आपल्यापैकी बऱ्याच जणांना होम-स्टे नावाचा प्रकार ऐकून किंवा
अनुभवून माहिती असेल. पर्यटकाची राहण्याची आणि खाण्याची सोय यजमानाकडून काही एका
मोबदल्यात स्वतःच्या घरातच केली जाणे असे या प्रकाराचे थोडक्यात वर्णन करता येईल. गरजू विद्यार्थ्यांनी एखाद्याच्या घरातच राहणे आणि तिथे त्यांची
खाण्या-पिण्याची सुद्धा व्यवस्था काही एक मोबदला घेऊन केली जाणे ही पेइंग गेस्ट नावाची पद्धत आपल्याला परिचयाची आहे. तसेच एखादे कुलदैवताचे
ठिकाण असेल किंवा पिढीजात असे नेहमी भेट देण्याचे तीर्थस्थळ असेल तर अशा ठिकाणी
सहकुटुंब जाणे आणि तिथे राहणे, खाणे, आणि दर्शन या सगळ्या
सोयी नेहमीच्या पुजारी कुटुंबियांकडून एकत्रितपणे केल्या जाणे हीदेखील एक
पारंपारिक आणि परिचित अशी पद्धत आहे. या दोन्ही पद्धती आपल्या इथले जुने होम-स्टेचेच
प्रकार मानता येतील.
सध्या जगभर होम-स्टे टुरिझमचा चांगलाच बोलबाला आहे. एअरबीएनबी, ट्रीपअॅडवायझर यासारख्या वेब बेस्ड प्लॅटफॉर्म्स
मुळे एकूण जगभरच पर्यटन व्यवसायाची गणिते पूर्णपणे बदललेली आहेत. एअरबीएनबीने
प्रकाशित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०१७ सालात जगभरच्या एअरबीएनबी मार्फत होम-स्टे
चालवणाऱ्या स्त्री व्यावसायिकांनी १० बिलियन डॉलरचा
(साधारण ७२,५०० कोटी
रुपये) व्यवसाय केला. एअरबीएनबीचा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांमध्ये स्त्री
व्यावसायिकांचे प्रमाण ५५% आहे हे लक्षात घेता आणि एअरबीएनबी हा अनेक प्लॅटफॉर्मपैकी
एक आहे हे लक्षात घेता, सध्या होम-स्टे प्रकारातून जगभर किती मोठ्या प्रमाणात
पर्यटन-व्यवसाय केला जातो आहे हे लक्षात येते.
आपण आधी एअरबीएनबीचेच उदाहरण घेऊ यात. जिला कुणाला आपले घर काही
दिवसांसाठी भाड्याने द्यायचे आहे आणि ज्यांना ते तसे हवे आहे अशांना एकत्र
आणण्याचे काम ही कंपनी आपल्या वेबसाईटमार्फत करते. भाड्याने द्यायच्या घराची अतिशय
सविस्तर माहिती फोटोंसहित वेबसाईटवर उपलब्ध असते. समजा कुणाला
पॅरीसमध्ये होम-स्टे बुक करायचा असेल तर पॅरीस नाव टाकून सर्च केल्यानंतर त्या
शहरातले एअरबीएनबी वर रजिस्टर झालेले सगळे होम-स्टे दिसायला लागतात. होम-स्टेचे
भाडे ऑनलाईन भरण्याची सोय असते. घरात राहून गेलेली लोकं घराबद्दल सविस्तर फीडबॅक
(युझर रेटिंग्ज) देतात. सुयोग्य होम-स्टेची निवड करताना अशा सगळ्या
युझर रेटिंग्जचाच वापर केला जातो. घर भाड्याने देणारी लोकं पण घरे
वापरणाऱ्या पर्यटकांना रेटिंग्ज देतात.
नुकताच आम्ही युरोपमधल्या काही देशांचा दौरा केला. सगळ्याच
ठिकाणी आम्ही होम-स्टे मध्ये राहिलो. सगळी बुकिंग्ज आम्ही एअरबीएनबी मार्फत केली.
