सलग चौथ्या दिवशी तो घरात बसलेला होता. फरश्या फोडण्याचे आवाज चालूच होते.
घरभर सगळीकडे सिमेंट आणि वाळू मिश्रित धूळ झालेली. फोडलेल्या फरश्या बाहेर घेऊन
जाणार्यांच्या पावलांच्या सिमेंटयुक्त ठश्याने घरातच बाहेरपर्यंत जाणार्या
वेगळयाच पाउलवाटा तयार झाल्या होत्या. एरव्ही ऐटीत आपापल्या ठिकाणी असणारं सामान
कसंबसं जुन्या बेडशिटा आणि चादरींच्या खाली माना मुडपून बसलेलं होतं. धुळीचा आाणि
सततच्या आवाजांचा वेढा गेल्या काही दिवसांपासून पडलेला होता. बायकोनं सतत
स्वयंपाकघराचा बालेकिल्ला मात्र धुळीपासून शाबूत ठेवला होता.
गेल्या कित्येक दिवसांपासून घरातल्या चार खोल्यांपैकी दोन खोल्यातल्या फरश्या
फुगून वरती यायला लागल्या होत्या. काही ठिकाणी फरश्यांना भेगा पडून त्या फुटायला
लागल्या होत्या. फुटणार्या फरश्या चालताना पायाला लागून दुखापती होण्याची शक्यता
वाढत चालली होती. एवढी वर्षे साथ देणार्या फरश्यांनी अचानक जमीन सोडायला सुरुवात
केली होती.
फरश्यातलं समजणार्या माणसाला बोलावलं तर तो म्हणाला की फरश्या बदलाव्या
लागतील. सोसायटीतल्या जवळपास सगळयाच घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे, बर्याच घरातल्या तर मीच बदलल्यायत असेही तो
म्हणाला. बाजारात तर्हतर्हेच्या नव्या फरश्या आहेत. हव्या तशा तुम्ही निवडू शकता.
लेबरचा खर्च तसा विशेष नाही पण एकूण एस्टिमेट फरश्यांच्या क्वालिटीवर अवलंबून असेल
असेही तो म्हणाला.
तीन दिवसांपूर्वी फोडाफोडीला सुरुवात झाली. आधी एका खोलीतल्या फरश्या सगळया
फोडून काढणार आाणि मग तिथं नवीन बसवणार आणि मग दुसर्या खोलीत पण तसंच. ”याच फरश्या नीट काढून त्यातल्याच चांगल्या परत
वापरता येणार नाहीत काय?“ त्यानं विचारलं होतं. ”नाही साहेब या एकदा काढल्या की त्यांचा काही
उपयोग नाही. म्हणून काढतानाच आम्ही या फोडून काढत असतो“ फरशीवाला म्हणाला होता.
पहिल्या खोलीतलं सगळं सामान एकेक करून हलवलं. भिंतीवर आज्जीचा फोटो होता. जुना,
नऊवारी साडी, नाकात नथ, गळयात बोरमाळ, मोहनमाळ आणि कसले कसले दागिने. इतक्या वर्षांनंतर
तो काढला तर भिंतीवर चौकोनी डाग दिसायला लागला. खरंतर तो चौकोन सोडता सगळी भिंत
डागाळलीये असं त्याला वाटून गेलं. फरशीवाला म्हणाला देखील फोटो काढला नाही तरी
चालेल म्हणून. पण त्याला वाटलं, नको उगीच धूळ बसायला.
त्यानं तो कापडात गुंडाळून इतर सामानात ठेवून टाकला. त्याच्या आकाराच्या बिनडागी
चौकोनाचा हक्क भिंतीवर शाबूत ठेवून निवांत पडला होता तो फोटो इतर सामानांच्या
गलबतात.
जड कपाटं त्या खोलीतून हलवताना तो नेहमीच्या काळजीनं म्हणाला फरशीवाल्याच्या
मजुरांना की सावकाश सरकवा, फरश्यांना चरे जातील. तर
ती पोरं हसून म्हणाली, कशाला काळजी करता,
आता फुटणारच आहेत त्या फरश्या.
घरच्या फरश्या बदलायच्या आहेत हे काही आठवडाभराची रजा घेण्यासाठीचं कारण होऊ शकत
नाही हे बायकोनं सुचवल्यामुळं त्याच्या आधीच लक्षात आलं. त्यामुळं चांगली
आठवडाभराची रजा आजारपणाखातर त्यानं काढली. आजारी असणार्या बायकोनं त्याला फरश्या
बदलताना त्याचं घरी असणं नेमकं पटवून सांगितलं होतं.
