Thursday 2 August 2012

गो.पु. देशपांडे लिखित सत्यशोधक नाटकातील जोतिबा फुल्यांच्या बांधकामाची चिकित्सा आणि पुढची चर्चा

गो.पु. देशपांडे लिखित सत्यशोधक नाटकातील जोतिबा फुल्यांच्या बांधकामाची चिकित्सा आणि पुढची चर्चा


१. बांधकाम आणि चिकित्सा:

गो. पु. देशपांडे यांनी सत्यशोधक या जोतिबा फुल्यांवर लिहिलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग हिंदीत दिल्लीमध्ये १०/९/९२ रोजी आणि मराठीत कोल्हापुरात ६/१०/९३ रोजी झाला. नाटकाची मराठी लेखी आवृत्ती १९९६ साली प्रकाशित झाली. प्रत्येक साहित्यकार आपल्या साहित्यकृतीत काही एक बांधकाम करत असतो. वाचकागणिक ते बांधकाम वेगवेगळे प्रतीत होऊ शकत असले तरी साहित्यकाराच्या बांधकामाचा काही एक अंदाज बांधता येऊ शकतो. गोपुंनी नाटकामध्ये केलेले जोतिबा फुल्यांचे बांधकाम समजावून घेऊन पुढची चर्चा करण्याचा प्रयत्न सदर लेखाद्वारे करण्याचे प्रयोजन आहे. असे करताना नाटकाची लिखित संहिताच केवळ विश्लेषणासाठी समोर ठेवलेली आहे. विविध काळात झालेल्या नाटकाच्या विविध मंचनाचे संदर्भ घेतलेले नाहीत.


नाटकातली सूत्रधारवजा पात्रे सुरुवातीलाच नाटकाविषयी खुलासा करतात की हे नाटक नसून एक प्रकारचा सत्यशोधकी जलसा आहे. सत्यशोधकी जलसा म्हणजे “सत्यशोधक समाजाने आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी नाटकाचा घाट वापरुन निर्माण केलेला प्रकार” असाही खुलासा पुढे आहे१. संहितेतच सुरुवातीस नमूद केले आहे की नाटकात “जोतिबांचे अल्पसे दर्शन घडवण्याचा इरादा आहे”२. “त्यांच्या विचाराकडे, कर्तृत्वाकडे तुमच्या आमच्या जमान्यात वळून बघण्यासाठीचे नाटक आहे”३. शिवाय “इतिहासाकडे डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न आहे”४. नाटकाच्या सुरुवातीलाच उद्दिष्टांविषयी येणारे हे खुलासे महत्त्वाचे आहेत. संहितेचा भाग असलेल्या या सुरुवातीच्या खुलाशांच्या जोडीनेच संहितेबाहेरील असलेल्या गोपुंच्या जोतिबांवरच्या लेखाचाही संदर्भ घेणे उपयोगाचे आहे. मूळ इंग्रजीत असलेल्या या लेखाचा मराठी अनुवाद सत्यशोधक नाटकाच्या २०१२ साली प्रकाशित झालेल्या दुसर्‍या आवृत्तीत “भारतीय समाजातील वर्ण / वर्गाचे विश्लेषण” या शीर्षकाने समाविष्ट करण्यात आलेला आहे५.


नाटकाचा घाट हा चरित्रनाटकाचा आहे. चरित्रनाटक असल्याने ते मुख्यतः चरित्र सांगताना पाळावयाच्या अटींनी आकारित होणे अपेक्षित आहे. एकंदर नाटकाच्या सुरुवातीचे खुलासे आणि नाटकात निवेदकाकडून होणारे काळाचे वास्तववादी उल्लेख पाहता (ब्राह्मण पंतोजीचा पोवाडा जून १८६९ च्या सत्यार्थदीपिकेत छापला होता आणि त्यावर प्रकाशकांनी काय टीपा जोडल्या होत्या आणि त्यावर फुल्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नव्हती याचा सविस्तर उल्लेख निवेदकामार्फत होतो. शिवाय या टीपांचे विश्लेषण कसे करावे याचेही मार्गदर्शन निवेदक करतात६) सदर चारित्रनाटकाचा घाट हा वास्तववादी प्रकारातला आहे असे कळते. यामुळे चरित्र सांगतानाच्या अटी जास्त धारदार आणि बांधणार्‍या ठरतात. या अटींचा परिणाम म्हणून नोंदवलेल्या गेलेल्या घटना आणि त्यांचा काळ, जसा की जन्म, मृत्यू वगैरे, यांची authenticity राखणे आवश्यक बनते. म्हणजे त्या दाखवताना वेगळ्याच प्रकारे आणि वेगळ्याच काळात दाखवता येत नाहीत.


चरित्रविषयाबद्दलची नोंदणूक जितकी कमी तितके लिहिणार्‍याचे स्वातंत्र्य जास्त. (हल्लीच्या प्रत्येक क्षण आणि क्षण डिजिटाईज करायच्या काळात अतिरेकी नोंदणूक होऊन चरित्रलेखन दुष्कर होत जाणार). दुसरे म्हणजे चरित्रनाटकात व्यक्तीचे विचार दाखवण्याबाबत मात्र तुलनेने जास्त वाव असणार. त्यातही त्या व्यक्तीने स्वतः भरपूर विचार मांडलेले असतील आणि ते नोंदवले गेलेले असतील तर तो वाव त्या प्रमाणात कमी होणार. नोंदवलेल्या घटनांच्या बाबत जशी एक सक्ती निर्माण होते तशी सक्ती नोंदवलेल्या विचारांबाबतसुध्दा होते. त्या त्या बारक्या विषयाबाबत मग तुम्ही त्या त्या पात्राच्या तोंडी वेगळेच विचार नाही घालू शकत. अर्थातच extrapolation साठी काही प्रमाणात वाव असणार. एखाद्या मुद्द्यावर नोंदवलेले विचार नसतील तर त्याचा आडाखा बांधता येऊ शकतो. एखाद्या विषयावरचे नोंदवलेले विचार फारच तुटपुंजे आणि काही एक पक्का निष्कर्ष काढण्यासाठी जो काही एक critical mass पाहिजे असते तिथपर्यंत न जाणारे असतील तर तिथेही थोडा वाव मिळतो. पण तो वाव reasonability च्या चौकटीत घेणेच अपेक्षित असणार.


चरित्रनाटक करताना ठराविक अवकाशाची मर्यादा असल्यामुळे नाटककाराला घटनांची आणि विचारांची निवड करणे भाग पडते. नाटककार चरित्रनाटकाद्वारे त्या व्यक्तीविषयीचे चित्र रंगवतो असे म्हटले तर घटनांची आणि विचारांची निवड हा त्याच्या हातातला कुंचलाच म्हणावा लागेल. या कुंचल्याद्वारेच चित्र रंगवण्याचे काम होणार. लेखक निवडत असलेल्या घटना आणि विचारांच्या एका एका विटेनेच नाटकातल्या चरित्रविषयाचे बांधकाम आकारित होणार. ही निवड अर्थातच लेखकाच्या बोध अबोध हेतूंनी, जाणिवांनी, जीवनदर्शनाने, विचारांनी, ग्रहआग्रहांनी आणि अर्थातच तात्कालिक प्रयोजनांनी प्रभावित होणार.


