Thursday, 24 December 2015

मनमोहक भंडारदरा परिसर



या वीकेंडला भंडारदरा परिसरात सहलीला गेलो होतो. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातला हा भाग. सह्याद्रीत आजपर्यंत जे फिरलो त्यापैकी सगळ्यात जास्त मनमोहक असा हा परिसर वाटला. नगर, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांच्या सीमा जिथे भिडतात अशा ठिकाणी एकीकडे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई अशी जबरदस्त डोंगररांग आणि दुसरीकडे बेलाग रतनगडाकडून हरिश्चंद्रगडाकडे जाणारी डोंगररांग आणि यांच्या मध्यात जवळपास पन्नासेक किलोमीटरचा परीघ असलेला भंडारदरयाचा आरस्पानी जलाशय धारण करणारे प्रवरेचे उगमानजीकचे विस्तीर्ण खोरे. ह्या खोऱ्याचे मैदान इतके विस्तीर्ण आहे की लदाख मधल्या अतिदूर पसरलेल्या मैदानी खोऱ्यांची आठवण व्हावी.

या परिसरात बघण्यासारख्या, अनुभवण्यासारख्या गोष्टी इतक्या आहेत की आठवडाही कमी पडेल. देशातल्या सगळ्यात जुन्या धरणांपैकी एक असलेले 1926 साली बांधून पूर्ण झालेले विल्सन धरण हेही प्रेक्षणीय स्थळ आहे. धरणाशेजारी असलेले इरिगेशनचे गेस्टहाउस हेही  प्रेक्षणीय आहे. भरपूर मोठा कॅम्पस असलेल्या या ठिकाणी अगदी सहजपणे आम्हाला स्वर्गीय नर्तक (paradise flaycatcher), हळद्या (golden oriole), सुतार (woodpecker), तांबट (barbet)  इत्यादी पक्षी दिसले. या गेस्टहाउसचे लोकेशनही फार सुंदर आहे. इथून सकाळी आणि संध्याकाळी जलाशयाची आणि पर्वतरांगांची विहंगम दृश्ये दिसतात. या गेस्टहाउसमध्ये बॉबी सिनेमातल्या हम तुम एक कमरेमे बंद हो या गाण्याचं शूटिंग झाले होते अशी माहिती तिथल्या माणसांनी सांगितली. गेस्टहाउसची सध्याची परिस्थिती फारशी बरी नाही. खरं तर एक ऐतिहासिक आणि सुंदर वास्तू म्हणून सुद्धा या वास्तूचं जतन केलं गेलं पाहिजे.

धरण दगडी बांधकामाचे साधारण पाचशे मीटर लांब आणि ब्याऐशी मीटर उंच आहे. धरणातला एकूण पाणीसाठा अकरा टीएमसी इतका आहे. धरणाचे पाणी सोडण्यासाठीची रचना सौंदर्यदृष्टी दाखवून केलेली आहे. एक गेट असे ठेवले आहे की तिथून सोडले जाणारे पाणी मोठ्या गोलाकार पाषाणावरून खाली कोसळावे. अशा कोसळणाऱ्या प्रपाताचा एक छोटा धबधबाच तयार होतो. नवा मानवनिर्मित धबधबा. इंग्रज अधिकाऱ्यांनीच या धबधब्याचे Umbrella waterfall असे नामकरण केलेले आहे. धरणाच्या खालच्या बाजूला दोनेक किलोमीटर अंतरावर रंधा धबधबा नावाचा स्तिमित करणारा धबधबा आहे. हा धबधबा बघण्यासाठीची व्यवस्थाही छान केलेली आहे. बेसाल्टच्या काळ्या पाषाणाला अर्धवर्तुळाकृती आकारात खोदत खोलवर अरुंद दरीत कोसळणारा धबधबा मन प्रसन्न करतो.

