Friday, 27 May 2016

शहीद भगतसिंह समग्र वाड्मय: भगतसिंहांच्या अपरिचित पण विलक्षण आणि धगधगत्या विचारविश्वाची आणि व्यक्तिमत्वाची भेट घडवणारा मौलिक ग्रंथ.


वयाच्या अवघ्या साडेतेविसाव्या वर्षी आपले जीवनपुष्प प्राणप्रिय देशावर आनंदाने ओवाळून टाकणार्‍या शहीद भगतसिंहाची ओळख एक सशस्त्र क्रांतिकारक आणि निस्सीम देशभक्त म्हणून सगळ्याच भारतीयांना आहे. पण इतक्या कोवळ्या वयात आपले आयुष्य देशाच्या चरणी हसत हसत अर्पण करणार्‍या शहीद भगतसिंहानी आपल्या अल्पशा आयुष्यात सखोल चिंतन आणि मनन केलेले होते आणि विविध विषयांवर विविध पद्धतीने आपली मते व्यक्त केली होती याची माहिती फारच कमी जणांना असेल. वयाच्या तेराव्या वर्षीच भगतसिंहानी असहकार आंदोलनात उडी घेतली होती. नंतर वयाच्या सोळाव्या वर्षी घराचा आणि शिक्षणाचा त्याग करून ते स्वातंत्र्य चळवळीत पूर्ण वेळ सहभागी झाले होते. आजोबा सरदार अर्जुनसिंह, दोन्ही काका आणि वडील यांच्याकडून भगतसिंहांना अन्यायाविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढण्याचा तेजस्वी वारसा मिळाला होता. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच विविध टोपणनावांनी विविध नियतकालिकांमधून लेखन केले. भगतसिंहानी वेळोवेळी केलेल्या आणि नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या समग्र लेखनाबरोबरच त्यांनी लिहिलेले इतर प्रदीर्घ लेख, केलेली भाषणे, प्रसृत केलेली घोषणापत्रे, लिहिलेली पत्रे, कारागृहात विविध ग्रंथांचे वाचन करताना केलेल्या नोंदवहीतल्या शेकडो नोंदी अशा अनेक दस्तऐवजांचे संपादन करून हा पाचशे नव्वद पानांचा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. मुळात हिंदी भाषेत २००४ साली प्रकाशित झालेल्या 'भगतसिंह के दस्तावेज' या संपादित ग्रंथामध्ये भगतसिंहांच्या ७६ दस्त ऐवजांचा समावेश होता. या दस्त ऐवजांमध्ये आणखी काही दस्त ऐवजांची भर घालून दत्ता देसाई यांनी २००७ साली भगतसिंहांच्या जन्मशताब्दी वर्षात मराठीतल्या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपादित केली होती. या वर्षी २३ मार्च २०१६ रोजी 'शहीद भगतसिंह समग्र वाड्मय' या ग्रंथाची दुसरी विस्तारित आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या आवृत्तीत एकूण १२३ दस्त ऐवजांचा समावेश आहे. हिंदी खंडातही नसलेले एकूण ४३ दस्त ऐवज या ग्रंथात समाविष्ट  केलेले आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर नोंदवल्याप्रमाणे भगतसिंहांचे आजवरचे सर्व उपलब्ध लेखन एकत्र आणणारा हा भारतातील एकमेव ग्रंथ आहे.

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षीच गंभीर स्वरुपाचे लिखाण सुरू करणार्‍या भगतसिंहांचे पुढच्या उण्यापुर्‍या सहा-साडेसहा वर्षातले विविध विषयांवरचे लेखन स्तिमित करणारे आहे. त्यांच्या तीव्र आकलनक्षमतेचे, असामान्य वस्तुनिष्ठतेचे, वैचारिक प्रगल्भतेचे, मांडणीतील स्पष्टतेचे आणि भाषेवरील प्रभुत्वाचे मोहक दर्शन या लेखनामधून होते. संपादकाने अनुक्रमणिकेत नोंदवल्याप्रमाणे या लेखनातील विषयांची वर्गवारी विद्यार्थी-युवकासांठी संदेश, स्वातंत्र्यासाठीच्या उठावांचा इतिहास, राजकीय कार्याबद्दलचे लेखन, आमूलाग्र समाजक्रांतीचा विचार, क्रांतिकारी नैतिकता, भाषा, साहित्य व समाज, आंतरराष्ट्रीय विचार, क्रांतिकारी चिंतन व अभ्यास आणि व्यक्तित्व दर्शन अशी करता येते. यातून या सगळ्या लेखनाचा प्रदीर्घ पट आणि आवाका दिसून येतो.