नाटकाच्या नवीन आवृत्तीस प्रस्तावनादेखील आहे. यात लेखकाने नाटक लिहिण्यामागील उद्देशाच्या अनुषंगाने काही लिहिले आहे. जोतिबांविषयी देशपातळीवरच्या अज्ञानाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जरी हे नाटक करत नसले तरी जोतिरावांच्या कर्तृत्वातले मुख्य आणि क्रांतिकारी भाग नाटकात मांडले आहेत असे लेखक प्रस्तावनेत सांगतो.


जोतिबांच्या कर्तृत्वातले मुख्य आणि क्रांतिकारी भाग मांडायचे झाल्यास अग्रक्रम निःसंदिग्धपणे त्यांच्या समाजरचनेवरच्या जहाल विद्रोही हल्ल्याला द्यायला हवा. गोपु स्वतःच त्यांच्या लेखात सांगतात की फुले समाजसुधारक होते किंवा काय याचे उत्तर नाही असे असून फुले क्रांतिकारक होते आणि त्यांनी स्वतःची अशी एक सर्वंकष विचारव्यवस्था निर्माण केली७. फुल्यांचे गाभ्याचे योगदान आंबेडकरांनी Who were Shudras या त्यांच्या पुस्तकात फुल्यांना वाहिलेल्या अर्पणपत्रिकेत नेमकेपणाने दिसून येते. आंबेडकर म्हणतात, “To the greatest shudra of modern India who made the lower classes of Hindus conscious of their slavery to the higher classes and who preached the gospel that for India social democracy was more vital than independence from foreign rule.


फुल्यांच्या या क्रांतिकारत्वाचे अनेक पदर दिसून येतात. एकतर त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा संपूर्ण रोख शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या मानसिक गुलामगिरीचे धार्मिक आणि सांस्कृतिक मूलाधार नष्ट करण्यावर होता. शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना त्यांच्या मनुष्यत्वापासून आणि जगण्याच्या खर्‍या गाभ्यापासूनच पारखे करणार्‍या गुलामगिरीपासून मुक्ती मिळवणे हे त्यांच्या उद्दिष्टाच्या केंद्रस्थानी होते. एकदा हे केंद्र लक्षात घेतले की जोतिबांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हाती घेतलेली कार्ये ही ती मुक्ती मिळवण्यासाठीची साधने होती हे लक्षात येते. ग्राम्शीने (Antonio Gramsci) सांस्कृतिक वर्चस्ववादाची (hegemony) संकल्पना वापरुन केलेली मांडणी जोतिबांच्या क्रांतीचा स्वभाव समजावून घेण्यासाठी उपयोगाला येऊ शकते. सांस्कृतिकदृष्ट्या hegemony लादण्यासाठीचे भाषा हे मुख्य साधन असते हे लक्षात घेतले की जोतिबांनी संस्कृतविरोधात केलेली मराठीची पाठराखण समजावून घेता येते. वरवर पाहता सुधारकांशी समकक्ष वाटणारी कार्ये म्हणजे वर्चस्ववादी रचनेचे एकेक दास्यत्वकारक बुरूज ढासळवण्यासाठी केलेले नेमके हल्ले होते हेही लक्षात येते.


फुल्यांच्या क्रांतिकार्यामागील विचारव्यूह नीट अभ्यासल्यास हेही लक्षात येते की फुल्यांचा ब्राम्हणांवरील हल्ला हा शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या दास्यत्वाच्या संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवणार्याण ब्राह्मणवर्गावरचा हल्ला होता. गोपुंनी त्यांच्या लेखात फुल्यांच्या या द्वैवर्णिक मांडणीचा गौरवपूर्ण खुलासा केलेला आढळतो. “दडपणूक करणारी भौतिक आणि वैचारिक व्यवस्थाच मोडून टाकायच्या चळवळीचे नेतृत्व शूद्रातिशूद्र करतील. हे आवश्यकच नव्हे तर शक्यदेखील आहे असे एकोणिसाव्या शतकात सांगणारे फुले हे एकमेव विचारवंत होते”८ असेही ते म्हणतात.


या पार्श्वभूमीवर गोपुंनी ’सत्यशोधक’च्या संहितेत बांधलेले फुले कसे आहेत, वरती चर्चिलेल्या क्रांतिकारकत्वाचा आढळ त्यांच्यात कसा आणि कितपत होतो, हे पाहणे आवश्यक ठरते. परत परत शोधून आणि बारकाईने वाचूनही या गड्ड्याची गोष्ट असलेल्या क्रांतिकारकत्वाचा विशेष मागमूस नाटकातल्या फुल्यांमध्ये आढळत नाही. उलट जितके बारकाईने शोधावे तितक्या नसण्याच्या खुणा सापडत राहतात. त्यातल्या त्यात निवेदकाने गायलेला ब्राह्मण पंतोजीवरच्या पोवाड्याचा भाग आणि त्यावरचे विवेचन आणि गुलामगिरी पुस्तकासंबंधीचा फुले-गोवंडे संवाद या ठिकाणी क्रांतिकारकत्वाचा आविष्कार बघायला मिळेल अशी स्वाभाविक अपेक्षा निर्माण होते.


पंतोजीच्या पोवाड्याच्या भागात सुध्दा बराचसा भर हा पोवाडा छापताना संपादकांनी टाकलेल्या टीपांच्या खुलाश्यांवर आहे९. नंतर महाअरी या शब्दाचा अर्थ सांगताना लेखक काही एक मुद्द्याचे बोलतो. ब्राह्मण्याविरुद्धची लढाई महारांना लढायची आहे, त्यांनी त्यांचे लढाऊपण जिवंत ठेवायला पाहिजे हे सांगण्याचे काम जोतिबांनी केल्याचे निवेदक सांगतो. निवेदक इतका खुलाशाच्या मूडमध्ये असताना येथेच ब्राह्मण्य या शब्दाच्या लेखकाला अभिप्रेत असलेल्या अर्थाचाही खुलासा करणे आवश्यक होते. गोपुंनी त्यांच्या लेखात या संकल्पनेचा खुलासा केलेला दिसतो. ब्राह्मण्य ही ब्राम्हणांच्या वर्चस्वाला वैचारिक अधिष्ठान देणारी, चिरंतनत्व आणि पावित्र्य बहाल करणारी धार्मिक रचना आहे१० असे गोपुंनी बांधलेले दिसते. गोपुंची ही व्याख्या अनोखी असल्यामुळे तिचे नीट स्पष्टीकरण केले जाणे गरजेचे होते. अन्यथा द्वैवर्णिक मांडणीमध्ये एक ध्रुव जर शूद्रातिशूद्र वर्गाचा असेल तर दुसरा ब्राह्मण वर्गाचा असणार. ब्राह्मण वर्ग असे न म्हणता ब्राह्मण्य असे म्हटल्याने नेमका काय फरक पडतो हे कळणेही गरजेचे होते.