धरणाच्या भिंतीच्या डाव्या बाजूपासून सुरू होउन संपूर्ण जलाशयाला फेरी मारून धरणभिंतीच्या उजव्या बाजूला परत येऊन मिळणारा पन्नासेक किलोमीटरचा रस्ता डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. या रस्त्याने बावीसेक किलोमीटरवर रतनवाडी गाव आहे. जलाशयात पुरेसे पाणी असेल तर इथे छोट्या लॉंचमधूनही जाता येते. रतनवाडीला अमृतेश्वराचे अतिशय सुंदर मंदिर आहे. ठाण्याच्या शिलाहारांपैकी असलेल्या झंझ राजाने हे शिवालय बांधले असे म्हणतात. या झंझ राजाने अशी बारा शिवालये गोदावरी भीमा नद्यांच्या खोऱ्यातल्या सह्य परिसरात वेगवेगळ्या नद्यांच्या उगमापाशी बांधली. गोदावरीच्या उगमाशी त्र्यम्बकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशी त्रिंगलवाडीला, बाम नदीच्या उगमाशी बेलगावला, तरहळ्याच्या धारणा नदीच्या उगमाशी, प्रवरेच्या उगमाशी रतनवाडीला अमृतेश्वर, मुळा नदीच्या मंगळगंगा प्रवाहाच्या सुरुवातीस हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वराचे तर पायथ्याशी खिरेश्वर गावात पुष्पावतीच्या आरंभी नागेश्वराचे, पूर गावात कुकडी नदीच्या उगमाशी कुकडेश्वराचे, मीना नदीच्या उगमाशी पारुंड्याला ब्रम्हनाथाचे, घोडनदीच्या उगमाशी वचपे गावात सिद्धेश्वराचे आणि भीमाशंकरच्या शेजारी भवरगिरीला भीमेच्या सान्निध्यात अशी ही बारा शिवालये आहेत. (संदर्भ: आडवाटेवरचा महाराष्ट्र, प्र.के. घाणेकर). पण नंतरच्या काही इतिहास संशोधकांनी या गृहीतकाला आक्षेप घेतलेला दिसतो. त्यांच्या मते अमृतेश्वराचे मंदीर बाराव्या-तेराव्या शतकातले असावे आणि यादव राजांपैकी कुणीतरी किंवा त्यांच्या मांडलिक राजांनी बांधलेले असावे. तसे छोटेखानी आणि सुबक असलेले हे मंदिर  खरंच फार सुंदर आहे. मंदिराचे शिखर विशेष सुंदर आहे. बेसाल्टच्या दगडात बांधलेले असले तरी यावरील कोरीवकाम नाजूक आहे. बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. मंदिराच्या पश्चिम दरवाजावर अतिशय प्रमाणबद्ध आणि सौंदर्यपूर्ण अशी दोन मिथुनशिल्पे आहेत. विशेष म्हणजे मंदिराला दोन दरवाजे आहेत. एक दरवाजा नाथ सिद्ध योग्यांसाठी होता असे म्हणतात. मंदिराच्या जवळच एक घाटदार चौरस आकाराची दगडात बांधलेली सुदर पुष्करणी आहे. पुष्करणीच्या कडेच्या भिंतींमध्ये दहा कोनाडे आहेत ज्यात सुबक विष्णुमूर्ती आहेत. पूर्वी इथे विष्णूच्या दहाही अवतारांच्या मूर्ती होत्या असे सांगितले जाते. विष्णुमुर्तींपैकी एक शेषशायी विष्णूची मूर्ती विशेष सुंदर आहे.

समोरच्याच रतनगडातून प्रवरा नदी उगम पावते. प्रवरेच्या कोवळ्या प्रवाहाच्या काठावर वसलेले रतनवाडी गाव सुंदर आहे. पावसाळ्यात इथले सौंदर्य विशेष खुलत असणार. इथे आदिवासी विकास विभाग आणि एम टी डी सी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी गावकऱ्यांना (महादेव कोळी) सुंदर पर्यटन निवासस्थाने बांधून हस्तांतरित केलेली आहेत. विशेष म्हणजे ही योजना इथे कार्यान्वित झालेली दिसते. बरेचसे पर्यटक या निवासस्थानांचा लाभ घेतात असे दिसले. अशा निवासस्थानाच्या मालकाला भाड्यापोटीच्या उत्पन्नाबरोबरच पर्यटकांच्या आहाराच्या, तंबू वगैरे पुरवण्याच्या कामातूनही उत्पन्न मिळते. रतनवाडी परिसरात  अशी साताठ निवासस्थाने असावीत. सरकारची ही स्थानिकांना रोजगार देणारी तसेच पर्यटनाला चालना देणारी योजना मला भारी वाटली. सरकारच्या अशा दुर्गम भागातही चांगल्या चालू असलेल्या योजना बघितल्या की माझे तर डोळे भरून येतात. आणि अशा कामात सहभागी असणाऱ्या सहकारी मंडळींबद्दल अभिमान वाटतो.

रतनवाडी पासून जवळच घनदाट झाडीच्या आत एक भूगर्भशास्त्रीय चमत्कार म्हणावे असे अद्भुत स्थळ लपलेले आहे. इथे बेसाल्टच्या पाषाणाला जवळपास वीस पंचवीस फूट रुंद  तीनेकशे फूट खोल आणि काही किलोमीटर्स लांब इतकी भेग गेलेली आहे. यातून जी एक अरुंद घळ तयार झालेली आहे तिला साम्रधची घळ (संधान व्हॅली असेही एक नाव) असे म्हणतात. साम्रध हे जवळच्याच गावाचे नाव. या घळीत उतरून आतमध्ये चालणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. आतमध्ये मोठमोठे पाषाणखंड विखरुन पडलेले आहेत. या खडकांच्या आणि दगडगोट्यांच्या मधून वाट काढत खाली उतरणे तसे जिकीरीचे आहे. पण जसजसे खाली उतरत जावे तसे शब्दश: निसर्गाच्या कुशीत गेल्याचा मन निववणारा अनुभव मिळतो. पूर्ण खाली उतरल्यानंतर एके ठिकाणी छातीएवढ्या पाण्यातून वाट काढत जावे लागते. काहीजण इथे दिवसभरासाठी किंवा मुककामासाठीही येतात.

