोष्ट ऐकणारेसुद्धा असतातच सांगणाऱ्यांपेक्षा जास्त. गोष्टी सांगणे आणि ऐकणे यातूनच संस्कृतीच्या विकासाला हातभार लागतो असेही म्हणतात.

तर असाच एक गोष्ट सांगणारा होता. तो म्हणाला, मला एक गोष्ट सांगायचीय. अगदी व्यवस्थित सांगायचीय. छानपैकी. नेहमीसारखी सरधोपट नाही सांगायचीय. आरंभ अंत घटना प्रसंग वगैरे. काहीतरी वेगळा प्रयोग करता येणार असेल तर तोही करून बघायचाय. माझ्या मनात खदखदतंय तेही बाहेर निघायला पाहिजे आणि दर्दी मंडळींकडून वाहवा पण मिळाली पाहिजे. गोष्ट तशी भारत देशातलीच म्हणायला पाहिजे. कारण माझा सगळा प्रत्यक्ष अनुभव भारत देशातलाच आहे. एकदा पायी बॉर्डर क्रॉस करून नेपाळात किंचित जाऊन आलो होतो. पण नेपाळ तरी काय भारतासारखाच म्हणायचा.

गोष्ट भारत देशात नेमकी कुठे घडली हे सांगणं तसं अवघड आहे. हे मान्य आहे की आपल्या भारत देशात ठिकाण सांगण्याला फार महत्त्व आहे. म्हणजे एखाद्या माणसाला पक्का ओळखण्यासाठी त्याची जात आणि त्याचे ठिकाण या दोन गोष्टी कंपल्सरी लागतातच. पण तरी मला ठिकाण सांगणं तसं अवघडच जातंय. कारण एकदा मी काश्मीरमधल्या पूঁछ जिल्ह्यातल्या झुलास नावाच्या अगदी सीमेवरच्या गावात फिरत होतो, तर मला मी अगदी माझ्या गावात फिरत असल्याचा भास होत होता. दार्जिलिंग जिल्ह्यातल्या एका डोंगराच्या कुशीत लपलेल्या दुर्गम खेड्यात मी नोकरीच्या निमित्ताने गेलो होतो तेव्हा तिथल्या मंडळींनी केलेला पाहुणचार आणि त्यांची वागणूक मला अगदी रोजच्या परिचयातली वाटली होती. हिंदी सिनेमातली गाणी, क्रिकेटचा खेळ, वडापिंपळाची झाडं, नद्या ओलांडताना नद्यांमध्ये प्रवाशांकडून टाकली जात असताना उन्हात चमकणारी नाणी या सगळ्यांप्रमाणेच इतरही अशा अनेक अदृश्य गोष्टी मला जाणवलेल्या आहेत ज्या भारतात सगळीकडे सारख्याच; अगदी हवेसारख्या भरून राहिलेल्या आहेत.

गोष्ट तशी फार वर्षांपूर्वीची नसावी खरं तर. किंवा तशी असूसुध्दा शकते खरं तर. गोष्टीचा काळ नेमका सांगणं हे तसं बघायला गेलं तर सोपं आणि अवघड काम म्हणायला पाहिजे. सोपं याकरता की हल्ली कॅलेंडरं काय दहा रुपये टाकले की हवी तसली मिळतात. त्यात महिन्यांची नावं असतात, तारखा लिहिलेल्या असतात, वर्षंही लिहिलेली असतात चार अंकांमध्ये. लोक कॅलेंडरं बघून पटकन तारीख सांगतात. जे छापलंय ते आणि जे सगळे खरं म्हणतात ते खरं या न्यायाने ही तारीख खरी असते. कॅलेंडरातली तारीख म्हणजे तरी काय तर अमुक एका व्यक्तीच्या देहांतानंतर सूर्य कितीवेळा उगवला आणि कितीवेळा मावळला अशा प्रकारच्या बेरजांमधून मांडलेला ठोकताळा. बेरजा सूर्यावरून केल्या तरी संदर्भ शेवटी कुठल्यातरी घटनेचाच. अर्थात काळ सांगताना घटनांचा संदर्भ देणं हे ही तसं नेहमीचंच. जुनी माणसंसुध्दा काळ असा कुठल्यातरी घटनेशी जोडूनच सांगतात. कुणी मोठ्या दुष्काळाच्या वेळी जन्माला आलेलं असतं तर कुणाचा मृत्यू पटकीच्या मोठ्या साथीत झालेला असतो.