गुलामगिरी पुस्तकाबद्दलच्या चर्चेतही अशीच स्थिती आहे. नाटकातले जोतिबा गोवंड्यांना म्हणतात, “मी आपल्या शेतकर्‍याला बळिराजा असे म्हणतो त्याचे कारण तेच आहे. वामन-बळी यांच्यातल्या संघर्षाचे स्मरण त्याला राहिले पाहिजे. नसले तर करून दिले पाहिजे. हिंदुस्थानचा अवघा इतिहास वर्णजाती संघर्षाचा इतिहास आहे.”११ या बोलण्यातून काही स्फुरण निर्माण होते न होते तोच जोतिबा त्या दमातच पुढे “धर्मावर हल्ला करायचा तर तो धर्म नष्ट करायचा म्हणून नसतो. धर्म चांगला कळावा म्हणून आणि धर्माला आधुनिक करता यावं म्हणून करायचा असतो, करावा लागतो.”१२ असे म्हणून वळसा घेतात. गोपुंनी मांडलेल्या द्वैवर्णिक विचारव्यूहाचाच आधार घ्यायचा झाल्यास फुल्यांच्या धर्मावरील हल्ल्याचे उद्दिष्ट जसे केवळ धर्म नष्ट करणे हे नव्हते तसेच धर्मसुधारणा असेही नव्हते तर शोषित वर्गाची स्थिती पालटणे हे होते. धर्मावरील फुल्यांना अभिप्रेत असा हल्ला केवळ instrumental स्वरुपाचा होता. साधनरुप होता, साध्यरूप नव्हता. पण गोपुंचे फुले मात्र धर्म चांगला कळावा म्हणून किंवा त्यात आधुनिकता यावी म्हणून धर्मावर हल्ला करावा म्हणतात. धर्मावरील हल्ल्यातून धर्मापलिकडचे स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांची गुलामगिरी नष्ट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते सांगत नाहीत. मोघमपणाचे स्टिअरिंग व्हील वापरुन वळसा घेतात.


दक्षिणा प्राईज कमिटीची बक्षिसे मराठी भाषेतील पुस्तकांना द्यावीत यासाठी काढलेल्या मोर्चाचा प्रवेश नाटकात विस्ताराने, ठसठशीत आणि सचित्र पध्दतीने आलेला दिसतो१३. या प्रवेशातही फुल्यांच्या या मोर्चाला समर्थन देण्याच्या कृतीचे अन्वयार्थ वेगळेच लावले गेलेले दिसतात. येथे जोतिबा म्हणतात, “संस्कृतचं इतकं करण्याचं नाहीतर दुसरं काय कारण आहे? लोकभाषांना मागे सारण्यासाठी संस्कृत, फारशी, अरबीचे बडेजाव आपल्याकडे माजविले आहेत.”१४ संस्कृतचा बडेजाव हा ब्राम्हणी वर्चस्ववादाच्या बृहद्प्रकल्पाचा एक भाग आहे आणि म्हणून फुले त्यास विरोध करतात असे लेखकाला म्हणायचे दिसत नाही. मराठीचा पुरस्कार ही द्वैवर्णिक लढाईत आवश्यक ठरणारी एक बाब असल्याचे येथे ठसवले जात नाही. केवळ “लोकभाषांचा अभ्युदय हा शूद्रातिशूद्रांचा अभ्युदय आहे”१५ असे मोघमपणे बोलताना नाटकातले फुले दिसतात. नंतर सावित्रीशी बोलत असताना जोतिबा “आपण मराठीचे गीर्वाण करतो आहोत”१६ असे तेजस्वी वाक्य बोलतात. पण पुढे आपल्याला याचा अभिमान असायला हवा असे म्हणतात आणि त्यावर कडी म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या मराठीविषयक अभिमानाशी या अभिमानाला जोडून आणखी एक वळसा घेतात. म्हणजे मराठीविषयक भूमिकेची जोड बृहद्पातळीवरील द्वैवर्णिक लढ्याशी न बसता भाषिक अभिमानाच्या मुद्द्याशी बसते. अशाप्रकारे मराठीचे समर्थन करण्याची कृती साधनरुप बनता बनता साध्यरुप बनते. अर्थात हा प्रसंग १८४९ साली घडला होता हे लक्षात घेतले आणि फुल्यांची द्वैवर्णिक संघर्षाची विद्रोही मांडणी हळूहळू उत्तरकाळात घडत गेली असणार असे गृहीत धरले तर लेखकाने मराठीच्या पुरस्कारामागील जोतिबांचे हेतू संमिश्र दाखवले असतील असे समजावून घेता येऊ शकते.


परंतु लेखकाने नाटकातले फुले रंगवताना आणि काळानुरूप घडणार्‍या प्रसंगामागील त्यांचे विचार उघड करताना फुलेंच्या विचारांचा ऐतिहासिक प्रवास (historical progression) होताना दाखवलेला दिसत नाही. २१ वर्षाचे फुले ते ५७ वर्षाचे फुले (नाटकातल्या फुल्यांचा काळ १८८५ सालापर्यंतचा आहे) असा काही ऐतिहासिक प्रवास नाटकात दिसत नाही. १८४९ मध्येच नाटकातले फुले सारभूत फुलेविचार मांडायला लागलेले दिसतात. काळाच्या बाबतीत एकंदरच लेखक गाफील राहिलेले दिसतात. १८४९ सालच्या मराठी भाषासमर्थनाच्या प्रवेशातच नाटकातले फुले वासुदेव फडक्यांना उपदेश केल्याचे सांगतात१७. फडक्यांचा जन्म १८४५ सालचा, म्हणजे ते तेंव्हा ४ वर्षांचे बाळ असणार. बालहत्त्याप्रतिबंधक गृहाच्या स्थापनेच्या प्रवेशात स्थापना होण्याच्या प्रसंगाच्या आधीच्या प्रसंगात फुले गोवंड्यांना गुलामगिरीचा मसुदा वाचायला देतात१८. बालहत्त्याप्रतिबंधकगृहाची स्थापना १८६३ सालातली आणि ’गुलामगिरी’ १८७३ सालातले. मधल्या बारा वर्षाच्या काळात फुल्यांची ’छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा’, ’ब्राम्हणांचे कसब’, ’विद्याखात्यातले पंतोजी यांचा पोवाडा’ इतकी पुस्तके येऊन गेलेली होती. आणि गंमत म्हणजे १८६३ साली मिळालेल्या मसुद्याबद्दल गोवंडे १८७१ सालात मसुदा न रुचल्याने नाराज असल्याचे सावित्रीबाई जोतिबांना सांगतात१९. गोवंड्यांचा हा नंतरचा प्रसंग फुले रानडेंना त्यांच्या विधवा बहिणीच्या पुनर्विवाहाबद्दल (रानडेंचे मेव्हणे वारतात ते १८७१ साली) बोलतात त्या प्रसंगानंतर येतो. नाटकातल्या या प्रवेश क्रमांक ८ मध्ये काळाचे इतरही घोळ आहेत. या प्रवेशात सुरुवातीलाच रानडे आणि फुले आधी १८८५ सालातल्या मे महिन्यातल्या रानड्यांच्या भाषणाला ऑक्टोबर १८८५ साली फुल्यांनी ’इशारा’ पुस्तिकेद्वारे दिलेल्या उत्तराचा उल्लेख करुन चर्चा करताना दिसतात२०. म्हणजे काळ साधारण ऑक्टोबर १८८५ नंतरचा असायला हवा. पण लगेच पुढे त्याच दमात फुले रानडेंच्या विधवा बहिणीच्या पुनर्विवाहाबद्दल वर्तमानकालीन पध्दतीने बोलतात. तुम्ही बहिणीचा पुनर्विवाह करणार की नाही असे विचारतात. म्हणजे काळ १८७१ सालचा आहे असे समजावून घ्यावे लागते. पण इथेच फुले असेही म्हणतात की खरं तर तुमच्या दुसर्‍या विवाहाच्या वेळेलाच भेटणार होतो (जो खरंतर दोन वर्षांनंतर म्हणजे १८७३ साली होणार असतो)