रतनवाडीपासून पुढे गेल्यानंतर खोऱ्याच्या पश्चिम टोकाला घाटघर गावाजवळ एक छोटेखानी धरण आहे. इथेच कोकणकडा आहे जिथून खाली कोकणात गेलेल्या सह्यपर्वताचे रुद्रसुंदर दृश्य दिसते. कोकणकड्याच्या निम्म्यावर एक छोटेखानी धरण बांधलेले आहे. घाटघर धरणातले पाणी डोंगराआतल्या बोगद्यातून जाणाऱ्या पाइपवाटे खालच्या धरणापर्यंत नेवून वीज निर्मिती केली जाते. खालच्या धरणाशी reverse turbine यंत्रणा आहे जिचा उपयोग करून विजेची गरज नसतानाच्या वेळी वीज वापरून पाणी परत वरच्या धरणात सोडले जाते. असेच आणखी पाचेक किलोमीटर पुढे गेल्यानंतर घाटनदेवी नावाच्या ठिकाणावरून कोकणकड्याचे यापेक्षाही जास्त सुंदर दृश्य दिसते.

दोन मुक्कामांसाठी राहूनही तिथल्या ब-याच गोष्टी बघायच्या राहिल्या. कळसुबाइचा ट्रेक, रतनगडचा तसेच अलंग कुलंग आणि मदन यांचे ट्रेक ह्या जवळपास प्रत्येकी एखादा अर्धा दिवस द्यावा अशा गोष्टी आहेत. जलाशय भरलेला असताना बॅकवाटर्स मधले नौकानयनही बहारदार असते असे म्हणतात. इकडे येण्यासाठी जुलै ते डिसेम्बर हा सगळ्यात उत्तम कालावधी आहे असे म्हटले जाते. राहण्यासाठी इरिगेशन गेस्टहाउस शिवाय फॉरेस्टचे गेस्टहाउस, एम टी डी सी तसेच आनंदवन नावाचा एक खाजगी रिसॉर्ट असे ऑप्शंस आहेत.

Saturday, 25 April 2015

’कोर्ट’ या नव्या मराठी चित्रपटाबद्दल



काल मी कोर्ट सिनेमा बघितला. हा अल्ट्रारिअ‍ॅलिस्टिक म्हणता येईल असा सिनेमा आहे. साठच्या दशकातले रिअ‍ॅलिस्टिक जॉनर मधले सिनेमे सुद्धा फिल्मी वाटावेत इतका ह्या सिनेमातला रिअ‍ॅलिझम कडकडीत आहे. कसलाच एनहान्सर कुठल्याही मूलद्रव्यात न मिसळता हा चित्रपट तयार केला गेला आहे अशी प्रचिती येते. यासाठी दिग्दर्शकाने टिपिकली बॉलिवुडी गाणी तर सोडाच पण कसलेही पार्श्वसंगीत चित्रपटात वापरलेले नाही. दीर्घकाळ चालणारे आणि भरपूर दृश्यात्मक आवाका आणि खोली असणारे स्थिर पद्धतीचे शॉट्स खुबीने वापरलेले आहेत. आत्यंतिक डीजनरेट झालेली स्थानिक पातळीवरची न्यायव्यवस्था ह्यावर चित्रपटाचा मुख्य रोख आहे. व्यवस्थेवर रोख असल्यामुळे चित्रपटातली पात्रे ही प्रातिनिधिक आहेत. त्यांचे व्यक्तिगत रागलोभविकार यांचा त्यांच्या वर्तणुकीवर होऊ शकणारा परिणाम दिग्दर्शकाने शून्यावर ठेवलेला आहे. सगळीच चाकोरीत चालणारी साधी, नॉर्मल माणसे. या अतिचिरफाळलेल्या समाजात आपापल्या समूहांमध्ये/गटांमध्ये त्यातल्या गुणदोषासकट राहणारी. आंबेडकर म्हणत त्याप्रमाणे आपापल्या वेगवेगळ्या बिळात राहणारी. पण ही सगळी जण ज्या (न्याय)व्यवस्थेचे भाग आहेत, ज्या व्यवस्थेला चालवत आहेत ती व्यवस्था मात्र कमालीची किडलेली आहे. जुन्या कलोनियल वारशातून आलेल्या आणि कालबाह्यतेची वाळवी लागलेली प्रोसिजर्स आणि रीती पाळणार्‍या आणि तसल्याच कायद्यांवर चालणार्‍या या उपव्यवस्थेचे दारूण दर्शन कमालीच्या निर्ममतेने चित्रपटातून घडते.
  
कुठल्या एका वर्गावर किंवा गटावर टीका करणे इतका मर्यादित हेतू हा चित्रपट नक्कीच साध्य करू इच्छित नसावा. चित्रपटाची नजर व्यवस्था पातळीवर रोखलेली आहे असे जाणवत राहते. आपापल्या बिळात रममाण असणार्‍या विविध लोकांचा व्यवस्थाअंतर्गत टोकाचा इनडिफरन्स चित्रपटभर सतत ठिबकत राहतो. व्यवस्थेत काम करणारी माणसेही या व्यवस्थेला निमूटपणे सहन करताहेत हेही पोहोचवले जाते. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असलेला पोलीसही दमनकारी प्रक्रियेचा नटबोल्ट म्हणून ऑपरेट होत असताना सुद्धा एका वेगळ्या पातळीवर दयनीय वाटायला लागतो. सेशन कोर्टाचा जज असो किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर असो दोघेही आपापली कामे ठरवून दिल्याबरहुकूम आणि आर्थिक भ्रष्टाचाराशिवाय करणारे लोक आहेत. पण आजूबाजूच्या वस्तुस्थितीपासून हे दोघेही कोरडेपणाने इन्सुलेटेड आहेत. हे खास असे भारतीय पद्धतीचे इन्सुलेशन भेदकपणे अंगावर येते. चित्रपटातल्या सगळ्याच घटनांमध्ये जवळपास सगळ्याच लोकांचा खास भारतीय असा सहनशील निमूटपणा सतत जाणवत राहतो.

दोन्ही वकील आणि शेवटी जज या तीनही महत्वाच्या पात्रांच्या आतल्या व्यक्तिगत तसेच मूल्यात्मक बाजू दिग्दर्शकाने व्यवस्थित दाखवल्या आहेत. पण आरोपी असलेल्या लोकशाहिराच्या या आतल्या बाजू दाखवणे दिग्दर्शकाने टाळलेले दिसते. आणि हीच या चित्रपटाची मर्यादादेखिल आहे. लोकशाहिरास शासनव्यवस्थेविषयी असणार्‍या तीव्र संतापामागील कारणांचा तपास घेण्याचा काही प्रयत्न दिसत नाही. शिवाय शासनव्यवस्था या माणसावरती सतत विविध पद्धतीने झडप का घालते आहे याचेही कुठलेच शोधन केलेले दिसत नाही. खरेतर या दोन्ही गोष्टी अतिशय कळीच्या आहेत. अगदीच वास्तवातल्या उदाहरणांचा मागोवा घेतला तर कबीर कला मंचच्या काही लोकांवर माओवादी/नक्षली मंडळींशी संधान असल्याचे गंभीर आरोप होते. माओवादी/नक्षली/टोकाचे कडवे डावे या लोकांनी आदिवासीबहूल भागांमध्ये वर्षानुवर्षे दमनकारी पद्धतीने स्वतःच्या व्हेस्टेड इंटरेस्टचे जाळे पसरवून बस्तान बसवल्याची सर्वसाधारण धारणा आहे. हिंसेवर मोनोपॉली बाळगणारी शासनव्यवस्था आणि आपली घटनाबाह्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसेचा वापर करणार्‍या टोकाच्या कडव्या डाव्या संघटना यांच्यातले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि गहिरे आहेत. या सगळ्या अवघड गुंतागुंतीपासून दिगदर्शकाने त्याच्या कथावस्तूला इन्सुलेट केलेले आहे. एका ठराविक विषयवस्तूवरचा (स्थानिक न्यायव्यवस्था) तीव्र रोख ढळू नये यासाठी त्याने असे केले असावे असे समजून घेता येते. पण असे केल्याने मांडणीत एक मोठाच अपुरेपणा आलेला आहे असे वाटते.  

हल्ली सोशल मीडीयाच्या अतिरेकामुळे लोकांच्या संवेदना त्रुटीत आणि चिंचोळ्या झालेल्या आहेत. अटेंशन स्पॅन्स वरचेवर कमी होत चाललेले आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडीयामध्ये चालणार्‍या सतत कुठल्यातरी व्यक्तिला इन्स्टंट पद्धतीने हीरो किंवा व्हिलन बनवून मोकळ्या होणार्‍या पोरकट चर्चांमुळे लोकांच्या विचारक्षमतेवर विपरीत परिणाम होत आहेत. एखाद्या गोष्टीच्या मुळाशी असलेल्या व्यवस्थांचे विविध पापुद्रे शांतपणे आणि खोलात जाऊन पाहण्याची रीत नाहीशी होत चाललेली आहे. अशा वेळी एक तरूण दिग्दर्शक तशी रीत जागवणारा एक सुंदर प्रयत्न करतो हे फारच दिलासादायक आहे.        

’इंडियाज डॉटर’ ह्या निर्भयावरच्या डॉक्युमेंटरीबद्दल

निर्भयावरची डॉक्युमेंटरी सणसणीत थोबाडीत मारते. ही थोबाडीत खासकरुन मॅडिसन स्क्वेअरवर आणि सिडनीच्या ऑल फोन्स एरिनावर जमलेल्या गर्दीच्या उन्मादी मानसिकतेला घायाळ करणारी आहे. हे आपलेच बांधव जे बायकामुलींबद्दल मध्ययुगीन मानसिकता बाळगतात, ज्यांचे पालनपोषण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वंचितावस्थेत झालेले आहे, जे महासत्ताक भारतीयांना अनऑर्गनाइज्ड सर्व्हिस सेक्टरमध्ये नोकर म्हणून हवे आहेत पण सहनागरिक म्हणून नको आहेत, जे त्यादिवशी बसमध्ये एकविसाव्या शतकातल्या ऍस्पिरेशनल भारतातल्या एका उमलत्या आणि उड्डाणोत्सुक तरुणीवर अमानवी अत्याचार करत होते.