घटनांवरून काळ सांगायचा तर गोष्ट तेव्हाची म्हणता येईल; जेव्हा गाढवांच्या पाठीवर दगडांपासून बनवलेल्या पाट्या-वरवंट्यासारख्या वस्तू बांधून कुणीतरी रस्त्यानं ओरडत त्या वस्तू विकण्यासाठी चाललेलं होतं, कुठल्यातरी खेड्यात कुणीतरी उकळत्या तेलात हात घालून त्यातील नाणं काढून दाखवून आपलं निरपराधित्व सिध्द करू पाहत होतं, जातीबाहेरच्या पुरुषाबरोबर लग्न केल्याबद्दल एका तरण्याबांड मुलीचा गळा कुणीतरी चिरला होता, धनगर मंडळी मेंढ्यांचे कळपच्या कळप घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणाकडे चाललेली होती, कुठंतरी डोंगरावरच्या देवाची जत्रा भरली होती, नवसाला पावणाऱ्या देवीच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती, डोंगरउतारावरून घाईघाईत चादरीच्या झोळीत ठेवलेल्या म्हाताऱ्या बाईला घेऊन एक तरणा माणूस आणि एक म्हातारा माणूस पळत चालले होते, म्हातारीला जास्त झालेलं होतं आणि तरण्याला आणि म्हाताऱ्याला आपापलं बळ कमी पडत होतं. ही घटनांची यादी तशी बरीच मोठी आहे, पण गोष्टीला असणाऱ्या अवकाशाची मर्यादा लक्षात घेऊन मला ती थांबवावी लागणार आहे.

हे ऐकून गोष्ट ऐकणारा म्हणाला; याच्यावरून मला तरी काळाचा नक्की बोध होत नाहीय. ही गोष्ट कदाचित प्राचीन काळातली असू शकेल किंवा अगदी आत्ताच्या काळातली पण असू शकेल. यावर गोष्ट सांगणारा म्हणाला; तू खरोखरीच विचारी आणि सूज्ञ आहेस. तुझं म्हणणं अगदी खरं आहे. असे ऐकणारे असले की गोष्ट सांगायला वेगळीच मजा येते. आता मला आणखी घटनांचा संदर्भ देणे भाग आहे.

मग तो सांगायला लागला. गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा वस्तुस्थितीच्या सुरवंटाला पंख फुटले होते आणि ती ऐंद्रिय संवेदनांच्या कोषातून बाहेर पडून आभासी जगात उडायला लागली होती, वस्तुस्थितीच्या या आभासी फुलपाखराला स्वच्छंद विहरण्यासाठी इंटरनेटचा क्षणाक्षणाला प्रसरण पावणारा विराट अवकाश पुरत नव्हता, फोर्बच्या अब्जाधीशांच्या यादीत छ्त्तीस भारतीय आले होते, गावं तालुक्यासारखी, तालुके शहरासारखे आणि शहरं महानगरांसारखी दिसायला लागली होती, आर्थिक वाढीचा थेट संबंध षड्रिपूंना चेतवले जाण्याशी जोडला जात होता, विविध प्रकारच्या अनंत वस्तूंना चैतन्यरूप प्राप्त झालं होतं आणि चैतन्यालादेखील वस्तुरूप मिळायला लागलं होतं, पर्यावरणास बायोमास या नावाने संबोधले जात होते आणि हे सगळे मास एनर्जीत कन्व्हर्ट करण्यासाठी चढाओढ सुरू झालेली होती.