काळाची ही अतिवास्तववादी हाताळणी लेखकाने नेमक्या कोणत्या योजनेअंतर्गत केली असावी हे समजत नसल्याने हा एकंदर गाफीलपणाचा प्रकार असावा असेच म्हणावे लागते.


फुल्यांची भाषा त्यांच्या रांगड्या आणि आक्रमक स्वभावाला साजेशी अशी होती असे सगळ्याच अभ्यासकांनी म्हटले आहे. नाटकातल्या भाषेवर काही भाष्य करण्याऐवजी नाटकातला नमुना उतारा, फुल्यांनी नेमक्या त्याच मुद्द्यावर लिहिलेला एखादा उतारा आणि गं. बा. सरदारांचे फुल्यांच्या भाषेबद्दलचे अवतरण एवढे दिल्यानेही भाषेबद्दलचा मुद्दा स्पष्ट होवू शकतो.


रानडेंच्या “पूर्वीच्या तीस वर्षांपेक्षा हल्ली शेतकर्‍यांची स्थिती बरी आहे” या टिप्पणीचा फुल्यांनी इशारा या पुस्तिकेद्वारे लेखी समाचार घेतला होता. नाटकात रानडे फुल्यांना राणीचे राज्य आल्यामुळे शेतकर्‍यांची स्थिती सुधारली हे माझे म्हणणे तुम्हाला कबूल कसे नाही असे खोचकपणे विचारतात. तर नाटकातले फुले खालीलप्रकारे उत्तर देतात –


“रावसाहेब, माझ्या विचारांचा आणि आचारांचा एवढा सरळसोट अर्थ तुम्ही लावू लागलात? माझ्या शत्रूंना माझे लिखाण समजत नाही. माझा क्रोध आणि त्यापाठची परिस्थिती व भोग त्यांना उमगत नाहीत, त्याचे काय आश्चर्य! पण रावसाहेब, तुम्ही माझे ज्येष्ठ मित्र, तुम्हालाही कळेना-”२१


आणि हा इशारा पुस्तिकेतला उतारा (ज्यामध्ये नाटकातल्या रानडेंच्या नंतरच्या खोचक प्रश्नाला सुध्दा आधीच उत्तर दिलेले होते) –


“परंतू आर्य ब्राम्हणातील दुजा नूतन शंकराचार्याचे तोलाचा विद्वान लहान मोठ्या सभात उड्या मारुन प्रतिपादन करत फिरतो की, “पूर्वीच्या तीस वर्षापेक्षा हल्ली शूद्र शेतकर्‍यांची स्थिती बरी आहे”. या त्याच्या धाडसाविषयी मात्र नवल वाटते,.......या हतभागी देशात पाठवलेल्या धर्मोपदेशकांच्या शिक्षणावरुन अज्ञानी शूद्र शेतकर्यांतच्या स्थितीत कोठे थोडासा पालट पडत चालला आहे. म्हणजे या तीस वर्षात शूद्र शेतकर्‍यांवरील आर्य ब्राम्हणांचा जुलूम काही अंशी कमी झाला, हे उघडपणे कबूल करण्याची लाज वाटून तो मोघमपणे म्हणतो की “पूर्वीच्या तीस वर्षापेक्षा हल्ली (शूद्र) शेतकर्‍यांची स्थिती बरी आहे”. अहो हे धूर्त, आमचे अज्ञानी शूद्र शेतकर्‍यांची “सोजरी” भाषा अजाणत्या गव्हर्नर जनरलसारख्या कामगाराची समजूत काढण्याकरिता वापरून, हमेशा कशीतरी वेळ मारून नेतात”२२ (जाड ठसा माझा)


गं. बा. सरदार फुल्यांच्या भाषेविषयी म्हणतात –


“इंग्रजी व संस्कृत या दोन्ही भाषांचे दडपण झुगारून लोकजीवनाच्या दृढ संपर्कातून जोतीरावांनी मिळवलेली ही भाषा सौम्यता, संकोच, आर्जव, सूचकता व संदिग्धता कटाक्षाने टाळते. स्वाभाविकता, रोखठोकपणा, आक्रमकता, साधेपणा, स्पष्टता, अर्थबोधकता, सडेतोडपणा, मर्मभेद व प्रभावी प्रत्ययकारिता या गुणांना जवळ करते”२३ (जाड ठसा माझा)


 राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम या संदर्भात नाटकातले फुले थोडक्यात का होईना बोलताना दिसतात. जेंव्हा अण्णासाहेब चिपळूणकर जोतिबांना तुम्ही राणीचे राज्य आले हे चांगलं झालं असं कसं म्हणता असं विचारतात तेंव्हा “परकी सत्ता टिकत नसते, फक्त ती सत्ता कधी व केंव्हा संपायची हे आपल्या हातात नसते. त्याची वेळ यावी लागते. म्हणून घाई नको एवढेच माझे म्हणणे. राणीच्या राज्याला विरोध करायची वेळ अजून आलेली नाही”२४ असे फुले म्हणतात. नंतर गोवंडे फुल्यांना तुम्ही १८५७ च्या बंडाबाबत शांत कसे होतात असे विचारतात तेंव्हा फुले म्हणतात, “त्या बंडाचा ब्रिटिश सरकार निकाल लावणार हे मला स्वच्छ दिसत होतं. राष्ट्रभक्ती मलाही कळते. म्हणूनच वासुदेव फडक्याला मी नेहमी मदतच केलेली आहे. कुणाच्या राष्ट्रप्रेमावर मी कधी हल्ला केला आहे मला सांगा”२५ पुढे लोखंड्यांशी टिळकांबद्दल बोलताना फुले म्हणतात की परकीय सत्तेबाबतचा त्यांचा राग मला समजतो.२६