याच्याआधी काही त्यानं कामावरून रजा घेतली नव्हती असं नाही पण ते रजा घेणं
म्हणजे एका धावत्या चक्रावरून दुसर्या धावत्या चक्रावर गेल्यासारखं असे. आय टी
क्षेत्रात असल्यामुळे चक्रं बदलण्याचं चक्र तसं त्याला परिचयाचं होतं. किंबहुना
तेच ते चक्र फार दिवस रुचायचं नाही त्याच्या पायांना. बायको मात्र त्याची वेगवेगळी व्हिजिटिंग कार्डस आणि फोन नंबर्स सांभाळत वैतागली होती. तशी तीही त्याच्याइतकीच शिकलेली
असली तरी तिला चक्रहीन आवडत असल्यानं हाउसवाइफच होती. मुलगी पुरेशी मोठी झाल्याशिवाय
काही मी या चक्रात पडणार नाही असं तिनं ठरवलेलं होतं.
फरशीवाला म्हणत होता की सगळयाच खोल्यातल्या फरश्या बदलून घ्या. एकंदरीतच सगळया
घराचं रिनोव्हेशन कसं करता येईल याचा छोटा आराखडाही फरशीवाल्याने सादर केला. हे
ऐकून त्याचे डोळे लकाकले होते. पण बायकोनं ठाम विरोध केला. म्हणून तो बेत जमीन
नाही पकडू शकला. फरशीवाला म्हणत होता की सोसायटीतल्या जवळपास सगळयांनीच त्यांच्या
घराचं रिनोव्हेशन केलंय आणि आता तुमचं घर पण जुनं झालंय इत्यादी. पण त्याची डाळ
काही शिजली नाही. शाहिस्तेखानाच्या चारच बोटांप्रमाणे केवळ दोनच खोल्यातल्या फरश्यांवरच
भागल्यामुळं बायकोनं मात्र सुस्कारा टाकला होता.
पूर्णवेळ नुसतंच घरी बसायला लागल्यामुळं तो कंटाळून गेला होता. दिवसभराचा वेळ
त्याला आग्रहानं विनाकारण वाढून ठेवलेल्या ताटासारखा वाटत होता. सुरुवातीला एकेक
तासाएवढा वाटणारा घास नंतर एकेका सेकंदाइतका मोठा होत चालला होता. कसंबसं ढकलणं
चाललं होतं. एरव्ही घरी असताना सतत मालकाच्या मुठीची सवय असणारा रिमोट एका कोपर्यात
निष्प्राण पडलेला होता. सतत प्रकाशमान टीव्ही जुन्या चादरीत मुटकुळं करून बसला
होता. त्याचं राज्य फरशीवाल्या मजुरांनी काबीज केलं होतं आणि त्याची प्रजा दयनीय
झाली होती.
दोन दिवस बिनटीव्हीचे आणि निव्वळ बसून काढल्यानंतर मात्र त्याला काळाचं
दिवस-रात्रींमधूनचं सरपटणं जाणवायला लागलं. दिवसभरात प्रकाशानुसार बदलणारे घराचे
रंग दिसायला लागले. दुपारच्या वेळचा शांततेचा टिपेचा सूर तर त्याला थेट त्याच्या
लहानपणीच्या गावाकडच्या घरात घेऊन गेला. या सुराच्या पारंबीला लांबकळत त्यानं उडी
मारली तर तो त्यांच्या गावातल्या चौसोपी वाड्याच्या मधल्या चौकात जाऊन उभा राहिला.
तिथं जुन्या काळयाकुट्ट आणि पावलांच्या अनंत स्पर्शांनी मऊ झालेल्या दगडी फरश्या
त्याला दिसायला लागल्या. त्या फरश्यांमधले सगळे छोटे खड्डे, ज्यांचा उपयोग लहानपणी गोट्या खेळताना गलीसारखा व्हायचा,
त्याला तोंडपाठ आठवले. त्याच्या लक्षात आलं की
हल्ली गावाकडं जाणं फारच कमी आणि प्रसंगानुरूप झालंय. गावाकडचा वाडा तसाच आहे आणि फरश्याही
तशाच. पण इतक्या सगळया गावाकडच्या फेर्यांमध्ये तिथल्या फरश्यांकडे आपलं कधीच
लक्ष गेलेलं नाहीये. आणि तरीही त्या इतक्या चोखपणे शिल्लक आहेत आपल्या स्मृतीत.
फोडलेल्या फरश्यांचे तुकडे पोत्यात भरून मजूर चाललेले होते एकेक. इतक्या फेर्या
झाल्या तरी तुकडे संपत नव्हते. त्याला वाटले, फरश्यांना झालेल्या पायाचे स्पर्श घेऊन जायचे झाले तर किती
फेर्या होतील? पण मुलगी मात्र सगळया फरश्या
काढलेल्या बघून खूश झाली. मस्त सॅंडपिटच तयार झालंय म्हणाली. आता याच्यावर फरश्या
बिरश्या घालू नका. हे असंच असू दे असं ती म्हणाल्यावर सगळेच हसायला लागले.