गोष्ट ऐकणारा म्हणाला; आत्ता मला कळाले की तू सध्याच्या काळातलीच गोष्ट सांगतो आहेस. पण मला हे कळत नाहीय की मग आधीच्या त्या सगळ्या घटनांची जंत्री तू कशाला सांगत बसला आहेस. याच घटना सांगायला हव्या होत्या नुसत्या. चुटकीसरशी काळनिश्चिती झाली असती. गोष्ट सांगणारा म्हणाला; पण मला तर त्या सगळ्या लोकांची पण गोष्ट सांगायचीय. त्यांचे उल्लेख टाळून मला कसे चालेल काळनिश्चिती करताना. गोष्टीचा काळ सांगायचा तर गोष्टीत असणाऱ्या सगळ्यांचाच संदर्भ घ्यायलाच हवाय ना मला. गोष्ट ऐकणारा विचारात पडला. म्हणाला; हे सगळं गोंधळ निर्माण करणारं आहे. यापेक्षा तू सरळ तारीख सांगून मोकळा हो. मलासुद्धा फार वेळ नाहीय. इथे तू नमनालाच घडाभर तेल खर्चत आहेस. गोष्ट सांगणारा म्हणाला; हा सतत कॅलेंडर वापरण्याच्या आणि प्रत्येक दिवसाला तारखा चिकटवण्याच्या सवयीचा दुष्परिणाम आहे. हेसुध्दा एकप्रकारचं सपाटीकरणच आहे काळाचं. मला हे होऊ द्यायचं नाहीय. मला हे तीव्रपणे जाणवतंय, की गाढवांच्या पाठीवर अश्मयुगीन वस्तू बांधून भटकणारे आणि इंटरनेटवर प्रत्यक्ष कधीच न भेटलेल्या माणसाशी केवळ मेंदूनिशी संग करणारे, हे एकाच काळात असूच शकत नाहीत. मग मी त्यांना एकाच तारखेच्या गाठोड्यात एकत्र का बांधावं?

एकच काळ गृहीत धरण्याची पध्दत खरंतर भारतीय नाहीय. गोऱ्या युरोपियन माणसांचीच ही पध्दत आहे. ही माणसे अमेरिकेत पोहोचली तेव्हा तिथली स्थानिक रेड इंडियन मंडळी वेगळ्या काळात जगत होती. परकीय युरोपियन मंडळींना हे काळाचं वैविध्य किंवा एकुणातच वैविध्य मानवत नसल्यामुळे त्यांनी स्वतःचाच काळ सगळीकडे प्रस्थापित करून टाकला. परिणामी स्थानिक रेड इंडियन मंडळी त्यांच्या काळासकट नष्ट झाली. गोष्ट ऐकणारा म्हणाला; तू काळाबद्दल बोलतो आहेस की संस्कृतीबद्दल हे मला कळेनासे झाले आहे. गोष्ट सांगणारा म्हणाला; संस्कृतीचा आणि काळाचा घनिष्ट संबंध असतो. प्रत्येक संस्कृतीची काळाबद्दल विशिष्ट आणि स्वतंत्र अशी कल्पना असते. कित्येक आदिवासी संस्कृतींमध्ये काळाचा फार बडिवार माजवलेला नसतो. उलट आधुनिक पाश्चात्य समाजांमध्ये काळाचा नको तितका बडिवार माजवलेला आहे. त्यांना आपल्यापेक्षा वेगळा असा काळ खपत देखील नाही. ते आपलाच काळ तेव्हढा खरा मानतात. ते इतर काळांचा कसलाच आदर ठेवत नाहीत. तरीही खुद्द अमेरिकेतसुद्धा “आमिश” नावाची एक हट्टी जमात आहे, ज्यांनी आपला वेगळा असा काळ जतन करून ठेवलेला आहे. ही मंडळी वीज, यांत्रिक वाहने इत्यादींसारख्या आधुनिक काळात घेऊन जाणाऱ्या कन्व्हेयर बेल्टपासून दूर आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक आधुनिकपूर्व काळात राहायचं ठरवलंय. गोष्ट ऐकणारा म्हणाला; गोष्ट अजून नीट सुरू झालेली नाहीय याची आठवण मी तुला करून देतो. शिवाय आधुनिक पाश्चात्य समाजांवर टीका करणे फॅशनेबल जरी असले तरी सगळेच जण त्यातून होणाऱ्या फायद्यात डुंबत असतात हे मी नमूद करू इच्छितो. गोष्ट सांगणारा म्हणाला; गोष्टीबद्दलच्या आणि फायद्याबद्दलच्या रूढ कल्पना मला मान्य नाहीत. आधुनिक पाश्चात्य संस्कृतीची इंजिने षड्रिपूंच्या इंधनावर चालत असल्याचा परिणाम काळाचं ते काय करतात याच्यावरही होतो. इतर अनेक वस्तूंप्रमाणे काळ हीसुध्दा अपरिमित कंझ्यूम करायची गोष्ट आहे असं ते समजतात. त्यामुळे प्रत्येकाला जास्तीत जास्त काळ हवा असतो. याचाच परिणाम म्हणून जास्तीत जास्त वेगाने काळ पुढे नेण्याची चढाओढ सुरू झालेली दिसते. आजूबाजूच्या गोष्टी जेव्हढ्या वेगाने बदलतील, तेव्हढ्या वेगाने काळ पुढे गेल्याचा अनुभव येणार. त्यामुळे सगळंच सतत कॅलेडिओस्कोपसारखं बदलणारं आणताहेत ते. काहीच टिकाऊ नको आहे त्यांना. अगदी सामाजिक संस्था आणि नातेसंबंधसुध्दा. खूप भविष्यग्रस्त झाल्याने त्यांनी वर्तमानकाळ नासवून ठेवलाय त्यांचा. दग्धभू धोरणच म्हणायचं हे एकप्रकारचं. गोष्ट ऐकणारा म्हणाला; ही फारच तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया झाली. सगळी माणसं ज्या दिशेने चालली आहेत त्याच्या अगदी उलट आणि प्रतिगामी स्वरूपाचं असं काहीतरी बोलतो आहेस तू. जुन्या वेगवेगळ्या काळात राहणारी माणसं फार चांगल्या राहणीमानाचं जीवन जगताहेत असंही गृहीतक यामध्ये आहे. गोष्ट सांगणारा म्हणाला; केवळ सध्याच्या राहणीमानावरच सगळ्या गोष्टी तोलायच्या हे काही सूज्ञपणाचं नाही. हे जे समूह सतत अमर्यादित वेगाने नव्या काळात जायचा हव्यास बाळगून आहेत ते इतरांना रेटतच सतत पुढे जात राहतात आणि म्हणूनच इतरांचे राहणीमान बिघडवण्यास ते जबाबदार असतात. गांधीजींनी हिंदस्वराज्य या त्यांच्या पुस्तकात या सगळ्या गोष्टींचा घेतलेला कडक समाचार तू वाचलेला दिसत नाहीस. अगदी रेल्वे, इस्पितळे, न्यायालये यासारख्या गोष्टींनासुध्दा त्यांनी तीव्र नकार का दिला होता हे खरोखरी समजावून घेण्यासारखे आहे. त्यांनी प्रतीकासारख्या वापरलेल्या चरख्याला हा काळाचा संदर्भसुध्दा होताच. त्यांना चरख्याच्या चाकाने हा काळाचा वरवंटा रोखायचा होता. गोष्ट ऐकणारा म्हणाला; गांधीवादाचं प्रचारकी समर्थन करणारी सामाजिक गोष्ट सांगणार आहेस की काय तू. गोष्ट सांगणारा म्हणाला; मी काळाबद्दल बोलतो आहे हे तू लक्षात घेणं फार आवश्यक आहे. तुझ्या चिकाटीवर आणि लवचिक आकलनक्षमतेवर माझी सगळी भिस्त आहे.