आम्ही पाचजण असल्यामुळे आम्हाला दोन बेडरूमचे फ्लॅट्स सोयीचे पडत असत. सुसज्ज
किचनची सोय असे. फ्लॅटचे भाडे पाचजणांमध्ये विभागल्यावर हॉटेलच्या तुलनेत बरेच
स्वस्त असे. शिवाय सकाळी निघताना हवा तसा नाश्ता करून निघण्याची सोय असे.
बाथरूममध्ये आणि इतर सगळ्याच खोल्यांमध्ये हॉटेलात ज्या वस्तू आणि सुविधा दिलेल्या
असतात (साबण, शांपू, टॉवेल, बेडशीट्स, इ.) त्या सगळ्या गोष्टींची
तजवीज केलेली असे.
स्वित्झर्लंड मधील ब्रिएन्झ या गावातला एक होमस्टे |
बऱ्याच ठिकाणी तर हॉटेलात खोल्या जशा सजवून तयार असतात तसे घर
सजवून तयार असे. होम-स्टे चालवणारी मंडळी युझर रेटिंग्ज मध्ये नकारात्मक टिप्पण्या
आणि रेटिंग्ज मिळू नये यासाठी दक्ष असत. परिणामी सगळ्याच गोष्टींमध्ये एक
व्यावसायिक दृष्टी आणि शिस्त जाणवली. नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठीच्या वस्तू
खरेदी करण्यासाठी जवळपासच्या सुपरमार्केटमध्ये जावे लागे. शिवाय होम-स्टे हे
रहिवासी वस्तीत असत. त्यामुळे आपोआपच स्थानिक लोकांशी जास्त संपर्क आला. या अनुभवावरून
आमच्या हे लक्षात आले की युरोप आणि अमेरिकेत वेबसाईटवरून बुकिंग करून होम-स्टे
मध्ये राहणे आता चांगलेच रूढ झालेले आहे. होम-स्टेचा पर्याय तिकडे हॉटेल इतकाच
खात्रीशीर आणि सुरक्षित मानला जातो आहे. भारतात मात्र हा प्रकार हळूहळू रुजतो आहे
.
केरळात पेरियार नदीच्या काठी असलेल्या थट्टेकड
नावाच्या छोट्या गावाजवळ सलीम अली पक्षी अभयारण्य आहे. काही वर्षांपूर्वी तिथे
जाताना आम्ही तिथल्या एका होम-स्टे मध्ये ऑनलाईन बुकिंग केले होते.
ट्रीपअॅडवायझरच्या वेबसाईट वरती आम्हाला या घराची माहिती मिळाली. अनेक पर्यटकांनी
घराबद्दल आणि घरमालकाबद्दल खूप चांगले रिव्ह्यूज लिहिले होते. एका मुक्कामाचे
पूर्ण पैसे आधीच ऑनलाईन भरून आम्ही तिथे रहायला गेलो.
थट्टेकड येथील होम-स्टे |
खालच्या मजल्यावर घरमालक स्वतः
सहकुटुंब राहत होता आणि वरच्या दोन खोल्या त्याने पर्यटकांसाठी राखून ठेवल्या
होत्या. भारतात फिरताना पहिल्यांदाच आम्ही होम-स्टेचा पर्याय वापरत असल्याने थोडी
काळजी वाटत होती. पण इतक्या छोट्या गावातला होम-स्टे असूनही सगळं अगदी मनाजोगतं
झालं. घरमालक हा उत्तम पक्षीनिरीक्षक आणि गाईड होता. त्याने सुयोग्य मोबदला आकारून
आम्हाला तिथले दुर्मिळ पक्षी दाखवले आणि उत्तम माहिती पण सांगितली. घरगुती जेवणाची
सोय उत्तम होती. खास केरळी पदार्थ चाखायला मिळाले. खोल्या स्वच्छ आणि नीटनेटक्या
होत्या. किमान आवश्यक अशा सगळ्या गोष्टी होत्या. भारतात अगदी रिमोट ठिकाणीदेखिल
होम-स्टे यशस्वीपणे चालवला जाऊ शकतो याचे जणू काही प्रात्यक्षिकच आम्हाला बघायला
मिळाले.