निर्भयाच्या गोष्टीद्वारे सगळ्याच समाजाने निर्माण केलेले शहाजोग मिथक डॉक्युमेंटरी मोडते. असे मिथक की ज्यामध्ये बलात्कारी लोक हे मुळापासूनच दुष्ट आणि पाशवी आहेत. आयते आणि सुटसुटीत खलनायक आहेत. बलात्कारयांच्या पाशवीपणाची आजुबाजूच्या परिस्थितीत असणारी लालतांबडी लसलशित मुळे डॉक्युमेंटरी दाखवते. अशी मुळे जी ओढायला गेल्यानंतर आपल्या सगळयांनाच हादरे बसतील. सगळीकडेच कमी अधिक प्रमाणात झिरपुन असलेल्या पुरुषसत्ताक आणि स्त्रियांबाबत मागास दृष्टिकोण बाळगणाऱ्या प्रतिगामी मानसिकतेच्या व्याप्तीचे दर्शन डॉक्युमेंटरीतुन होते. मिडियाने ठराविक प्रतिमेत कोंडलेल्या खलनायकाला डॉक्युमेंटरी मोकळा करते आणि खलत्वाच्या सर्वव्यापी सावल्यांची चुणूक दाखवते.
महासत्तेच्या महास्वप्नांमध्ये महामश्गुल असलेल्या महामानवांना डॉक्युमेंटरी बघुन होणाऱ्या निराळ्याच महावेदना सुद्धा समजावून घेता येऊ शकतात. आपल्या भरारीस उत्सुक गौरवशाली समाजाचा पाणउतारा केला जातोय असे त्यांना वाटतेय. सगळ्याच समस्या जीडीपीच्या वाढीतून आणि त्याच्या होणाऱ्या पाझरातून सुटणाऱ्या नाहीत आणि आपल्यातल्या अनेकानेक उणीवांवर आपल्याला मात करावी लागणार आहे हे त्यांनीही समजावून घेणे आवश्यक आहे. अशावेळेस जर कुणी उणीवा दाखवण्याचे काम करत असेल तर त्याचे मोल ध्यानात घेतले पाहिजे.

ज्यांचे कान आयपॉडने आणि डोळे आयफोनने बंद झालेले आहेत अशा समृध्दिमग्न भारतियांना ही थोबाडीत बसणे आवश्यक आहे. आपल्या वैयक्तिक समृद्धीचे कमळ ज्या चिखलात उगवलेले आहे तो चिखल किती खोलवर आणि किती दूरवर पसरलेला आहे याची जाणीव यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

Friday, 22 August 2014

माझ्या वडलांच्या काही प्रेरक आठवणी


माझे वडील श्री. रावसाहेब बलभीमराव गायकवाड म्हणजे आमचे सर्वांचे तात्या हे एक वेगळे व्यक्तिमत्व होते. अंगभूत चांगुलपणा, सचोटी आणि समोरच्या माणसाचे दुःख जाणून घेण्याचा कळवळा याच्या जोरावर त्यांनी त्यांच्या ब्यांऐंशी वर्षाच्या आयुष्यात शेकडो माणसे जोडली. उत्तर सोलापूर तालुक्यातल्या कोंडी गावात त्यांचा जन्म झाला. शिक्षण घेणे, गावातून शहरात येणे आणि सरकारी नोकरी करणे या तिन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या घराण्यात पहिल्यांदाच केल्या. त्या अर्थाने नवी पायवाट चोखाळण्यासाठी लागणारे धाडस आणि आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. सरकारी सेवेत निवड झाल्यानंतर जेंव्हा दूर कोकणातल्या दापोली गावात रुजू होण्यासाठी ते जायला निघाले तेंव्हा त्यांच्या कोंडी गावातल्या घरी हलकल्लोळ उडाला होता. आता काही आपला पोरगा परत येणार नाही याच विचाराने सगळ्यांचा विलाप चालू होता. त्यावेळेस त्यांचे वडील त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी सगळ्यांना धीर दिला. मुळात कुणबिकीची वहिवाट सोडून गावात किराणा दुकानाचा व्यवसाय करणारे वडील बलभीमराव गायकवाड यांच्याकडूनच त्यांना वेगळे धाडस करण्याचा वारसा मिळाला होता.

तात्या जुन्या आठवणी सांगत त्याप्रमाणे आपल्या गावापासून, गणगोतापासून दूर आणि वेगळेच हवापाणी असणार्‍या कोकणातल्या गावात नोकरीसाठी म्हणून राहताना सुरुवातीला त्यांना मानसिक त्रास झाला. पण नंतर मात्र ते त्यांच्या नोकरीत चांगलेच रमले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याच्या कुष्ठरोग नियंत्रण पथकात त्यांनी गावपातळीपासून ते जिल्हापातळीवर कामे केली. खेड्यापाड्यातले कुष्ठरोगी शोधून काढणे आणि त्यांचा अक्षरशः पिच्छा पुरवून त्यांना गोळ्याऔषधे देणे आणि उपचार करणे असे काम त्यांनी आणि त्यांच्या टीमने एखाद्या मिशनसारखे केले. गावातली माणसे सकाळ उलटली की कामावर जात आणि उपलब्ध नसत. शिवाय त्यांना गोळ्याऔषधे खाण्याचा कंटाळा असे. यावर उपाय म्हणून तात्या आणि त्यांच्या टीममधली माणसे पहाटे लवकर उठूनच घरून निघत आणि सकाळी लवकरच गावात हजर होत. गावोगावी सकाळच्या वेळी केल्या जात असलेल्या अशा व्हिजिटचा मोठा परिणाम कुष्ठरोग निर्मूलनाच्या कामावर झालेला असणार आहे. तात्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. त्यावेळेस तिथल्या त्यांच्याबरोबर काम करणार्‍या इतर कर्मचार्‍यांनी तात्यांबद्दलच्या सांगितलेल्या आठवणी फारच हृद्य आणि तात्यांच्या कामावरच्या निष्ठेचा उलगडा करणार्‍या होत्या. तात्यांनी त्यांच्या सहकार्‍यांना गावातली व्हिजिट न चुकवण्याबद्दल बोलताना असे सांगितले होते की व्हिजिटच्या दिवशी तुम्ही मेलात तरी तुमचा मुडदा व्हिजिटसाठी पोहोचला पाहिजे. सरकारी नोकरीत काम करतानासुद्धा कामाबद्दल इतकी निष्ठा आणि जिव्हाळा बाळगण्याची त्यांची वृत्ती विलक्षण म्हणावी अशीच होती. मला स्वतःला सरकारी नोकरीत काम करताना त्यांची ही वृत्ती अत्यंत प्रेरणादायी वाटते.

गावात पाळेमुळे असणार्‍या एकत्र कुटूंबात जडणघडण झाल्यामुळे आणि शिक्षण घेऊन बाहेर पडणारे कुटूंबातले पहिलेच सदस्य असल्यामुळे शिक्षणरुपी वाघिणीचे दूध कुटूंबातल्या इतर सदस्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. परिणामी वेगवेगळ्या ठिकाणच्या शहरातल्या आमच्या घरात कायमच एक किंवा दोन चुलतभावंडे शिक्षणासाठी राहत असत. पोटची चार मुले, बाहेरची दोघेतिघे आणि नवरा नोकरीत पूर्ण रमलेला अशा स्थितीत माझी आईच संसाराचा गाडा एकहाती चालवत असे. आपल्याला जे मिळाले ते आपल्यापैकी इतरांनाही मिळावे आणि ’शहाणे करूनी सोडावे सकळ जन’ अशी वृत्ती दोघांकडेही समान असल्यामुळे आमच्या घरी शिक्षणाची पाणपोयी सतत चालू राहिली.
 
एकूण आठ भाऊ आणि एक बहीण अशा त्यांच्या मोठाल्या एकत्र कुटूंबाचा वडिलांना भारी अभिमान होता. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीनिमित्ताने फिरताना त्यांचा जीव मात्र त्यांच्या गावातल्या गोतावळ्यात गुंतलेला असे. फिरतीची नोकरी करता करता फिरण्याची आवड निर्माण झाल्याने त्यांनी वेगवेगळ्या भागात राहणार्‍या पाहुण्यारावळ्यांशी कायमच जिवंत संपर्क ठेवला होता. या सगळ्या पाहुण्यारावळ्यांच्या नावांची आणि पत्त्यांची अद्ययावत अशी मास्टरलिस्ट त्यांच्याकडे कायमच उपलब्ध असे. एकत्र कुटूंबातल्या एकूण एकोणीस मुलींची लग्ने जमवणे आणि नंतर लग्न करून देण्याची जबाबदारी स्वतःकडे घेऊन लग्नाचे इव्हेंट मॅनेजमेंट रीतसर करणे या कामात ते अग्रभागी होते. या सगळ्या अनुभवामुळे त्यांच्याकडे लग्न लावून देण्यासाठी मार्गदर्शक अशी एक लांबलचक यादीच सिद्ध झाली होती. लग्न लावून देण्याची जबाबदारी नव्यानेच पार पडणारे बरेच जण त्यांच्याकडे ही यादी न्यायला येत. या यादीत वाजंत्री, घोडेवाला पासून ते पूजेच्या वेळी वाटण्यासाठी लागणारी चिल्लर नाणी इथपर्यंत सगळ्याच गोष्टींचा समावेश असे.

त्यांनी स्वतः शिक्षणाचा परीसस्पर्श अनुभवला असल्यामुळे आणि मूळच्या वेगळे काहीतरी करण्याच्या स्वभावामुळे त्यांनी आम्हा मुलांच्या शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिले. चांगल्या आणि निरोगी वाढीसाठी आवश्यक अशी मोकळीक आणि स्वातंत्र्यही दिले. याचाच परिणाम म्हणून नव्वदच्या दशकात मार्गदर्शनाच्या पुरेशा सोयीसुविधा नसतानाही सोलापुरसारख्या भागातल्या एकाच कुटूंबातल्या दोन भावंडांनी देशात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेत यश मिळवण्याची किमया होऊ शकली. १९९३ सालच्या युपीएससीच्या परीक्षेत माझी भारतीय राजस्व सेवेत निवड झाली तर १९९७ सालच्या परीक्षेत माझा धाकटा भाऊ सुशीलची भारतीय रेल्वे ट्रॅफिक सेवेत निवड झाली. मधला भाऊ समीर मराठी साहित्य या विषयात शिवाजी विद्यापीठात सुवर्णपदक मिळवून सर्वप्रथम आला तर मोठी बहीण उर्मिलाने तिच्या कर्णबधिर मुलीला अथक प्रयत्नांनी इतर नॉर्मल मुलामुलींसारखे शिक्षण देण्याचे काम केले. या सगळ्या कामात अर्थातच आमच्या आईचाही सिंहाचा वाटा होता.

साठीत नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा वेगळा अध्याय त्यांनी सुरू केला. माझ्या मधल्या भावाच्या नुकत्याच सुरू झालेल्या औषधाच्या दुकानाची निम्मी जबाबदारी त्यांनी निवृत्तीनंतरच्या काळात घेतली. दुकानाची जबाबदारी आणि इतर सामाजिक कामे यामुळे ते नोकरीच्या काळात होते तितकेच व्यस्त निवृत्तीनंतरच्या काळातही असत. सकाळी लवकर उठून फिरण्याचा व्यायाम करून तयार होता होता त्यांची दिवसभराच्या कामाची लांबलचक यादी तयार झालेली असे. दुकानात काम करणार्‍या कामगारांच्या बारिकसारिक घरगुती अडचणींमध्ये मदत करण्यापासून ते चौकातल्या व्यापार्‍यांची संघटना बांधणे अशी वेगवेगळी कामे ते अतिशय आवडीने करत. व्यवहारातली सचोटी, वागण्यातली ऋजुता आणि हिशोबातला चोखपणा यामुळे ते व्यापार्‍यांच्या वर्तुळातही लोकप्रिय होते.

तात्या सश्रद्ध जरी असले तरी अंधश्रद्ध नव्हते. ईश्वर आपल्या पाठीशी आहे ही त्यांची ठाम समजूत होती. “गॉड इज ऑलमायटी” हे त्यांचे आवडते वाक्य होते. ईश्वराप्रती आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी त्यांना फारशा कर्मकांडांची गरज भासत नसे. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ह्या संतोक्तीतल्या देवाच्या संकल्पनेचेच त्यांनी जास्त अनुसरण केले.
      
वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांची तब्ब्येत खणखणीत होती. मला एकही गोळी किंवा औषध नाही असे ते अभिमानाने सांगत असत. मूळची चांगली प्रकृती आणि जोडीला नियमित व्यायाम यामुळे हल्लीच्या कुठल्याही लाईफस्टाईल डिसिझपासून ते मुक्त होते. एकदा त्यांना त्यांच्या उत्तम प्रकृतीचे रहस्य काय असे विचारले असता त्यांनी त्यामागची त्रिसूत्री सांगितली होती. ती म्हणजे सतत कार्यमग्न असणे, शिस्तबद्धता आणि जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टीकोन. या त्रिसूत्रीचे पालन केल्याने त्यांना अतिशय आनंदी आणि प्रसन्न असे दीर्घायुष्य लाभले आणि त्यांची प्रकृती निरोगी राहिली. त्या त्या मौसमात मिळणारी फळे आवर्जून खाणे, सर्व प्रकारच्या भाज्यांनी युक्त असा चौरस आहार घेणे हेही त्यांच्या निरोगी प्रकृतीचे एक कारण होते. युरोपच्या सफरीवर गेलेले असताना वयाच्या ऐंशीव्या आपण एका दमात आयफेल टॉवर चढून गेलो होतो ही गोष्ट ते अतिशय अभिमानाने सांगत. आपण सहज शंभरी पार करू अशी त्यांची आशावादी कांक्षा होती. पण दुर्देवाने दीडेक वर्षापूर्वी एका अपघातात त्यांच्या डोक्याला इजा होऊन मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि त्यांची इच्छा अपूरी राहिली. अपघातानंतरची दीडेक वर्षे मूळच्या चांगल्या तब्ब्येतीच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी चांगलीच झुंज दिली. शेवटी वीस जून 2014 रोजी त्यांची प्राणजोत मालवली.

आज जरी ते शरीररुपाने आमच्यात नसले तरी त्यांच्या अनेक निरलस कृतींनी शेकडो लोकांच्या आयुष्यात त्यांनी जो प्रकाश निर्माण केला त्यांच्या स्मृतींच्या रुपाने ते नेहमीच आमच्यात असतील. सरकारी नोकरी सेवाभावी आणि मिशनरी वृत्तीने करणे, जीवनाविषयी नेहमी स्वीकारशील आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे, नेहमीच समोरच्या व्यक्तीतल्या चांगल्या गोष्टींना महत्व देणे आणि आजूबाजूच्या लोकांच्या अडचणीत त्यांना मदत करण्यासाठीची कृतीशील करुणा अंगी असणे ही त्यांची वैशिष्ट्ये आम्हा सगळ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहतील.
                       मल्हार आणि यशोदा या दोन नातवंडांबरोबर तात्या  

Tuesday, 27 November 2012

Life of Pi पाहताना


मितींच्या जबड्यातून विस्फारत अनंताकडे
विरघळत जाते अवघे थिएटर

नाचतात थुईथुई भानांचे कण

निखळताना वास्तवाचे विक्राळ नांगर 



सुरु होतो प्रशांत प्रवास

प्रपाती लाटांच्या प्रच्छन्न हेलकाव्यांवरून

उजळवत चुकार कोपरे

आयुष्यभराच्या गुहेतले आदिम.