वासुदेव फडक्यांना फुल्यांनी मदत केली होती या तथ्याला पुरेसे आधार नाहीत. त्यामुळेच फुल्यांवर लिहिणार्‍या कुठल्याच अभ्यासू संशोधकाने या तथ्यास मान्यता दिलेली दिसत नाही. धनंजय कीर त्यांच्या फुलेचरित्रात फुल्यांनी फडक्यांना मदत केल्याच्या दाव्याचा उल्लेख करतात आणि अशा शक्यतेस नाकारतात२७. काही जणांनी वासुदेव फडक्यांच्या पत्नी ताई फडके यांच्या आठवणींचा हवाला दिलेला आढळतो२८. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम या गैरऐतिहासिक आणि फुल्यांच्या विचारव्यूहात न बसणार्‍या संकल्पना फुल्यांच्या संवादात घालणे आणि वासुदेव फडक्यांना मदत करण्याच्या क्षीण धाग्याला लोंबकळणे या गोष्टी लेखकाने का केल्या असतील हे समजावून घेण्यासाठी गोपुंच्याच फुल्यांवरच्या लेखाची मदत घ्यावी लागते. या लेखात गोपु म्हणतात, “फुल्यांनी वासुदेव बळवंत फडक्याचे महत्त्व ध्यानात घेतलेले दिसत नाही. त्याचा दुर्दैवी परिणाम असा झाला की फुले, त्यांचे सहकारी आणि अनुयायी साम्राज्यवादाविषयी वरचेवर बोटचेपी भूमिका घेत गेले आणि अंतिमतः ते राष्ट्रीय चळवळीसमोर निष्प्रभ झाले”२९. याच लेखात पुढे गोपुंनी केलेली टिप्पणी एकंदर नाटकातले गोपुंनी केलेले जोतिबा फुल्यांचे बांधकाम समजावून घेण्यासाठी कळीची आहे. गोपु म्हणतात, “व्यवस्था बांधणार्‍या माणसाशी कसे जोडून घ्यायचे असते? आजच्या समस्यांच्या संदर्भात त्या व्यवस्थेचा अर्थ लावून ते करायचे असते. साम्राज्यवादाविषयी त्यांनी स्वीकारलेल्या बोटचेप्या भूमिकेपासून दूर गेल्याशिवाय फुल्यांचा सृजनशील अर्थ लावणे दुरापास्त आहे”३०(जाड ठसा माझा).


याचाच अर्थ असा करावा लागतो की राष्ट्रवाद, साम्राज्यवाद या आणि इतरही संदर्भातले फुल्यांचे बांधकाम करताना नाटकात करण्यात आलेले विपर्यास हे लेखकाने बुद्ध्याच केलेले आहेत आणि तो लेखकाच्या फुल्यांचा सृजनशील अर्थ लावण्याच्या उपक्रमाचा भाग आहे. साम्राज्यवादाबाबतची संधानात्मक भूमिका वगळून व्यवस्थेवरचा घणाघाती आणि जहाल विद्रोही हल्ला underplay करणे, मराठीबाबतच्या अभिमानास विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या मराठी अभिमानाशी जोडणे, तथाकथित राष्ट्रवादी धारेतल्या वासुदेव फडके, विष्णूशास्त्री चिपळूणकर, रानडे, टिळक यांच्याशी संबंधित प्रसंगांची / विचारांची निवड, मिशनरी प्रभाव, इतर तोलामोलाच्या सहकार्‍यांची साथ (लोखंडे आणि घोले यांचे उल्लेख विपरीत संदर्भात येतात) याचा अनुल्लेख, हेसुध्दा मग या सृजनशील अर्थ लावण्याच्या उपक्रमाच्या उजेडात समजावून घ्यावे लागते. पण हे जर खरे असेल तर मात्र लेखकाने चरित्रनाटकाच्या आवश्यक अटींचे उल्लंघन केले असे म्हणावे लागते. सृजनशील अर्थच लावायचा होता तर मग चरित्रनाटकाऐवजी दुसरा तशी मोकळीक देणारा घाट लेखकाने निवडायला हवा होता.



२. पुढची चर्चा:

साम्राज्यवादाविषयीची फुल्यांची भूमिका त्यांच्या केंद्रीय आणि गाभ्याच्या विचारव्यूहाच्या संदर्भातच समजावून घेतली पाहिजे. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांच्या गुलामगिरीचे धार्मिक आणि सांस्कृतिक मूलाधार उद्ध्वस्त करणे हे फुल्यांचे काळानुरूप विकसित होत गेलेले केंद्रीय उद्दिष्ट दिसते. फुल्यांच्या समस्त विचारांचा आणि कृतींचा व्यूह या केंद्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने आकारित झालेला दिसतो. साम्राज्यवादाला विरोध स्वाभाविकपणेच या विचारव्यूहात बसत नव्ह्ता. उलट परक्या सत्तेशी सहकारात्मक आणि समर्थक संधानाची आवश्यकता या विचारव्यूहात निर्माण होते. फुल्यांचे म्हणणेच असे होते की “सत्तेबाबत आधीच पराधीन झालेल्या आणि त्यात आर्यभटांनी ज्ञानहीन करुन टाकलेल्या शूद्रातिशूद्रांना वरचढ समाज घटकांच्या दुष्ट व सर्वांगीण सामाजिक-आर्थिक-धार्मिक-शैक्षणिक वर्चस्वातून मुक्त केल्याखेरीज म्हणजेच त्यांची अपहृत सत्ता त्यांना पुन्हा मिळवून दिल्याखेरीज इंग्रजी राजवटीचे इथले नियत कार्य पूर्ण होऊच शकणार नाही”३१. पण एकदा का सृजनशील अर्थ लावण्याचे ठरवून हा व्यूह बदलायचा ठरवला की आपोआपच मूलभूत स्वरुपाचे बदल होणे अटळ बनते आणि याआधीच्या उतार्‍यांमध्ये केलेल्या चर्चेप्रमाणे विपर्यास केले जातात.


साम्राज्यवादाविषयीची फुल्यांची भूमिका त्यांनी उभ्या केलेल्या शूद्रातिशूद्रांच्या चळवळीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या अनुषंगानेही समजावून घेता येऊ शकते. अठराशे ऐंशीच्या दशकाचा विचार करता शूद्रातिशूद्रांची चळवळ म्हणण्यापेक्षा ब्राम्हणेतर चळवळ म्हणणे जास्त योग्य ठरते. रोझालिंड ओ हॅन्लन यांनी नमूद केल्याप्रमाणे १८८२ च्या नंतर फुल्यांचा रोख शूद्रातिशूद्रांच्या चळवळींच्या तुलनेत सत्यशोधक समाजाची समतानिष्ठ आणि मानवतावादी मूल्ये कृषकजातींच्या मार्फत साधण्यासाठीच्या कामाकडे किंचितसा वळलेला दिसतो३२. हॅन्लनबाई पुढे जे म्हणतात ते आपल्या चर्चेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. ते थेट इंग्रजीत देणेच योग्य होईल.