प्रतिक्षिप्त प्रतिक्रियेने तोही हसला. पण नंतर त्याला प्रष्न पडला, मोठेपणी हिला कुठल्या फरश्या आठवतील?
आठ वर्षांपूर्वी दहा लाखात घेतलेल्या त्याच्या या घराची किंमत आता चौपट पाचपट
झाली होती. त्याच्याप्रमाणे आय टी कंपनीत काम करणार्या त्याच्या मित्रांनी मधल्या
काळात त्याच्या घराच्या दीडपट दुप्पट मोठी घरं घेतली होती. पण त्यानं मात्र नवव्या
मजल्यावरचं हे घर काही बदललं नव्हतं. सतत बदलणार्या त्या शहरात घरांच्या किंमती
प्रचंड वेगानं वाढत चाललेल्या होत्या. पूर्वीच्या काळी लग्नगडी असत तशी कित्येक
सुटाबुटातली माणसं या शहरात घरगडी झालेली होती.
घर घेतलं तेंव्हा काही घराच्या फरश्या त्याला आवडल्या नव्हत्या. गुळगुळीतपणाची
पुरेशी सवय नसल्यानं त्याला त्या आवडत नव्हत्या. फरश्या कशा धरून ठेवणार्या आणि
घरगुती असायला हव्यात असे त्याला वाटायचे. पण नंतर एकंदरच त्याला गुळगुळीतपणाची
सवय पडत गेली होती.
पण हे चार दिवस मात्र मुळीच गुळगुळीत नव्हते. त्याच्या संज्ञा अनवाणी व्हायला
लागल्या होत्या. त्याच्या लक्षात आलं की कित्येक वर्षांनतर तो बायकोबरोबर कारणाशिवाय
निवांत असा बसलाय. त्याला तीव्रपणे जाणवलं की बायकोचा चेहेरा दहा वर्षांपूवी
लग्नाआधी कोर्टशिप करताना जसा दिसे तसा नाही राहिला आता. थोडा रापल्यासारखा झालाय.
वय वाढल्याच्या खुणा दिसताहेत. पण हे काही त्यानं बायकोला सांगितलं नाही.
दुपारी उठून त्यानं चहा केला तर उकळलेल्या चहाच्या रंगीत पाण्याकडे तो कितीतरी
वेळ पाहात बसला होता. पहिल्यांदाच तो चहाच्या पाण्याचा रंग ताजेपणाने पाहात होता.
त्यात दूध घातल्यानंतर चहाच्या पाण्यात ढगांचे लोटच्या लोट भांडंभर पसरत गेलेले
त्याला दिसले. मुलीला खाण्यासाठी म्हणून डाळिंब फोडलं तर त्याला आतले डाळिंबाचे
खुबीनं कोंदणात बसवल्यासारखे नाजूक गुलाबी पारदर्शक दाणे खूपच बहारदार वाटले.
इतक्या वर्षांत पहिल्यांदाच त्यानं त्याच्या प्रोफेशनल वाटचालीकडं आणि एकूणच
वाटचालीकडं त्रयस्थपणानं बघितलं आणि तो अस्वस्थ झाला. फिरत्या चक्रावरून जमिनीवर
उतरल्यावर वाटतं तसं त्याला वाटायला लागलं. त्याचा गोंधळ उडाला.
फरशीवाल्या मजुरांनी सांगितलं की आता एक खोली पूर्णच तयार झालीय आणि दुसरी
खोलीही अर्धी झालीय. आता आणखी एका दिवसात दुसरीही खोली पूर्ण होईल आणि मग सामानही
खोल्यांमध्ये हलवता येईल.
हे ऐकून त्याला परत एकदा हुशारी आली. चला उद्यापर्यंत बसणार एकदाच्या सगळया फरश्या. रेखीव दिनक्रमाच्या फरश्या एकदा परत पायाखाली आल्या की लोंबकळता जीव स्थिर होईल आणि चार दिवस उनाड झालेल्या नाड्या परत संथ होतील असं म्हणून त्यानं टीव्हीच्या रिमोटची शोधाशोध सुरू केली.
(पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू)
हे ऐकून त्याला परत एकदा हुशारी आली. चला उद्यापर्यंत बसणार एकदाच्या सगळया फरश्या. रेखीव दिनक्रमाच्या फरश्या एकदा परत पायाखाली आल्या की लोंबकळता जीव स्थिर होईल आणि चार दिवस उनाड झालेल्या नाड्या परत संथ होतील असं म्हणून त्यानं टीव्हीच्या रिमोटची शोधाशोध सुरू केली.
(पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू)