Saturday 6 October 2012

गोष्ट मेंढा गावाची

मागच्या महिन्यात मिलींद बोकील यांनी लिहिलेले "गोष्ट मेंढा गावाची" हे पुस्तक प्रकाशित झाले (मौज प्रकाशन). पुस्तकात बोकीलांनी मेंढा (लेखा) या गडचिरोली जिल्ह्यातल्या गावात गेल्या काही दशकांमध्ये स्वयंशासनाचा जो प्रयोग झाला त्याचे फार सुंदर वर्णन केले आहे. "दिल्ली-मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार" अशी घोषणा घेऊन सर्वसहमतीने गावचा कारभार चालवणे अशी प्रक्रिया मेंढ्यात बर्‍याच काळापासून चालू होती. गावातलेच देवाजी तोफा हे गृहस्थ आणि मोहन हिराबाई हिरालाल हे सर्वोदयी कार्यकर्ते हे या चळवळीचे धुरीण. २००६ साली लोकसभेत मंजूर झालेल्या आणि २००८ साली नियमावलीसहित तयार झालेल्या वनहक्क कायद्यानुसार गावातल्या वनसंपदेवरचे सामुहिक हक्क मिळवणारे मेंढा हे भारतातले पहिले गाव (ऑगस्ट २००९). त्यानंतर गावाने आपल्या मालकीच्या बांबूची विक्री रीतसर लिलाव वगैरे करून व्हॅट भरून PAN, TAN वगैरे काढून केली. मे-जून २०११ मध्ये २१,५०,००० रुपयांची बांबूविक्री झाली आणि २०११-१२ या सालातल्या बांबूविक्रीसाठीची निविदा एक कोटी शहाण्णव हजारांची झाली.



मेंढा गावाने स्वतः होऊन शिक्षण, ग्रामविकास यासंदर्भातल्या योजनासुध्दा गावपातळीवर राबवल्या आहेत. बोकील पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे "मेंढा गावाच्या प्रक्रियांचे सारांशाने वैशिष्ट्य म्हणजे त्यातून त्यांनी सत्ता (पॉवर) या विषयाच्या चर्चेला हात घातलेला आहे". बोकील पुढे म्हणतात, "मेंढा गावातल्या प्रक्रिया मूलतः राजकीय प्रक्रीया आहेत. त्यांच्याकडे सर्वंकष राजकीय आणि सामाजिक चर्चेला खाद्य पुरवणार्‍या संकल्पना म्हणून बघायला पाहिजे. मेंढा हे त्या अर्थाने नवीन संकल्पना मांडणारे गाव आहे. गावाचा कारभार गावाने बघण्याचा मुद्दा असो, दिल्लीतले सरकार आपले आहे असे म्हणण्याचा असो वा आपल्या जंगलावर आपला ताबा हवा असे म्हणण्याचे असो; मेंढा गावाने आपल्याला विचार करण्यासाठी हा सगळा ऐवज पुरवलेला आहे".


नोव्हेंबर २०११ मध्ये मी, सतीश खंडारे आणि प्रकाश पोटे मेंढा गावी गेलो होतो. तेथे देवाजी तोफा यांना भेटणे आणि त्यांच्याकडून त्यांचे विचार आणि अनुभव ऐकणे हा अविस्मरणीय अनुभव होता. सोबत तेंव्हा मेंढा गावच्या ग्रामसभेच्या कार्यालयासमोर काढलेला फोटो जोडला आहे. फोटोत माझी मुलगी यशोदा, प्रकाश, सतीश, देवाजी आणि मी आहोत.


2 comments:

  1. मेंढालेखामध्ये जे काही घडतं आहे, ते इतरत्र का नाही घडू शकलं इतक्या काळानंतरही - याचं विश्लेषण आहे का बोकील यांच्या पुस्तकात?

    ReplyDelete
  2. असं काही विश्लेषण पुस्तकात नाही. पुस्तकात त्याच्या नावाप्रमाणे मेंढा गावाची गोष्ट सांगितली आहे. गावात खूप आधीपासून पारंपारिक शहाणपणातून आलेलं सर्वसहमतीने सार्वजनिक निर्णय घेऊन गोष्टी करण्याचं तत्व प्रचलित असल्याचं लेखकांनी सांगितलेलं दिसतय. नंतर मोहन हिराबाई हिरालाल यांचे प्रयत्न आणि देवाजी तोफा यांच्या नेतृत्वाखाली गावसमुदायाने त्यास दिलेली साथ यामुळे त्या तत्वाचा सध्याच्या परिस्थितीत कसा विकास आणि उपयोजन होऊ शकतो हे सिध्द झाले. गोटूलची संस्था, सर्वसहमतीचं तत्व यासारख्या पारंपारिक शहाणपणातून आलेल्या गोष्टींच महत्त्व पुस्तकातून अधोरेखित होतं. मागच्या दोनेकशे वर्षात आपल्या इथल्या अशा कितीतरी जुन्या सूज्ञपणातून उपजलेल्या गोष्टी हरपल्या. नव्या बदललेल्या स्थितीत त्यांचा कसा उपयोग करून घेता येऊ शकतो ही नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे. मेंढालेखात जे घडलं ते बरंचसं तिथल्या परिस्थितीच्या अशा unique घटकांमुळे घडलं. ते फक्त तिथेच घडल्याने त्याचे महत्त्व कमी होत नाही. इतरत्र असं काही चांगलं कदाचित निराळ्या पध्दतीने घडू शकत असेल. काही ठिकाणी जुनं भरपूर आहे पण नवं पुरेसं नाही तर ते अंगिकारुन बदल घडणे तर काही ठिकाणी जुन्यानव्याचा मेळ असंही ते असू शकतं. लाखो वाटा असू शकतात. किंवा नायपॉल म्हणाला (जरी मला तो विशेष आवडत नसला तरी) तशा million mutinies.

    ReplyDelete