Monday, 3 October 2016

आर्थिक वर्तणुकीच्या ढासळत्या निर्देशांकाचे काय?

सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक घोटाळ्यांचे जणू काही पेवच देशभर फुटल्याचे दिसते. राज्यकर्त्यांचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कॉर्पोरेटवाल्यांचे, व्यापाऱ्यांचे, व्यावसायिकांचे, असे अनेक आर्थिक घोटाळे बाहेर येताना दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिक नावाचा जो काही एक कल्पित घटक असतो, त्यास यातना देणाऱ्या आणि सुन्न करणाऱ्या या घटना आहेत असे एक ठोकळेबाज विधान सहज करता येऊ शकते. पण गंमत अशी आहे की अगदीच तळाचा रगडला जाणारा वर्ग सोडता, बाकी उरलेले सारेच ढिल्या आणि संशयास्पद आर्थिक वागणुकीचे दोषी दिसतात. फरक प्रमाणाच्या आणि होणाऱ्या एकंदर परिणामाच्या तीव्रतेच्या बाबतीत असतो.

मनुष्य हा आर्थिक प्राणी आहे असे म्हटले जाते. आर्थिक व्यवहार हे एकूण समाजव्यवहारांचा एक महत्त्वाचा भाग असतात. किंबहुना औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि एकंदरीत आधुनिकीकरण यांचा परिणाम म्हणून आर्थिक व्यवहारांना असणारे महत्त्व वाढत गेलेले दिसते. जसजशी आर्थिक व्यवहारांची व्याप्ती आणि त्यांचे महत्त्व वाढत गेले तसतसे आपोआपच त्यासाठीचे नियम, कानून, मूल्ये विकसित होत गेल्याचे दिसते. ही प्रक्रिया सगळ्याच समाजांमध्ये समान पद्धतीने आणि गतीने झालेली दिसून येत नाही. प्रत्येक समाजामध्ये असलेले या बदलांच्या प्रक्रियांचे वेगवेगळे स्वरूप हे त्याचे कारण असणार. खासकरून आपल्या समाजामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया बाहेरुन येऊन लागू झाल्याने आर्थिक व्यवहारांचे नवे सॉफ्टवेअर आले, मात्र नियम, कानून, मूल्ये यांची ऑपरेटिंग सिस्टीम मात्र जुनी अशी काहीशी विचित्र परिस्थिती झाल्याचे दिसते.

आपल्या इथे कित्येक शतके आर्थिक व्यवहारांचे वर्तुळ हे फारच थोड्या लोकांपुरते मर्यादित असे. आपले कुटुंबीय, विस्तारीत कुटुंबाचे सदस्य, भावकीवाले, ग्रामसमूहातले इतर सदस्य या मंडळींशीच तथाकथित आर्थिक म्हणता येतील असे व्यवहार होत. त्यात परत चलनाची भानगड फारशी नसायची. वस्तुरूप देवाणघेवाणींनीच सारा आर्थिक व्यवहार व्यापलेला असे. भरीस त्या व्यवहारांना इतरही तितकेच मातब्बर रंग व अर्थ असत. उदाहरणार्थ कुणबी आणि बलुतेदार यांच्यातल्या देवाणघेवाणीस सांस्कृतिक तसेच धार्मिक अर्थही तितकेच महत्त्वाचे असत. तो रोकडा आर्थिक व्यवहार कधीच नसे. शेतकऱ्यासाठी शेती करणे ही आर्थिक कृती नसून एका वेगळ्याच धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक पातळीवरचा तो व्यवहार असे. किंबहुना रोकडा आर्थिक व्यवहार हा प्रकारच तेव्हा अस्तित्वात नव्हता असे म्हणता येते. वस्तुरूप देवाणघेवाणींमध्ये बांधिलकी त्या देवाणघेवाणीशी कधीच नसे. ती कायम त्यामागील सांस्कृतिक, धार्मिक नियमनाशी असे. रोकडा आर्थिक व्यवहार जसा नव्हता तसेच त्यासोबतची आवश्यक अशी त्याच्याशी असलेली बांधिलकी, मूल्यव्यवहार, नियम इत्यादींचाही स्वाभाविक अभाव होता.