“…very substantial differences (which) existed between radical non-brahmans such as Phule, Bhalekar and Lokhande, and their adversaries amongst the early nationalists. Non-brahmans hoped for a long period of benevolent paternal rule under the British government, during which the lower caste community would have time to acquire the skills and resources which were needed if they were to take up their rightful place as natural leaders of Maharashtrian society.”३३


वरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर गोपुंची आधी उद्धृत केलेली दोन्ही अवतरणे परत एकदा तपासणे आवश्यक आहे. पहिल्या अवतरणानुसार ते म्हणतात की साम्राज्यवादाविषयी बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे फुले आणि सहकारी राष्ट्रीय चळवळीसमोर निष्प्रभ झाले. फुले आणि सहकार्‍यांची सत्यशोधक चळवळ निष्प्रभ होण्याची बीजे, चळवळीच्या साम्राज्यवादाविषयीच्या भूमिकेमध्ये होती की चळवळीच्या स्वरुपातच आणि फुल्यांच्या मृत्यूनंतरच्या तिच्या प्रवासात होती हे तपासणे बिकट असले तरी इंटरेस्टिंग आहे.


“स्त्री-शूद्रातिशूद्रांचे सत्यशोधक चळवळीमार्फत संगठन करताना ब्राम्हणेतर जातींमधील विग्रहाचा मुद्दा जोतिबांनी बहुधा जाणूनबुजून नजरेआड केला होता. ब्राम्हणांनी ज्यांना ’शूद्र’ म्हणून हिणवले त्या ब्राम्हणेतर जातिगटांनी या ’शूद्र’पणाच्या आधारे एकत्र यावे आणि संपूर्ण वर्णव्यवस्था निकालात काढावी या दृष्टीनेच एका बाजूने स्वतःला ’खासा मराठा’ म्हणवणार्‍यांचा ’क्षत्रियत्वा’चा दावा पोकळ आहे हे सांगत असतानाच दुसर्‍या बाजूने क्षत्रिय (मूळ रहिवासी) या अर्थाने सर्व शूद्रातिशूद्र हेच खरे क्षत्रिय ठरतात, असा दुहेरी युक्तिवाद जोतिबांनी केला होता”.३४ पण ब्राम्हणेतर जातींमधील विग्रहाच्या मुद्द्याने फुले गेल्यानंतरच्या काही वर्षातच डोके काढलेले दिसते. “सत्यशोधक समाजात फूट पडल्यानंतर स्थापन झालेला जो गट सत्यधर्म समाज या नावाने वावरु लागला त्याने १८९५ मध्ये पुण्यात भरवलेल्या आपल्या सभेच्या जाहिरातीत या सभेला महार, मांग, चांभार, ढोर म्हणवून घेणार्‍यास येण्याची परवानगी नाही असे स्पष्ट छापले होते”३५


समस्त ब्राम्हणेतर शूद्रातिशूद्र जातींची फळी उभी करण्यामागच्या फुल्यांच्या उदात्त हेतूंविषयीची खोल जाणीव त्या चळवळीत सामील झालेल्या सगळ्याच लोकांमध्ये कितपत पाझरलेली होती हा तपासण्याचाच मुद्दा आहे. “मानवधर्माच्या आध्यात्मिक पातळीवर फुले जसे स्थिर होते तसे आणखी किती स्थिर होते? तात्पर्य काय, की विस्थापितांचे लढे हे शाश्वत नैतिक तत्वाचा आधार बळ प्राप्त करण्यासाठी घेत असले तरी ते हितसंबंधी लढेच असतात”३६.

समता, मानवता, व्यक्तिस्वातंत्र्य यासारखी मूल्ये, त्या मूल्यांसाठीचे भौतिक आणि सांस्कृतिक आधार नसताना लोकांमध्ये कशी रुजवली जाऊ शकतात ह्या समस्येलाही चळवळीला भिडावे लागले असणार.


शिवाय ब्रिटीश संपर्काने प्रज्वलित झालेल्या आधुनिकीकरणाच्या विविध प्रक्रियांचा परिणाम होवून जातींच्या स्वरुपामध्ये आणि वर्तनामध्ये कसकसे बदल होऊ शकतील याचा अंदाज एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात असणेही कठीण होते. जातींचा सेक्युलर लाभ मिळवण्यासाठीच्या हितसंबंधी गटाकडे होऊ घातलेला प्रवास तेंव्हा नुकताच सुरू झालेला होता. जो वरचेवर चक्रवाढ गतीने वेगवान होत जाणार होता.


जातींच्या नंतरच्या या प्रवासात हे सिध्द होत गेले की आपल्या समाजात खरीखुरी संरचना (defacto structure) ही जातिगटाचीच असणार. प्रशासनव्यवस्था, न्यायव्यवस्था, भांडवली अर्थव्यवस्था यासारख्या अनेक आधुनिक व्यवस्था आपल्या देशात नैसर्गिक गतीने उत्क्रांत झालेल्या नाहीत तर बाहेरुन कलम केलेल्या आहेत. ह्या व ह्यासारख्या इतर सर्वच आधुनिक व्यवस्थांसाठी असणारी संरचनात्मक गरज स्वाभाविकच जातींच्याकडून भागवली गेलेली दिसते. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहावेत तशी ही प्रक्रिया झालेली दिसते. टोळीव्यवस्था असणार्‍या आफ्रिकन देशात बाहेरून आयात केलेली सांसदीय लोकशाहीची व्यवस्था मूळ धरू शकली नाही त्यास मुख्यतः सांसदीय लोकशाही समर्पक पध्दतीने कार्यरत राहण्यासाठी असणार्‍या संरचनात्मक सामग्रीचा अभाव भरून काढण्यात आलेले अपयश हे कारण होते. त्यामानाने भारतात जातींकडून संरचनात्मक गरज भागवली गेल्याने सांसदीय लोकशाही व्यवस्था बर्‍यापैकी तग धरून असल्याचे दिसते.


अनेक आधुनिक व्यवस्थांनी संरचनात्मक कसर भरून काढण्यासाठी जातीचा आधार घेतलेला असल्यामुळे; या व्यवस्थांमध्ये शिरकाव करून घेण्यासाठी, त्यांचा वापर करून घेण्यासाठी; तसेच त्यांच्यापासून फायदे वसूल करून घेण्यासाठी वरचेवर जातींचा आधार घेतला गेला. अडचणींच्या प्रसंगी झेलून घेण्यासाठी आपापली जातच शेवटी उपयोगाला येणार असल्याची अनुभवसिध्द समज हळूहळू विकास पावत गेलेली दिसते. यासंदर्भात एम. एन. श्रीनिवास यांच्या एका निबंधातली अवतरणे मूळ इंग्रजीतच उद्धृत करणे उपयोगाचे होईल. “In fact what are called castes today are more accurately described as congeries of agnate sub-castes which have come together to compete more effectively with other similar formations for better access to such scarce political resources as political power, economic opportunities, government jobs and professional education”३७


या उजेडात उत्तरप्रदेशात मायावतींचा दलित जाती आणि ब्राह्मण जाती यांची मोट बांधण्याचा आणि महाराष्ट्रातील भीमशक्ती आणि शिवशक्ती यांच्या एकत्रीकरणाचा प्रयोग लक्षात घेता येऊ शकतो. विविध जातींची एकत्र मोट बांधून सत्ताकारण करण्याच्या फुल्यांनी निर्मिलेल्या संकल्पनेचा आत्तापर्यंतचा विपरीत प्रवास हाच एकप्रकारे त्या संकल्पनेवरचे टीकात्मक भाष्य आहे.