गोष्ट ऐकणारा म्हणाला; अशानं तू तुझी गोष्ट कधीच पूर्ण करू शकणार नाहीस.

काळाचं सांगण्यातच संपून जाईल सगळा अवकाश.

(पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, जून २००७)

Tuesday, 12 July 2011

महारस्ता

महारस्ता



मुलुखच्या मुलुख बायपास करीत

चौपदर उधळलाय महारस्ता

शेतं तुडवत, डोंगर फोडत

गावांना टांगा मारत नद्या लांघत

बेगुमान निघालाय महारास्ता



ऊंच ठिकाणी ऊंच होत

सखल ठिकाणी सखल होत

जमीन बदलेल तसा

बदलत राहतो चालू



तासाच्या प्रवासाला त्याला

डोंगर लागतो आख्खा

कातरून खडी करून

रिचवून टाकतो पक्का



धुरांचे लोटच्या लोट पिऊन

तर्र होतो महारस्ता

ल्हास होतो पण भेलकांडत नाही

पडून राहतो निपचित रात्री

रेडियमचे मवाली डोळे मारत

कुणाला अंथरुणात घेईल

याची कधीच नसते खात्री



लागणखोर महारस्ता

फळवतो संसर्गजन्य वसाहती

पसरवतो अफवा

लावून देतो कलागती



वेगपूर्वकालीन वाटसरूंना

विचारीत नाही महारस्ता

यंत्रमुग्ध होऊन ऐकतो

वेगघोष आर्य मोटारींचा



धनगरी मेंढरांचे कळपच्या कळप

चालत राहतात महारस्त्यावरून

हजारो वर्षांच्या वहिवाटीला स्मरून

मेंढरांच्या इवल्या इवल्या पावलांचे

कसलेच स्पर्श होत नाहीत

महारस्त्यांच्या डांबरी खवल्यांना