शहीद भगतसिंहांनी ’आजादी की भेंट शहादते’ या शीर्षकाची एक लेखमाला 'किरती’ नावाच्या नियतकालिकात लिहिली होती ज्यामध्ये त्यांनी विविध चौतीस शहिदांच्या बलिदानाचा परिचय वेगवेगळ्या लेखांद्वारे करुन दिला होता. ह्या लेखांमधून त्या सगळ्या शहीदांची भगतसिंहांनी केलेली वर्णने वाचताना अंगावर शहारे येतात. शहीदांच्या हौतात्म्यातील सौंदर्यावर फिदा झालेली भगतसिंहांची कविप्रतिभा या लेखांमध्ये बहरून आलेली दिसते. स्वत: भगतसिंह हौतात्म्यास ज्या चैतन्यमयी निश्चलतेने सामोरे गेले ते पाहता त्याच्या कितीतरी आधी लिहिलेल्या या लेखांमध्ये त्यांनी त्या हुतात्म्यांच्या समर्पण भावाने ओतप्रोत अशा भावभावनांचे अगदी तशाच प्रकारे केलेले वर्णन अनोखे आहे. डॉ अरुडसिंह यांच्यावरील लेखाची सुरुवातच ते अशी करतात – “देशप्रेमाने वेडे होऊन जळत्या दिव्याच्या पहिल्याच ज्वाळेत भस्म होणार्‍या एखाद्या मस्त पतंगाप्रमाणे त्यांनी आपले सर्व काही स्वाहा केले”. श्री मेवासिंह यांच्यावरील लेखात ते लिहितात – “शेवटी तो क्षणदेखील येऊन ठेपला. अहा! बघा तरी, तो ध्येयवेडा किती उत्साहाने फाशीच्या तख्ताकडे चालला आहे! भीती आणि काळजी यांचा लवलेशही त्याच्या आसपास नाही”. भाई बालमुकुंद यांच्यावरील लेखात ते लिहितात – “भाई बालमुकुंदांना फाशी झाली. असे सांगितले जाते, की त्या दिवशी त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. शिपायाच्या हातातून हात सोडवून घेत ते स्वतः फाशीच्या तख्तावर जाऊन पोहोचले. अहा! असे धाडस या क्रांतिकारकांशिवाय अन्य कुठे असेल. मृत्यूबाबत एवढी उपेक्षा दाखवण्याचे धाडस सर्वसामान्य लोक करूच शकत नाहीत”. हुतात्म्यांच्या समर्पणांचे गुणगाण करणारी ही वर्णने वाचताना असे प्रतीत होते की भगतसिंह एक प्रकारे स्वतःच्या भावी हौतात्म्याची पूर्वतयारीच करत होते. त्यांच्यात ओतप्रोत असलेली देशासाठी प्राणाची आहुती देण्याची तीव्र समर्पणेच्छा या लेखांमधून दिसते. भगतसिंहांची ही तीव्र समर्पणेच्छा त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी घरच्यांचा लग्नाचा आग्रह डावलताना वडिलांना लिहिलेल्या पत्रातही दिसून येते. पत्रात ते लिहितात – “माझे जीवन भारतीय स्वातंत्र्याच्या उच्च ध्येयासाठी अर्पण करण्यात आलेले आहे. त्यामुळे आरामदायी व प्रापंचिक सुखांचे आकर्षण यांना माझ्या जीवनात काहीच स्थान नाही. तुम्हाला आठवत असेलच, की लहान होतो तेव्हा आजोबांनी माझ्या मुंजीच्या वेळेस जाहीर केले होते, की मला देशसेवेसाठी अर्पण करण्यात आले आहे. म्हणूनच मी त्यावेळची प्रतिज्ञा पूर्ण करत आहे”.