भारतात मुंबई, दिल्ली, चेन्नई, यासारख्या मोठ्या शहरांमध्ये युरोप
अमेरिकेप्रमाणे घरे होम-स्टे पद्धतीने भाड्याने देण्याची पद्धत पसरते आहे. शिवाय
शहरातलेच लोक ‘हौस अधिक व्यवसाय’ या दोन्ही कारणांनी निसर्गरम्य ठिकाणी घरे बांधून
होम-स्टे पद्धतीने भाड्याने देताना दिसतात. कोकणातल्या किनारपट्टीवरच्या गावातले
अनेक होम-स्टे हे शहरी चाकरमान्यांच्या मालकीचे असतात. याशिवाय दुर्गम भागातल्या
पर्यटनस्थळी स्थानिक रहिवासी देखिल होम-स्टे पद्धतीच्या सोयी पुरवताना दिसतात.
राजमाची, भंडारदरा या सह्याद्रीतल्या ठिकाणांमध्ये, हिमालयातल्या सुंदर
पण दुर्गम परिसरात तसेच लेह-लडाख परिसरात होम-स्टे रुजताना दिसताहेत. कमालीचे
सांस्कृतिक वैविध्य असणाऱ्या आपल्या देशात स्वतःच्या घरामध्ये रहावयास जागा देऊन
पाहुण्यांचे आतिथ्य करण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे होम-स्टे टुरिझमच्या
वाढीसाठी आपल्या देशात भरपूर वाव आहे. एका आकडेवारीनुसार भारतात पर्यटन क्षेत्रास
दरवर्षी दोन लाखखोल्यांचा तुटवडा भासतो. अशावेळी ही कसर होम-स्टे टुरिझम मार्फत
भरून काढणे सहज शक्य आहे. भारतातले सध्याचे पर्यटन धोरण मात्र मोठ्या प्रकल्पांना
महत्त्व देणारे आहे.
शहरात आढळणारे तसेच वरती उल्लेखलेले होम-स्टे ही सगळी व्यक्तिगत होम-स्टेची उदाहरणे झाली. या शिवाय अनेक ठिकाणी कम्युनिटी होम-स्टे सुद्धा आढळतात. कम्युनिटी होम-स्टेमध्ये पर्यटकांना राहण्यासाठी दिलेल्या घरे अथवा खोल्यांची मालकी किंवा व्यवस्थापन हे त्या कम्युनिटी मार्फत केले जाते. ही कम्युनिटी म्हणजे एखादा आदिवासी पाडा असू शकतो किंवा एखादे गाव असू शकते. यातून पर्यटकांना संपूर्ण गावाचा सांस्कृतिक अनुभव मिळणे अपेक्षित असते. स्थानिक संस्कृतीची जवळून ओळख व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. स्थानिक नृत्य पाहणे आणि शिकणे, स्थानिक खाद्यपदार्थ तसेच हस्तकलांचा आस्वाद घेणे, भातलावणीत सहभागी होणे, बैलगाडीतून फेरी मारणे यासारख्या गोष्टी यामध्ये मोडतात. व्हिएतनाम, कंबोडिया यासारख्या देशांमध्ये कम्युनिटी होम-स्टेचा एकंदर पर्यटनात प्रभावी वापर केलेला दिसतो.
शहरात आढळणारे तसेच वरती उल्लेखलेले होम-स्टे ही सगळी व्यक्तिगत होम-स्टेची उदाहरणे झाली. या शिवाय अनेक ठिकाणी कम्युनिटी होम-स्टे सुद्धा आढळतात. कम्युनिटी होम-स्टेमध्ये पर्यटकांना राहण्यासाठी दिलेल्या घरे अथवा खोल्यांची मालकी किंवा व्यवस्थापन हे त्या कम्युनिटी मार्फत केले जाते. ही कम्युनिटी म्हणजे एखादा आदिवासी पाडा असू शकतो किंवा एखादे गाव असू शकते. यातून पर्यटकांना संपूर्ण गावाचा सांस्कृतिक अनुभव मिळणे अपेक्षित असते. स्थानिक संस्कृतीची जवळून ओळख व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. स्थानिक नृत्य पाहणे आणि शिकणे, स्थानिक खाद्यपदार्थ तसेच हस्तकलांचा आस्वाद घेणे, भातलावणीत सहभागी होणे, बैलगाडीतून फेरी मारणे यासारख्या गोष्टी यामध्ये मोडतात. व्हिएतनाम, कंबोडिया यासारख्या देशांमध्ये कम्युनिटी होम-स्टेचा एकंदर पर्यटनात प्रभावी वापर केलेला दिसतो.