अशाप्रकारे फुले आणि सहकार्‍यांची चळवळ निष्प्रभ होण्याची कारणे चळवळीच्या स्वरुपातच असल्यामुळे साम्राज्यवादाविरोधात चळवळीचा असलेला दृष्टिकोण हा तसा गौण मुद्दा होता. परंतु प्रत्यक्ष सत्यशोधक चळवळ जरी नंतर निष्प्रभ झाली तरी फुल्यांनी त्यांच्या प्रचंड खटाटोपाद्वारे सर्जनशील विध्वंसाची जी जबरदस्त ऊर्जा महाराष्ट्रात निर्माण केली तिचा उपयोग पुढे येणार्‍या सगळ्याच विद्रोही चळवळींना झाला. याबाबतीत जोतिबा फुल्यांच्या कर्तृत्वाला हिमालयाचीच उपमा देता येऊ शकते, ज्यातून वंचितांसाठीच्या विविध चळवळींच्या बारमाही नद्या उगम पावत राहिल्या.


गोपुंचे दुसरे अवतरण फुल्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थांचे आजच्या समस्यांच्या संदर्भात अर्थ लावण्याबद्दलचे आहे. असे करताना साम्राज्यवादाला दुर्लक्षून चालणार नाही आणि फुल्यांचा सृजनशील अर्थ लावणे आवश्यक आहे असेही त्यांना म्हणायचे दिसते. जागतिकीकरणाच्या आणि साम्राज्यवाद तलम आणि अमूर्त स्वरुपात तीव्रतर होण्याच्या सध्याच्या काळात फुल्यांच्या विचारांचा आशय तेव्हढा घेऊन तो सृजनात्मक पध्द्तीने राबवला गेला पाहिजे असे काही गोपुंचे म्हणणे असावे. त्यांच्या लेखात ते म्हणतात, “द्वैवर्णिक भाषेत बोलायचे तर स्थानिक ब्राह्मण वॉशिंग्टन ब्राम्हणांनी घालून दिलेल्या नियमांनी खेळत आहेत आणि शूद्रातिशूद्रांनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ब्राम्हणांच्या आघाडीकडे दुर्लक्ष करुन त्यांचा खेळ पाहत बसायचे धोरण स्वीकारले आहे”३८. गोपुंची ब्राम्हण्याची व्याख्या लक्षात घेता (ब्राह्मण्य ही ब्राम्हणांच्या वर्चस्वाला वैचारिक अधिष्ठान देणारी, चिरंतनत्व आणि पावित्र्य बहाल करणारी धार्मिक रचना आहे) त्यांना असे म्हणायचे दिसते की सध्याच्या काळात ब्राम्हण्याची संकल्पना बदललेली आहे. तसेच वर्चस्वाला अधिष्ठान देणार्‍या रचनेचे रूप पालटलेले आहे आणि या रचनेचे नियम सध्या वॉशिंग्टन ब्राह्मण घालून देत आहेत आणि स्थानिक ब्राम्हणांनी आंतरराष्ट्रीय ब्राम्हणांशी हातमिळवणी केली आहे.


आधीच्या उतार्‍यांमध्ये उल्लेखलेली जातींची हितसंबंधी गटात रुपांतर होण्याची प्रक्रिया सध्याच्या काळात पूर्णत्वाला गेलेली आहे हे लक्षात घेता आणि राज्यसत्ता, ब्युरोक्रसी आणि इतर अनेक महत्वाच्या क्षेत्रात झालेले elites चे caste wise diversification लक्षात घेता गोपुंचे म्हणणे समजावून घेता येऊ शकते. आणि मग जोतिबा फुल्यांनी त्यांच्या काळात उघडलेल्या अनेक आघाड्या त्यांच्या तेंव्हाच्या संदर्भातल्या विचारव्यूहातून मोकळ्या करून घेऊन त्यांच्याशी आत्ताच्या नव्या संदर्भात नव्या द्वैवर्णिक संकल्पनेअंतर्गत जोडून घेता येऊ शकते.


फुल्यांनी निर्मिलेल्या व्यवस्थांचा आजच्या काळाच्या संदर्भात अर्थ लावण्याचा मुद्दा तसा महत्वाचा आहे. फुल्यांचा काळ आणि आजचा काळ यादरम्यानच्या काळात काय काय बदलले आणि काय काय टिकून राहिले याचा विचार केल्यास असा प्रयत्न करता येऊ शकतो. शोषित आणि वंचितांचा वर्ग अजूनही त्याच जातिजमातींचा असल्याचे दिसून येते. शेतकर्‍यांची स्थिती सुध्दा फुल्यांच्या काळात होती तशीच दयनीय असल्याचे दिसते. क्षेत्रानुसार विचार करायचा झाल्यास विषमता, दारिद्र्य, अंधश्रध्दा, योग्य शिक्षणाचा अभाव या सगळ्याच क्षेत्रात तितकीच भयावह परिस्थिती असल्याचे दिसते. शोषितांचा आणि वंचितांचा जातिवर्ग साधारणपणे तोच दिसत असला तरी शोषकांच्या जातिवर्गात वैविध्य आलेले दिसते. राज्यसत्ता पूर्वीच्या अभिजनांकडून म्हणजे ब्राह्मणवर्गाकडून इतर जातींकडे (फुल्यांच्या शब्दात शूद्रांकडे) सरकलेली दिसते. त्यातही त्या त्या प्रांतातल्या संख्येने बळजोर जातींच्या ती जास्त ताब्यात दिसते (हरियाणा – जाट, महाराष्ट्र – मराठा-कुणबी, कर्नाटक – वोक्कलिगा, लिंगायत, आंध्र – कम्मा, रेड्डी). प्रशासनामध्येही फुल्यांच्या काळात ब्राम्हणांची जी एकाधिकारशाही होती ती राहिलेली नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात सुध्दा असेच झालेले दिसते. मीडिया, दृकश्राव्य माध्यमे, कला क्षेत्रे आणि इतर काही क्षेत्रात ब्राह्मण जातीचे प्राबल्य दिसते. विविध क्षेत्रात नव्याने दाखल झालेले विविध जातीचे अभिजन धार्मिक-सांस्कृतिक बाबी वगळता इतर महत्वाच्या बाबतीत जातमुक्त होऊन एकंदर अभिजन वर्गाचे निर्जात सदस्य असण्यात जास्त रममाण झालेले दिसतात.