या ग्रंथात समाविष्ट असलेल्या  भगतसिंहांच्या ’मी नास्तिक का आहे’ ह्या त्यातल्या त्यात प्रसिद्ध लेखाच्या अनुषंगाने भगतसिंह हे नास्तिक गृहस्थ होते इतपतच माहिती सर्वसाधारणपणे वाचकांना असते. पण स्वच्छ आणि सुस्पष्ट अशा विश्लेषण शक्तीचे प्रत्यय देणार्‍या ह्या लेखातून भगतसिंहांचा नास्तिक असण्यामागचा दृष्टिकोन त्याच्या खोली आणि रूंदीसकट तर समजतोच शिवाय त्यांच्या स्वतःकडेही तीक्ष्ण आणि परखड वस्तुनिष्ठतेने पाहण्याच्या क्षमतेचाही दाखला देतो. ते या लेखात म्हणतात – “पोकळ ऐट हा माझ्या स्वभावाचा नक्कीच एक भाग आहे. माझ्या सहकार्‍यांत मी एक एकाधिकारशहा म्हणून ओळखला जात होतो......काही मित्र गंभीरपणे तक्रार करतात की मी माझ्या नकळत माझी मते दुसर्‍यांवर लादतो. आणि माझे प्रस्ताव मान्य करून घेतो. त्यात काही अंशी तथ्य आहे हे मी नाकारत नाही.” नास्तिकतेबद्दलचे विवेचन करताना त्यांनी श्रद्धेच्या सकारात्मक बाजूचीही पुरेशी दखल घेतलेली दिसते. त्यांची स्वतःच्या नास्तिकतेबद्दलची भूमिका त्यामुळेच सहृदय, समतोल आणि शास्त्रकाट्याच्या कसोटीवरून सिद्ध झालेली वाटते. ते म्हणतात – “मला ठाऊकच आहे सध्याच्या माझ्या परिस्थितीत (फाशीची शिक्षा होउन कैदेत असतानाच्या) माझी जर देवावर श्रद्धा असती तर माझे आयुष्य सुसह्य झाले असते, माझ्या मनावरचा भार कमी झाला असता. उलट, देवावर विश्वास नसल्याने परिस्थिती जास्तच बिकट, रुक्ष आणि असह्य झाली आहे. थोड्याशा गूढवादाच्या स्पर्शाने ती काव्यमय झाली असती. पण माझ्या प्राक्तनाला सामोरे जाताना अशा प्रकारच्या कोणत्याही मादक कैफाची मदत मला नको आहे. मी वास्तववादी आहे. विवेकाच्या जोरावर माझ्यातल्या नैसर्गिक प्रवृत्तीवर मात करण्याचा माझा प्रयत्न आहे”. किती प्रांजळ आणि प्रगल्भ उद्गार आहेत हे.