कोर्झोक (फोटो इन्टरनेट वरून) |
ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांनी
कम्युनिटी होम-स्टेचे प्रकल्प यशस्वीपणे राबवलेले दिसतात. लडाख भागातील कोर्झोक या
ठिकाणी WWF-India या संस्थेमार्फत चालवला जाणारा कम्युनिटी
होम-स्टे हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. WWF चे लोक, स्थानिक बौद्ध मठातले भिख्खू आणि गावातले
पुढारी यांच्या सहभागाने एका ट्रस्टची स्थापना केली गेली. हा ट्रस्ट कम्युनिटी
होम-स्टेचे कामकाज पाहतो. गावात राहणाऱ्या लोकांच्या घरातल्याच काही खोल्या
होम-स्टे साठी वापरल्या जातात. हा सगळा दुर्गम परिसर असल्यामुळे पर्यटकांची
जेवणाची सोय तसेच गाईड्सची तजवीज हे सगळं स्थानिक गावकऱ्यांमार्फत होतं.
वेगवेगळ्या देशातले दर्दी पर्यटक इथल्या उत्तम पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या
होम-स्टे मध्ये अनेक वर्षांपासून येत असतात.
भारतासमोर सध्या असलेली सगळ्यात बिकट समस्या ही बेरोजगारीची
आहे. होम-स्टे पर्यटन हा शहरी तसेच ग्रामीण बेरोजगारीवरचा प्रभावी उपाय ठरू शकतो. भारताच्या
पर्यटन विकासाच्या धोरणांमध्ये मात्र होम-स्टेचा ओझरता उल्लेख दिसतो. ‘इनक्रेडिबल इंडिया
बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम’ ही होम-स्टे टुरिझमच्या विकासासाठीची
भारतातली एकमेव योजना आहे. कम्युनिटी होम-स्टे साठीच्या उपक्रमांचा किंवा स्कीमचा
तर उल्लेखही धोरणात आढळत नाही. होम-स्टे टुरिझम मुळातच अनऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये
मोडत असल्याने त्याद्वारे नेमका किती रोजगार तयार होतो आणि जीडीपीमध्ये किती भर
पडते याचा वेगळा हिशोब ठेवला जात नाही. त्यामुळे देखील होम-स्टे टुरिझमचा तितक्या
गांभीर्याने विचार केला गेला नसावा. शिवाय गावपातळीवरच्या विकेंद्रित विकास
योजनांविषयीचा भारतातला आत्तापर्यंतचा अनुभव तितका उत्साहवर्धक नाही हेही एक कटू
सत्य आहे.
होम-स्टे
पर्यटनाचा विकास घडवून आणण्यासाठी शासनाने केंद्र आणि राज्य पातळीवर विशेष प्रयत्न
करणे आवश्यक आहे. नफ्याच्या उद्देशाने चालणारे आणि धंदेवाईक स्वरूप असलेले उपक्रम
शासन स्वतः चालवू शकत नाही हे आता सिद्ध झालेले आहे. त्यामुळे याबाबतीत शासनाने
खाजगी क्षेत्रातल्या यशस्वी प्रयोगांना पाठबळ देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कृषी-पर्यटनाच्या क्षेत्रात
Agri Tourism Development Corporation (एटीडीसी) ही पांडुरंग तावरे यांनी स्थापन केलेली
पुणे स्थित कंपनी महत्वाचे काम करत आहे. महाराष्ट्रातली जवळपास सव्वातीनशे
कृषीपर्यटन केंद्रे एटीडीसीशी संबंधित आहेत. शेतीमालकांनी सुरु केलेल्या या
कृषीपर्यटन केंद्रांना मार्केटिंग, जाहिरात, ब्रँडींग तसेच इतर सल्ला अशा सुविधा
एटीडीसी काही एक मोबदला घेऊन पुरवते. कृषी-पर्यटन होम-स्टे ला जवळचे असल्याने
एटीडीसीच्या या कार्यपद्धतीचा होम-स्टे च्या वाढीसाठीच्या योजना राबवताना उपयोग
होऊ शकतो.