गेल्या काही दशकांमध्ये आपल्या इथे औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि एकंदरीत आधुनिकीकरणाच्या प्रक्रिया जरी सुरू झालेल्या असल्या तरी आर्थिक व्यवहारांबाबत आपण अजूनही आधुनिक झालेलो नाहीत. आपली बांधिलकी अजूनही रोकड्या आर्थिक व्यवहारांना नसून दुसऱ्याच कोठ्ल्या तरी गोष्टींना असल्याचेही बऱ्याचदा दिसून येते. ही एक मोठीच गॅप म्हणा किंवा कसर म्हणा, राहिल्याची दिसते, जी एका सार्वत्रिक ढिलेपणाला कारणीभूत आहे.

मागे एकदा माझा एक प्रामाणिक अधिकारी मित्र त्याचा अनुभव सांगत होता. तो त्याच्या एका नातेवाईकाच्या श्राद्धाच्या कार्यक्रमाला गेला होता. ते नातेवाईक सुद्धा एक मोठ्या पदावरील सरकारी अधिकारी होते निवर्तण्यापूर्वी. नोकरीतल्या सर्कलमध्ये ते एक भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणारे म्हणून माहीत होते. श्राद्धाचा कार्यक्रम गावी होता. सगळी भावकी आणि ग्रामसमुदाय जमलेला होता. माझ्या मित्राच्या असे लक्षात आले की त्या सगळ्याच लोकांमध्ये त्या नातेवाईकास जबरदस्त मान होता. अनेकजण त्यांनी कशी अमुक प्रसंगी तमुक प्रकारची मदत केली असे किस्से सांगत होते. सरकारी नोकरीत मर्यादित पगार मिळत असताना हे गृहस्थ इतके पैसे कोठून आणत याच्याशी त्यांची काही बांधिलकी नव्हती. त्या पैशाची वाटणी कशी केली जात होती ही बाब मात्र निर्णायक महत्त्वाची ठरत होती. थोडक्यात बांधिलकी वाटणीच्या तत्त्वाशी होती. पैसे मिळवण्याच्या पद्धतीशी नव्हती. नोकरीच्या सर्कलमध्येही ते एक नॉर्मल गृहस्थ म्हणूनच ओळखले जात असणार अर्थातच. पण या सर्कलमधल्या लोकांना हा गृहस्थ भरपूर पैसे खातो हे जितके गडद माहिती होते तितकेही त्या गावातल्यांच्या गावी नव्हते. ते पाहून मूळचा गावाकडचा असलेल्या माझ्या मित्राची ही खिन्न खात्रीच झाली की भविष्यात त्याच्या श्राद्धाला फारसे लोक उपस्थित राहण्याची काही शक्यता नाहीय. असो. तर मुद्दा हा की रोकड्या आर्थिक व्यवहारातल्या मूल्यांबद्दल फारशी पर्वा नसणे.

अर्थात वरती सांगितलेले उदाहरण याचेही निदर्शक आहे की आपल्या मंडळींच्या संवेदनकक्षांचे वर्तुळ मर्यादित असते. आपले कुटुंबीय, विस्तारीत कुटुंबाचे सदस्य, भावकीवाले, उपजातभाई, जातभाई, बोलीभाषावाले, भाषावाले, गाववाले, भागवाले, शहरवाले, प्रांतवाले अशा वर्तुळांचे अनंत पापुद्रे असतात. कांद्याच्या बाबतीत जसे सगळे पापुद्रे मिळूनच तो कांदा तयार होतो तसेच भारतीय माणसाचे असते. हे सगळे पापुद्रेच त्याच्या असण्याला अर्थ देतात आणि कारणही पुरवतात. त्यामुळे तो निसर्गत:च या विविध वर्तुळांसंदर्भातच विचार करतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारांना निव्वळ आर्थिक व्यवहार म्हणून बघणे त्याला जमत नाही. त्यांचा विचार कायम या वर्तुळांसंदर्भातच केला जातो.