देशासाठी प्राणाची आनंदाने आणि उत्साहाने आहुती देण्याचा निर्णय भगतसिंहांनी अगदीच अंत:प्रेरणेने पण तरीही एका पातळीवर नियोजनपूर्वक घेतला असणार असे वारंवार लक्षात येते. तसेच देशाच्या स्वातंत्र्याविषयी त्यांनी खोलवरचा विचार केला होता आणि त्यांच्या त्याबद्दलच्या विचारांना अभ्यासातून आलेली पक्की बैठक होती असेही दिसते. ते म्हणतात – “प्रथमदर्शनी मी एखाद्या दहशतवाद्यासारखे वागलो आहे असे दिसते. पण मी दहशतवादी नाही. मी एक असा क्रांतिकारक आहे, की ज्याच्या एका दीर्घकालीन कार्यक्रमाविषयी काही निश्चित आणि ठोस अशा कल्पना आहेत”. असेंब्ली बॉम्ब केसमध्ये दिलेल्या जबानीत त्यांनी क्रांती म्हणजे काय याची व्याख्या केलेली आढळते – “क्रांती म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी समाजव्यवस्था संपूर्णपणे उलथवून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे. या ध्येयाच्या पूर्तीसाठी आपले ताबडतोबीचे उद्दिष्ट आहे – सत्ता हस्तगत करणे. वस्तुस्थिती अशी आहे की, राज्यसंस्था म्हणजे शासकीय यंत्रणा हे सत्ताधारी वर्गाच्या हातातले स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी व जोपासण्यासाठी वापरायचे एक हत्यार आहे. आम्हाला ते हिसकावून घेऊन आमच्या ध्येयपूर्तीसाठी वापरायचे आहे”. भगतसिंहांच्या ’युवा राजकीय कार्यकर्त्यांना पत्र’ या दस्त ऐवजाबद्दल भगतसिंहांची पुतणी श्रीमती वीरेंद्र संधू यांनी “हा शास्त्रीय समाजवादी विचाराने भारतासाठी क्रांतिकारक कार्यक्रमाचा प्राथमिक आराखडा मांडण्याचा देशातील पहिलाच प्रयत्न असावा” असे म्हटल्याचे पुस्तकात नमूद केलेले आहे. भगतसिंह शास्त्रीय समाजवादाच्या विचाराने संपूर्णपणे भारलेले जरी असले तरी ते जर अधिक काळ जगले असते तर त्यांनी त्या विचारांचा नंतर भारतीय संदर्भात स्वतंत्रपणे विचार केला असता आणि स्वतःच्या प्रखर चिकित्सावादी दृष्टिकोनाच्या साहाय्याने पुढचा वैचारिक प्रवास केला असता असे त्यांचे समग्र लेखन वाचल्यानंतर प्रतीत होत राहते.

पुस्तकाच्या ’क्रांतिकारी चिंतन व अभ्यास’ या विभागात तुरूंगात असताना भगतसिंहांनी सुरुवातीस सुट्या कागदावर नोंदवलेली आणि नंतरच्या काळात तुरुंगाधिकाऱ्यांनी रीतसर उपलब्ध करून दिलेल्या वहीत केलेली टिपणे दिलेली आहेत. या नोंदींमध्ये १०७ लेखकांची नावे आणि अवतरणे आढळतात. संपादकांच्या भाषेतच सांगायचे झाल्यास “यातून भगतसिंहांचे वैविध्यपूर्ण, सखोल आणि जागतिक पातळीवरील साहित्याचे वाचन आपल्यासमोर येते. बालमजुरीचा निषेध करणार्‍या छोट्या कवितेपासून ते राज्यसंस्था आणि मानवी अधिकारापर्यंतचे विविध पैलू जसे यात दिसतात; तसेच भारत, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियाबाबतची आर्थिक आकडेवारी, संपत्तीच्या वाटपातील विषमता, कष्टकर्‍यांच्या शोषणाचे आकारमान व भांडवली पद्धतीमुळे या समाजांमध्ये होणारा विनाश हे जाणून घेण्यापासून ते मार्क्सची मूल्य संकल्पना समजून घेण्यापर्यंतची भगतसिंहांची धडपड त्यातून जाणवते.... “चिकित्सकपणा आणि स्वतंत्र विचारशक्ती हे दोन गुण क्रांतिकारकांसाठी अपरिहार्य आहेत” असे सांगणारे भगतसिंह “...भारतीय क्रांतीचे बौद्धिक अंग हे नेहमीच कमकुवत राहिले....यासाठीच क्रांतिकारकाने अभ्यास व चिंतन-मनन ही आपली पवित्र जबाबदारी मानली पाहिजे” असे जेव्हा तळमळीने सांगतात, तेव्हा त्यामागे त्यांची स्वतःची अल्पवयातील एवढी प्रचंड ज्ञानसाधना असते, हे विसरता येत नाही.”