गौतमी नावाच्या उद्योजिकेने चेन्नईत सुरु केलेल्या Travel Another India (टीएआय) या खाजगी कंपनीची कार्यपद्धतीदेखिल उद्बोधक आहे.
होम-स्टे मालकांच्या व्यवसायाचा व्याप छोटा असल्याने त्यांची मार्केटिंगसाठीची
आर्थिक ऐपत नसते. शिवाय पर्यटन व्यवसायासाठी लागणारी खास कौशल्ये त्यांच्याकडे
नसतात. टीएआय त्यांना मार्केटिंगसपोर्ट सोबतच होम-स्टे साठी आवश्यक अशा कौशल्यांचे
व्यवसाय प्रशिक्षण ही देते. याबदल्यात होम-स्टे मालकांच्या उत्पन्नातला ठराविक
वाटा टीएआयला मिळतो.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या होम-स्टे पर्यटनाचे अनुभव
या पार्श्वभूमीवर पाहण्यासारखे आहेत. रतनवाडी आणि सामरद या भंडारदरा परिसरातल्या
गावात आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी ग्रामस्थांना होम-स्टे साठीची छोट्या आकाराची उत्तम घरे बांधून दिलेली आहेत.
रतनवाडी येथील आदिवासी विकास विभागाने बांधून दिलेला होम-स्टे |
या घरांपैकी एका ठिकाणी आम्ही मुक्काम केला होता. पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने
हा सगळा परिसर खरं तर अतिशय समृद्ध आहे. भंडारदरा धरण, रतनगड, संधान व्हॅली, अशी सुंदर ठिकाणं
या परिसरात आहे. पण एका सर्वेक्षणानुसार इथल्या चाळीस टक्के होम-स्टे मालकांचे
उत्पन्न महिना पाच हजार पेक्षा कमी आहे. सगळ्याच लोकांचा मुख्य व्यवसाय अजूनही
शेती हाच आहे. आमचा इथल्या होम-स्टेमध्ये राहण्याचा अनुभव तितका आरामदायी नव्हता. होम-स्टे
साठीच्या खोल्यांची स्वच्छता आणि पर्यटकांसाठीच्या सोयी-सुविधा याबाबतीत हलाखीची
परिस्थिती होती. एकूणच व्यावसायिक
दृष्टिकोनाचा अभाव आणि भांडवली निधीची कमतरता यासारख्या गोष्टी हलाखीस कारणीभूत
असाव्यात. पैसे नाहीत म्हणून सुविधांचा दर्जा वाईट आणि त्यामुळे मिळणारे उत्पन्न
कमी आणि उत्पन्न कमी असल्याने सुविधा सुधारण्यासाठी पैसे नाहीत असे दुष्टचक्र
दिसून आले. बारी आणि रतनवाडी या गावात तर ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेला निधी
भक्तनिवासासारख्या इमारती बांधण्यासाठी वापरलेला आढळला.
बारी येथील भक्तनिवास इमारत |
उपलब्ध निधीतून होम-स्टे
पर्यटनास पूरक ठरू शकतील अशा सुविधा विकसित करण्याऐवजी वायफळ इमारतींवर खर्च करणे
यातून गावनेतृत्वाकडे सुयोग्य दृष्टीचा कसा अभाव आहे हे दिसून आले.