एकुणातच अमूर्त गोष्टींची समज कमी असल्याची अडचणही इथे भोवत असल्याचे दिसते. एखादी गोष्ट सगळ्यांनी मिळून ठरवल्याप्रमाणे प्रामाणिकपणे करण्याचे जे काही अमूर्त मूल्य असते ते काही आपल्याला झेपत नाही. कुणा व्यक्तीसाठी, समूहासाठी, सगुण देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी वगैरे म्हटलं की मग आम्हाला स्फुरण चढतं. म्हणजे काहीतरी मूर्त पाहिजे. हीसुद्धा पापुद्र्यांच्या भानगडींशी नाते असणारीच भानगड म्हणायची. त्यामुळेच मग अमूर्त नियम शिरोधार्य ठरत नाहीत. असे नियम ठरवणारी कुणी व्यक्ती किंवा देव वगैरे लागतात जे शिरोधार्य ठरणे सोपे जाते. त्यामुळे मग व्यवस्था बनवण्याचे, शेकडो वर्षे बिनदिक्कत चालतील अशा संस्था उभ्या करण्याचे काम जवळपास अशक्यप्राय होऊन बसते. याचा परिणाम अर्थातच आर्थिक व्यवहारांची शिस्त पाळण्याच्या बाबत सुद्धा होतोच.

वस्तुरूप देवाणघेवाणीचा हॅंगओव्हर आहेर, हुंडा, काम झाल्याबद्दल देण्यात येणारे नजराणे यांच्या रूपातही वावरताना दिसतो. मत देणे आणि त्यामार्फत योग्य प्रतिनिधीची निवड करणे ही जी लोकशाहीची गाभ्याची गोष्ट आहे तीसुद्धा या देवाणघेवाणीच्या भानगडीने विकृत झालेली दिसते. आपण मतद्यायचे आणि त्याच्या बदल्यात काहीतरी घ्यायचे असा हा सरळ वस्तुव्यवहार (barter) असतो. सरकारी कार्यातल्या कर्मचाऱ्यांमध्येसुद्धा आपण सेवा देत आहोत हे मूल्य रुजवणे त्यामुळेच अवघड होऊन बसते. सेवा पुरवत असताना त्याचवेळेस उलट्या बाजूनेही वस्तुरूप किंवा मुद्रारूप परतफेडीची अपेक्षा केली जाते. हे सगळ्यांच्या रक्तात असल्यासारखेच वाटते. निव्वळ राजकारणी मंडळींच्या माथी फोडून हे सगळं त्यामुळेच सुटणारं नाही

पुढाऱ्यांच्या, बाबूमंडळींच्या बाबत जसे हे लागू आहे तसेच कॉर्पोरेट्सच्या बाबतही लागू आहे. मोठमोठ्या कंपन्या अजूनही कुटुंबियांच्या जबड्यात असतात. आर्थिक व्यवहारांना फारच छोट्या वर्तुळाच्या परिघातून बघितले जाते. हे वर्तुळ एकंदर समाज वगैरे तर दूरच, शेअरहोल्डर्स पुरते सुद्धा नसते. कंपनीचे मूळ मालक आणि त्यांचे कुटुंबीय इतकेच हे वर्तुळ मर्यादित असल्याचे बऱ्याचदा दिसते. त्यामुळे खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट गव्हर्नन्स आपल्याइथे अद्याप रुजलेला नाहीय.  