पुस्तकामध्ये मूळच्या हिंदी आणि इंग्रजी दस्तऐवजांचा मराठीतील अनुवाद अर्थवाही आणि सुलभ पद्धतीने केलेला दिसतो. पुस्तकाची विषयवार केलेली विभागणीही  समर्पक आहे. जिथे जिथे आवश्यक आहे तिथे संदर्भासाठी, पार्श्वभूमी समजावून सांगण्यासाठी तसेच खुलासेवजा माहिती देण्यासाठी संपादकांनी संक्षिप्त प्रास्ताविके केलेली दिसतात. या प्रास्ताविकांमधून अनेक ठिकाणी त्यांनी भगतसिंहांच्या विचारविश्वाचे तसेच व्यक्तिमत्वाचे मर्म उलगडून दाखवलेले दिसते. भगतसिंहांचे अनेक अप्रकाशित दस्तऐवज कष्टाने गोळा करून त्यांचे अनुवाद करवून घेवून त्यांचे नेटकेपणाने संपादन करून हा महत्वाचा ग्रंथ सिद्ध केला गेलेला आहे.

भगतसिंहांचे सर्व प्रकारचे समग्र लेखन एकत्रित उपलब्ध करून देणारे हे पुस्तक भगतसिंहांविषयीचे आपले आकलन मोठ्या प्रमाणात विस्तारते. वरवर पाहता एक सशस्त्र क्रांतिकारक आणि प्रेरणादायी हुतात्मा अशीच ओळख असणार्‍या या थोर माणसाबद्दलचा आपला दृष्टिकोन हे पुस्तक वाचल्यानंतर पूर्णपणे पालटतो. सशस्त्र क्रांतिकारक, तीव्र समर्पणेच्छा असणारा हुतात्मा, सूक्ष्म आणि बहुपेडी राजकीय जाण असणारा मुत्सद्दी, शास्त्रीय समाजवादाबद्दल चिकित्सक विचार करणारा अभ्यासक, जमिनीशी पक्की नाळ असलेला कुशल संघटक, जनमानसावर गारूड करण्याचा  अंगभूत करिश्मा असणारा नेता या भगतसिंहांच्या विविध रूपांचे दिपवून टाकणारे दर्शन हे पुस्तक वाचताना होते. भगतसिंह जर आणखी जास्त काळ जगले असते तर भारताच्या समाजकारणाची आणि राजकारणाची दिशा कदाचित पूर्णपणे वेगळी झाली असती असे वाटत राहते. अशी दिशा देण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेकविध गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना तीव्रपणे येत राहतो.

                                                                                                                             (पूर्वप्रसिद्धी: सा. साधना)

Tuesday, 19 April 2016

उस्मानाबाद जवळचे तेर गाव - ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाचे पण दुर्लक्षित ठिकाण




उस्मानाबाद जवळच्या तेर गावास नुकतीच भेट दिली. इ.स. पूर्व चारशे पासून वस्ती असलेली आणि इसवी सनाचे पहिले शतक ते दुसरे –तिसरे शतक या काळात बहरलेली आणि नंतरही मध्ययुगापर्यंत महत्वाचे ठिकाण असणारी समृद्ध आणि सम्पन्न प्राचीन तगर नगरी. टॉलेमीने नोंद घेतलेल्या आणि पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या प्राचीन ग्रंथात पैठणनंतरचे महत्वाचे व्यापारी शहर म्हणून उल्लेखलेल्या या गावात फिरण्याची संधी मिळाली. अनेक पांढरीची टेकाडे तेरणा नदीकाठी दिसतात ज्यांचे उत्खनन होणे बाकी आहे. जिथे उत्खनन झाले आहे ते नंतर झाकून ठेवलेले आहे. पण जरा आतल्या बाजूने फिरायला लागलो की प्राचीन खापरांच्या तुकड्याचे खचच्या खच दिसायला लागतात आणि आपण दोनेक हजार वर्षे मागे गेलो आहोत असा अद्भुत भास होउ लागतो. इ. स. चौथ्या ते पाचव्या शतकातले त्रिविक्रम मंदिर (या मन्दिराच्या कालनिश्चितीबद्दल वेगवेगळी मते दिसतात), सहाव्या शतकातले उत्तरेश्वर मंदिर, त्याच काळातले कालेश्वर मंदिर या वास्तू बघण्यासारख्या आहेत.