तुलनेत हरिहरेश्वर, दिवेआगर आणि श्रीवर्धन या कोकणातल्या
गावांमध्ये मात्र वेगळी परिस्थिती आहे. या ठिकाणी एकूणच स्वच्छता, नीटनेटकेपणा, व्यावसायिक
दृष्टीकोन, सेवा पुरवण्यातला खात्रीशीरपणा उजवा होता. इथे येणाऱ्या
पर्यटकांचा ओघही भरपूर आहे. इथल्या होम-स्टे चालकांना कुठल्याही सरकारी स्कीमचा
फायदा मिळत नाही. उलट बँकेची कर्जे काढून होम-स्टे विकसित करण्याची पद्धत इथे
दिसून येते. तरीही उच्च उत्पन्न गटातल्या भारतीय पर्यटकांना तसेच परदेशी
पर्यटकांना आकर्षित करण्याइतपत मजल अजून इथल्या होम-स्टेनी मारलेली नाही.
श्रीवर्धन येथील होम-स्टे |
कोकणातली गावे आणि कळसुबाई-भंडारदरा परिसरातील गावे या मधल्या
होम-स्टेची तुलना करता काही महत्वाचे मुद्दे लक्षात येतात. कोकणातल्या गावात
शहरीकरणाचे आणि साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. ही आता छोटी शहरेच झालेली आहेत.
तिथल्या होम-स्टे मालकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा उजवी आहे. याचाच परिणाम म्हणून
कोकणातल्या गावात होम-स्टेचा व्यवसाय जास्त व्यावसायिक, फायदेशीर आणि चांगल्या
पद्धतीने चालवला जातो. शहरीकरणातून जो वृत्तीबदल होतो तो केवळ सरकारी अनुदानातून
आणि मदतीतून होण्याची खात्री नसते. कोकणातल्या गावांमध्ये पर्यटकांचा जो ओघ येतो
तो काही प्रमाणात किनारपट्टीतल्या (coastal circuit) इतर पर्यटन स्थळांचा परिणाम म्हणून सुद्धा
येतो. कोकण किनारपट्टीकडे एक सिंगल-डेस्टिनेशन म्हणूनच जणू काही बघितले जाते.
परिणामी किनारपट्टीवरील सगळ्याच पर्यटनस्थळांना जास्तीच्या पर्यटकांचा पुरवठा
होतो. कळसुबाई-भंडारदरा परिसरातील गावांचे असे नाही. या ठिकाणी येणारे पर्यटक
दुसर्या कुठल्या ठिकाणाहून फिरत फिरत इथे आले असे होत नाही. सह्याद्रीचे किंवा
पश्चिम घाटाचे एक सिंगल-डेस्टिनेशन म्हणून ब्रँडींग आणि मार्केटिंग होणे कसे
आवश्यक आहे हेदेखील या तुलनेतून लक्षात येते.
ग्रामीण आणि दुर्गम भागातले होम-स्टे तिथल्या स्थानिक लोकांकडून
चालवले जात असल्याने मिळणाऱ्या उत्पन्नाचा सगळा वाटा तर स्थानिकांना जातोच शिवाय
पर्यावरणाच्या हानीचे प्रमाणही मर्यादित राहते. इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रांमध्ये तर
होम-स्टे पर्यटन हा अगदीच रास्त पर्याय ठरू शकतो. या कारणानेच महाराष्ट्रात
वनखात्यातर्फे काही अभयारण्यांच्या क्षेत्रात होम-स्टे बांधण्यासाठी ग्रामस्थांना
अनुदान देण्याची योजना आखलेली आहे. अशा प्रकारे चिरस्थायी विकासाच्या संकल्पनेशी
नाते सांगणारा आणि पर्यटनाचा खोलवरचा आणि खराखुरा आनंद देणारा पर्यावरणस्नेही
पर्याय म्हणून होम-स्टे टुरिझम अनेकांना आवश्यक वाटतो आहे. रोजगारनिर्मितीची
पुरेपूर क्षमता असणाऱ्या, ग्रामीण भागात संपत्ती-निर्मितीच्या शक्यता निर्माण करणाऱ्या
आणि पर्यावरणस्नेही विकास घडवू शकणाऱ्या होम-स्टे पर्यटनाचे महत्व वेळीच ओळखून
योग्य ती पावले उचलली जाणे आवश्यक आहे.
(पूर्वप्रसिद्धी: हेमांगी दिवाळी २०१८)
(पूर्वप्रसिद्धी: हेमांगी दिवाळी २०१८)
No comments:
Post a Comment