फुल्यांच्या बर्‍याचश्या लेखनातून सर्वच महत्वाची क्षेत्रे ब्राह्मण वर्गाच्या ताब्यात असल्याबद्दलची गुदमरवणारी जाणीव व्यक्त होते. ब्राह्मणवर्गाच्या सर्वव्यापी ताब्यामुळे ब्रिटिश सत्तेचा जो उपयोग शूद्रातिशूद्रांना एकंदर गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी व्हायला पाहिजे तो होत नाही असेही त्यांना वाटत होते. नंतरच्या काळातल्या प्रदीर्घ प्रवासात ह्या बर्‍याचशा क्षेत्रात इतर जातिवर्गांच्या अभिजनांचा शिरकाव होऊनही फुल्यांना अपेक्षित परिवर्तन का घडू शकले नाही ही चिंतनाची बाब आहे.


’शेतकर्‍याचा असूड’ मध्ये शेतकर्‍यांच्या स्थितीचे अतिशय खोलात जाऊन हृदय पिळवटून टाकणारे वर्णन करताना फुल्यांनी असे मत व्यक्त केलेले दिसते की सरकारी नोकर्‍यांमध्ये शेतकरी वर्गातल्यांची भरती केल्यास शेतकर्‍यांची नाडणूक कमी होईल. गंमत म्हणजे गेली अनेक दशके शेती खात्यातच नव्हे तर इतर जवळपास सगळ्याच खात्यांमध्ये भरती होणार्‍यांच्या जातपार्श्वभूमीत मोठे बदल झालेले आहेत. एक काळ तर असा होता की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रशासनात विविध पातळ्यांवर निवड होणार्यांवमध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे राहुरी कृषी विद्यापीठातून येत, जे स्वाभाविकच कृषक जमातीचे असत. पण तरीही परिस्थितीत काही बदल झाल्याचे दिसत नाही. शेतकरी संघटनेच्या शरद जोशी यांनी या मंडळींना काळे इंग्रज असे संबोधल्याचे दिसते. शिवाय फुल्यांच्या द्वैवर्णिक मांडणीतून प्रेरणा घेऊन भारत विरुध्द इंडिया अशी द्वंद्वात्मक मांडणी त्यांनी केलेली दिसते. फुल्यांना राणीचे राज्य जसे emancipatory वाटायचे तसा शरद जोशींना WTO चा पाया घालून देणारे ऑर्थर डंकेल काही काळ emancipatory वाटत होते. अर्थातच ही फुलेविचारांची शरद जोशींनी केलेली सृजनशील फेरमांडणी होती असे म्हणता येऊ शकते. आणि ही मांडणी फुल्यांच्या साम्राज्यवादाबद्दल soft असण्याशी संवादी होती असेही म्हणता येऊ शकते.


इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकामध्ये ख्रिश्चॅनिटी, इस्लाम ह्यासारख्या एकदैवतवादी धर्माची संस्थापना होण्याच्या प्रक्रियेद्वारा तेंव्हा अस्तित्वात असलेल्या नानाविध जमातीतील यातुधार्मिक वैचारिकांना (magico-religious worldviews) एकच एक समान अशी वैचारिका (worldview) पुरवण्याचे कार्य पार पाडले गेले. जे काही घडले त्यास कुणी सांस्कृतिक वसाहतीकरणाची प्रक्रिया असेही म्हणू शकेल. जे घडले त्यामागची आर्थिक व राजकीय कारणेही कुणी सांगू शकेल. भारतात मात्र अशा प्रकारची एकच एक समान वैचारिका पुरवण्याची किंवा आहे त्या वैचारिकांना एका व्यापक चौकटीत बसवण्याची प्रक्रिया कधीच घडली नाही. यादिशेने वेगवेगळ्या काळात जे प्रयत्न केले गेले त्यांपैकीचा एक महत्वाचा प्रयत्न म्हणूनसुध्दा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीकडे बघता येऊ शकते. इतर अनेक प्रयत्नांप्रमाणे फुलेंचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. परिवर्तनाच्या अशा प्रयत्नांमध्ये जरी सलगता नसली तरी जुने तसेच ठेवायचे आणि जुन्यात शक्य तितके कमी बदल करुन नवे जितपत आवश्यक तितपतच पांघरायचे ही अगदी प्राचीन काळापासूनची खास भारतीय सवय मात्र सलगपणे आजपावेतो दिसून येते.


संदर्भ

 १ ते २१, २४, २५, २६, २९, ३०, ३८ : सत्यशोधक, गो. पु. देशपांडे, दुसरी आवृत्ती, २०१२. {१-पान १९, २ - पान १८, ३ - पान १८, ४ – पान १९, ५ – पान ६६, ६ – पान २७, ७ – पान ७३, ८ – पान ८३, ९ – पान २७, १० – पान ६७, ११ – पान ४२, १२ – पान ४२, १३ – पान ३२, १४ – पान ३५, १५ – पान ३५, १६ – पान ३५, १७ – पान ३४, १८ – पान ४२, १९ – पान ५४, २० – पान ५०, २१ – पान ५०, २४, – पान ३४, २५ – पान ४३, २६ – पान ६०, २९ – पान ८२, ३० – पान ८२, ३८ – पान ८२.


   २२ - महात्मा फुले समग्र वाङ्गमय, संपादक य. दि. फडके,   पाचवी   आवृत्ती, पान ३८५

 २३ – महात्मा फुले व्यक्तित्त्व आणि विचार, गं. बा. सरदार, पान १५५.


 २७ – Mahatma Jotirao Phule, Father of the Indian Social Revolution, Dhananjay Keer, Popular Prakashan, पान १५५


 २८ – महात्मा फुले यांचे नवदर्शन, एक तौलोनिक अभ्यास, लेखक: रा. ना. चव्हाण, संपादक रमेश चव्हाण, प्रकाशक: रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान अक्षर श्रद्धांजली, पान ८१.


 ३१ - महात्मा जोतीराव फुले, वारसा आणि वसा, भा. ल. भोळे, चौथी आवृत्ती, साकेत प्रकाशन, पान १७३


 ३२ – Caste Conflict and Ideology, Mahatma Jotirao Phule and Low caste Protest in Nineteenth-Century Western India, Rosalind O’ Hanlon, paperback edition 2nd Impression, 2012, page 257


 33 – कित्ता, पान ३०५


 ३४ - महात्मा जोतीराव फुले, वारसा आणि वसा, भा. ल. भोळे, चौथी आवृत्ती, साकेत प्रकाशन, पान १६


 ३५ – शाहू छत्रपती आणि लोकमान्य, य. दि. फडके, पान २३७


 ३६ – चौकटीबाहेरचे चिंतन, निवडक वसंत पळशीकर, पान २३७


 ३७ – An Obitury on caste as a system, M. N. Srinivas, National Institute of Advanced Studies, Banglore येथे वाचलेला निबंध, १९९९.






1 comment:

  1. या लेखाच्‍या लेखकाशी मला बोलता येईल का? माझा क्रमांक 9029557767 आणि ईमेल thinkm2012@gmail.com
    कृपया आपला संपर्क क्रमांक पुरवावा.
    किरण क्षीरसागर

    ReplyDelete