                                                                          (त्रिविक्रम मन्दिर)


त्रिविक्रम मंदिर मूळचे विटांमध्ये बांधलेले आणि चैत्याच्या आकाराचे आहे. त्यामुळे ही वास्तू म्हणजे बौद्ध धर्मियांचा चैत्य होता असे म्हणतात. काही जणांनी हे पल्लव शैलीतले हिन्दू मंदिर असावे असेही म्हटले आहे.   

                                       (त्रिविक्रम मन्दिराचे चैत्य शैलीतले गजपृष्ठाकृती गर्भगृह)
             (त्रिविक्रम मन्दिराच्या मंडपाच्या छताच्या मध्यभागी असलेले प्राचिन लाकडी पुष्पवर्तुळ)

उत्तरेश्वर मंदिराचेही बांधकाम विटांचे आहे. विविध आकारातल्या आणि डिझाइनच्या विटा मनोहारी आहेत. विटांमधले कोरीव कामच जणू.  

 
                          (उत्तरेश्वर मन्दिर समोरच्या बाजूने)


                                                (शिखरावरील जुने विटकाम, उत्तरेश्वर मन्दिर)
                        (उत्तरेश्वर मन्दिराच्या प्रवेश्द्वाराची चौकट. सध्या ही म्युझियममध्ये ठेवलेली आहे)

तेर हे संत गोरोबा कुंभारांचेही गाव. संत गोरोबा कंभारांचे मंदिर कालेश्वर मंदिराशेजारी आहे.

                (गोरोबा काका कुंभार समाधी मन्दिर आणि कालेश्वर मन्दिराचे सामायिक प्रवेश्द्वार)


                                              (कालेश्वर मन्दिर बाजूने काढलेला फ़ोटो)
                    (कालेश्वर मन्दिराचे द्राविड पद्धतीचे शिखर जवळून)

टेराकोटा, पॉटरी, विटा इत्यादि मातीकामातल्या इतक्या सुंदर कलाकृती असणारया गावात पूर्वी कुंभारांची मोठी वस्ती असणेही स्वाभाविक. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील गावे (मच्छलीपट्टणम) ते पैठणमार्गे भडोच या सातवाहनकालीन व्यापारी महामार्गावरचे तगर उर्फ तेर हे महत्वाचे शहर होते. (काही विद्वानांच्या मते प्राचीन तगर म्हणजे जुन्नर तर काहीजण कोल्हापूर असेही म्हणतात. पण एकुणात तेर गाव हे जास्त प्रबळ दावेदार समजले जाते)

रामलिंगण्णा लामतुरे या गावकर्‍याने स्वत:च्या हौसेपोटी तेर परिसरात सापडणारया शेकडो प्राचीन वस्तूंचा संग्रह केला. त्यांचा खाजगी संग्रह त्यांनी नंतर सरकारला सुपूर्त केला. हे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. 

                                                                       (फोटो: इंटरनेटवरुन)
या संग्रहालयातही सुधारणा करायला भरपूर वाव आहे. आता इथे साधे ब्रॉशरसुद्धा उपलब्ध नाहीय. संग्रहालयातल्या प्राचीन रोमन व्यापाराच्या अनेक खुणा बाळगणारया विविध वस्तू मात्र आवर्जून बघाव्यात अशा आहेत. वस्तून्मधले वैविध्य वाखाणण्याजोगे आहे. अत्यंत बारीक कलाकुसर असलेले लाइमस्टोनमधले बारके साचे, उत्कृष्ठ दर्जाचे टेराकोटा आर्टिफॅक्ट्स (मद्याच्या सुरया, छोटे दिवे, इत्यादी), सातवाहनकालीन नाणी, लज्जागौरीची अनेक सुंदर सुंदर टेराकोटा आणि दगडातली शिल्पे (रा. चिं. ढेरे यांच्या मते लज्जा गौरी ही प्राचीन काळातली fertility शी संबंधित उपास्यदेवता होती), जैन तीर्थंकरांच्या सुंदर मुर्ती, प्राचीन बौद्ध स्तुपाचे दगडी अवशेष, उत्तरेश्वर मंदिरातल्या दरवाजाची अपूर्व असे कोरीव काम असलेली लाकडी चौकट अशा नाना सुंदर वस्तू इथे आहेत.