एकंदर समाजातच बऱ्यावाइटाचे मूल्यमापन करताना आर्थिक वागणुकीला वगळण्यात आल्याचे दिसते. प्राप्तिकर खात्याची धाड एकदा एका प्रतिष्ठित व्यावसायिकावर पडली होती. धाडीच्या वेळी घरी सापडलेल्या बेहिशेबी संपत्तीच्या आणि आर्थिक व्यवहारावरुन असे स्पष्ट होत होते की ते गृहस्थ इतर अनेक व्यावसायिकाप्रमाणे दणकून करचुकवेगिरी करत होते आणि त्यांनी भरपूर मायाही जमा केलेली होती. त्या सगळ्या पुराव्यांबद्दल चर्चा करत असताना ते गृहस्थ सतत स्वत:च्या वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाबद्दल सांगत होते. शेवटी वैतागून त्यांना विचारावे लागले की सदगृहस्था, मग या आर्थिक व्यवहाराच्या गोष्टी तू नीट का नाही केल्यास. आणि जर या गड्ड्याच्याच गोष्टी जर तू नीट करत नसशील तर बाकी टरफलांचं काय सांगतो आहेस. पण त्या गृहस्थांच्या लेखी आर्थिक व्यवहारांचा चोखपणा ही काय फार महत्त्वाची गोष्ट अर्थातच नव्हती. सर्वसाधारणपणे सगळीकडेच हे चित्र दिसून येते. बाहेर समाजात प्रतिष्ठित असणारी, विविध पारितोषिकांनी गौरवली गेलेली, सांस्कृतिक, साहित्यिक, धार्मिक आणि इतर जवळपास सगळ्याच क्षेत्रात दिग्गज असणारी माणसे देखिल दूषित अर्थव्यवहार करताना दिसतात.

काळ्या पैशाची साधी व्याख्या करता येते. नोंद न होता फिरणारा पैसा. साहेब, पावती केली तर वस्तू दहा रुपयांना मिळेल, बिनपावतीची आठ रुपयाला असे दुकानदाराने सांगितल्यानंतर पंच्याण्णव टक्के लोक पटकन आठ रुपये काढून दुकानदाराला देतात. त्याचक्षणी ते आठ रुपये जर तत्पूर्वी पांढरे असतील तर काळे होतात. काळे पैसे केवळ दूर कोठेतरी स्विस बॅंकेतच असतात असे नाही. आपल्या इथे सुद्धा ते तितक्याच धक्कादायक पद्धतीने अस्तित्त्वात असतात. अर्थात या परिस्थितीला केवळ लोकांची मानसिकताच कारणीभूत आहे असे नाही. अनेक गुंतागुंतीचे घटक त्यासाठी कारणीभूत आहेत. उधाणत्या भांडवली अर्थकारणात इंधनासारखी वापरली जाणारी हव्यासाची भावना असो की एकूण प्रभावी गव्हर्नन्सचा अभाव असो असे अनेक घटक सांगता येऊ शकतात. परंतू तो एक वेगळाच विषय आहे. मालमत्तांचे व्यवहार असोत की किरकोळ खरेदीविक्रीचे व्यवहार असोत हा काळ्यापांढऱ्याची सरमिसळ असणारा प्रवाह सर्वव्यापी दिसतो.

आर्थिक व्यवहारात चोखपणा येणे ही यामुळेच केवळ उत्तम करप्रशासनामुळे साधता येणारी बाब नाहीय. त्यासाठी एकंदर मानसिकतेमध्ये, सर्वसाधारण दृष्टिकोणामध्ये आणि मूल्यसरणीमध्ये मूलभूत दुरुस्त्या होणे आवश्यक आहे. इंटेलिजन्स कोशंट, इमोशनल कोशंट च्या धरतीवरच आपला सिस्टीम कोशंट सुधारणे आवश्यक आहे. चांगल्या व्यवस्था निर्माण करणे, त्या टिकवणे आणि व्यवस्थित चालवणे यासाठीची सामूहिक क्षमता विकसित करावी लागणार आहे. पापुद्र्यांच्या पलीकडे जाऊन अमूर्त मूल्यांशी आणि नियमांशी बांधिलकी ठेवून आर्थिक वर्तन करण्यासाठीचे संस्कार नव्या पिढीवर होणे आवश्यक आहे. तरच आर्थिक वागणुकीचा ढासळता निर्देशांक सुधारण्यास सुरुवात होऊ शकेल.
                                                                                                                                                        पूर्वप्रसिद्धी: दै. लोकसत्ता      

No comments:

Post a Comment