लज्जागौरीच्या अनेक छोट्या टेराकोटाच्या मुर्ती तेरच्या म्युझियममध्ये सापडतात. डॉ. ह. धी. सांकलिया यांच्या मते ही मूळची विदेशी देवता इजिप्तमधून रोमन संपर्काच्या काळात, ख्रिस्तोत्तर पहिल्या एक दोन शतकात भारतात आली. शहरी व्यापाराचा परिणाम म्हणून धार्मिक, सांस्क्रुतिक कल्पना, श्रद्धा यांचेही आदानप्रदान होणे स्वाभाविक असते. भारतातल्या मूळच्या सुप्रजननाविषयीच्या धार्मिक समजुती आणि देवकल्पनेवर ह्या व्यापाराच्या परिणामातून आलेल्या नव्या देवताआकाराचे आरोपण होउन लज्जागौरी हा प्रकार सुरु झाला असावा असे म्हणतात. त्यामुळेच या देवतामुर्ती मुख्यत: पश्चिम आणि दक्षिण भारतात (peninsular india) खासकरुन सातवाहन कालीन व्यापारी मार्गावरील ठिकाणांमध्ये सापडतात.

इतक्या सगळ्या अपूर्व अशा प्राचीन इतिहासाची साक्ष देणार्‍या गोष्टी असूनही तेर गावाची एक पर्यटन स्थळ म्ह्णून असलेली स्थिती दयनीय आहे. माहिती सांगणार्‍या गाइडची व्यवस्था नाही, गावात फ़िरताना मंदिरांची, महत्वाच्या वास्तूंची दिशा दाखवणारे फलक नाहीत., म्युझियममध्ये माहितीपर पुस्तिका नाहीत, गावकर्‍यांना इथल्या ऐतिहासिक वारशाबद्दल ममत्व नाही. तेर गाव जर युरोपात असते तर त्याचे किती कौडकौतुक झाले असते. किती देखणे म्युझियम गावात उभे राहिले असते किती सोयीसुविधा असत्या आणि जगभरचे पर्यटक आकर्षित झाले असते. आपल्याइथली डिफॅक्टो व्यवस्था अजूनही सरंजामी सत्राप पद्धतीचीच आहे. म्हणजे राज्य/प्रदेश पातळीवरचा एक म्होरक्या (उदा. साहेब वगैरे) आणि मग उपप्रदेश पातळीवरचे आणि खाली जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर. ह्यांच्यापैकी कुणालाही ऐतिहासिक दृष्टी किंवा टुरिझमच्या अंगाने व्हिजन असण्याची शक्यता नाहीय. आणि या दांडगटांना वगळून काही करता येणे कठीण आहे. शिवाय वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सध्ये समन्वयाचा अनुभव असतो. ASI  बद्दल तर न बोललेलेच बरे. तेरमध्ये त्रिविक्रम मंदिराचे रिस्टोरेशन करताना विटकामाच्या भिंतींवरून बाहेरुन चुन्याच्या भिंती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे या वास्तूचे अतिशय शोचनीय विदृपीकरण झाले आहे. अशीच परिस्थेती कालेश्वर मंदिराची आहे.

आपल्या इथे ऐतिहासिक दृष्टीचा दुष्काळ आहे. धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातले मेनस्ट्रीम मधले धुरीण अजूनही मध्ययुगीन दृष्टी बाळगुन आहेत तर बहुजन मंडळी गेल्या काही शतकात सापडलेल्या नव्या आयकॉन्सचे दैवतीकरण करण्यात मग्न आहेत. अशात मग आपल्या सम्पूर्ण प्रदेशाचा जवळपास तीनचार शतके सुवर्णकाळ असलेल्या सातवाहन काळाबद्दल सर्वांनी मिळून आत्मीयता आणि अभिमान बाळगणे तर फारच दुरापस्त गोष्ट झाली. सातवाहन काळ ही एकमेव राजवट अशी आहे की जिचे अवशेष महाराष्ट्राच्या सगळ्या विभागांमध्ये (खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण) सापडतात. शिवाय या लोकांचे मूळ महाराष्ट्रात होते आणि हल्ली मराठी भाषेचे मूळही या राजवटीच्या काळात शोधले जाते आहे.

अशा वेळी टर्कीसारख्या इस्लामी देशात, जिथे कित्येक शतके इस्लामी साम्राज्याचे गंडस्थळ होते, तिथे पुरातत्वशास्त्रास भरपूर महत्व देउन आपल्या कारकीर्दीत सम्पूर्ण तुर्कस्तानात उत्खननाची मोहीम हाती घेणारया केमाल पाशाची आठवण होते. हल्ली इस्लामिक नेते सातव्या शतकाच्या मागे सहसा जाउ धजत नाहीत. पण केमाल पाशाने उत्खननातुन उजागर झालेला टर्कीचा इ. स. पूर्व सहाव्या सहस्त्रकापासूनचा इतिहास वंदनीय मानला. उत्खननात सापडलेल्या तिसरया सहस्त्रकातल्या ब्रॉंझच्या काळविटाच्या शिंगासारख्या सुंदर मोटिफच्या शिल्पाकृतीची अंकाराच्या प्रमुख चौकात त्याने उभी केलेली प्रचंड मोठी प्रतिकृती बघण्यासारखी आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्या इथे या विषयाची होणारी परवड पराकोटीची आहे. तेरमध्येच अडुसष्ठ साली केलेल्या उत्खननात प्राचीन बौद्ध स्तुपाचे अवशेष मिळाले होते. सव्वीस मीटर व्यास असलेला हा स्तुप अद्वितीय होता (सांची स्तुपाचा व्यास 36 मीटर). स्तुपाची बांधणी एका मोठ्या चक्रात दुसरे लहान चक्र अशी होती. दुर्दैवाने या अवशेषांचा आता ठावठिकाणाही राहिलेला नाही. हा भाग आता नांगरटीखाली आहे. अवशेषांचे फोटोच फक्त आहेत. आणि हळहळ. तेरमध्ये काही नदीकाठच्या पांढरीच्या टेकाडांवर (archeological mounds) सध्या वस्ती आहे. या टेकाडांच्या नदीकडेच्या बाजूला जवळपास दहा पंध्रा फुट खोलीचे उभे छेद बघायला मिळतात. यात जुन्या वस्तींचे थर, वेगवेगळी खापरे, इ. बघायला मिळतात. 



                            (पांढर्‍या टेकाडाची नदीकडेची बाजू)



          (पांढर्‍या टेकाडाचा नदीकडेचा छेद जवळून. खापरांचे थर दिसताहेत)

मी अशा एका टेकाडाच्या नदीकडेच्या भागात फिरलो. हा परिसर म्हणजे अक्षरश: हागणदारी होती. फिरताना जमीनीवरची स्वच्छ भारत रांगोळी तुडवली तर जाणार नाही ना याची काळजी घ्यावी लागत होती. असा एकूण आनंदी आनंद आहे...

तेर सोलापुराहून नव्वदेक किलोमीटर अंतरावर आहे. उस्मानाबादहून पंचविसेक किलोमीटर. म्युझियममधल्या कर्मचार्‍यांकडून नीट माहिती घेतल्यासच गावातल्या इतर स्थळांना भेट देता येते. मी फ़िरत असताना इथल्या कर्मचार्‍याची मला खूप मदत झाली.

(संदर्भ: तेर, शां. भा. देव, प्रकाशक - पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभाग, सातवाहनकालीन महाराष्ट्र, रा. श्री. मोरवंचीकर, लज्जागौरी, रा. चि. ढेरे, The history and inscriptions of the Satavahanas and the Western Kshatrapas by V. V. Mirashi)