रेंगाळतो मोरपंखी तृणपात्यावर

महासागराचा निळासावळा दवबिंदू

प्रकटतो सृष्टीचा प्रकांड सांधा

प्रकाशताना खोल पाताळझरे

Sunday, 28 October 2012

Shell Companies, अर्थात खोका कंपन्या

गेले काही दिवस विविध टीव्ही चॅनेल्सवरून ’shell companies’ नावाचा शब्दप्रयोग ऐकण्यात येतोय. अमूक एका कंपनीत shell companies मधून investments झाल्यात वगैरे. मराठी वर्तमानपत्रात आर्थिक व्यवहारांबद्दलच्या बातम्या तितक्या सविस्तर आणि सखोल पध्दतीने येत नाहीत. एका मराठी वर्तमानपत्रात बातमी देताना shell कंपनीबाबत मृतवत कंपनी असा उल्लेख केलेला आढळला आणि गंमत वाटली. मराठीत shell कंपनीसाठी असा वेगळा शब्द नाही. हिंदीत ’खोका कंपनी’ असा सार्थ शब्द आहे. मराठीत हिंदीतला आयता ’खोका कंपनी’ हा शब्द वापरता येतो. नाहीतर शब्दश: अनुवाद करायचा झाल्यास कवच कंपन्या असे म्हणता येऊ शकते.


खोका कंपन्या म्हणजे अशा कंपन्या ज्यांच्या मार्फत काही व्यापार-व्यवसाय-उदीम चालत नाही, ज्यांची काही जिंदगी (assets) नसते, पण त्यांच्या मार्फत बर्‍याचदा इकडून तिकडे पैसे फिरवण्याचे उद्योग होत राहतात. खोका कंपन्या या नेहमीच काळेबेरे करण्यासाठी निर्माण होतात असे नाही. एखादी खरीखुरी कंपनीसुध्दा तिच्यामार्फत चालणारा उद्योग-व्यवसाय काही कारणाने बंद पडल्यास खोका कंपनीत रुपांतरीत होऊ शकते. एखादी अशी कंपनी की जिची जिंदगी (assets) विकली गेलीय, व्यापार-उदीम बंद आहे पण ती विसर्जित झालेली नसल्याने निव्वळ टरफलासाठी पडून आहे, तिला खोका कंपनी म्हणून वापरले जाऊ शकते.

पण बहुदा खोका कंपन्या या तयार केल्या जातात. एखादा आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठीचे अंग असणारा सूत्रधार मनुष्य घरबसल्या कागदोपत्री अनेक कंपन्यांची निर्मिती करतो. कंपन्यांचे memorandum of association बनवणे, त्यांचं रजिस्ट्रेशन करणे, या व यासारख्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाते. डायरेक्टर्स म्हणून कुणी ऑफिसातलाच शिपाई, क्लार्क, ड्रायव्हर वगैरे इमानी आणि विश्वासू प्रकारातल्या व्यक्तींची नेमणूक होते. सूत्रधार माणसाकडे अशा अनेको कंपन्या असतात. एखाद्याला काळा पैसा पांढरा करायचा असल्यास हा सूत्रधार त्याला या खोका कंपन्यामार्फत मदत करू शकतो. उदाहरणार्थ एखाद्याकडे एक कोटी काळे रुपये रोख असतील तर तो ते पैसे सूत्रधारास देईल. बदल्यात सूत्रधार आपले चारपाच टक्के कमिशन कापून घेऊन आपल्याच एखाद्या खोका कंपनीतून त्याला उरलेल्या रकमेचा चेक देईल. सूत्रधाराच्या खोका कंपनीकडून झालेल्या चेकच्या पेमेंटला हवा तो पांढरा रंग देता येऊ शकतो. चेकने दिलेले पैसे म्हणजे खोका कंपनीकडून कर्जाऊ दिलेली रक्कम आहे असे दाखवले जाऊ शकते किंवा ती शेअर इन्व्हेस्टमेंट आहे असे दाखवता येऊ शकते. सूत्रधाराकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत असतात. काहींना चेक देऊन रोख रक्कम हवी असते. अशांना आलेली रोख रक्कम सूत्रधार देऊ करतो आणि बदल्यात त्यांच्याकडून आपल्या एखाद्या खोका कंपनीत चेकने पैसे वळते करू शकतो.

सूत्रधार या अनेक खोका कंपनींचे अनेकानेक बॅंक अकौट्स ऑपरेट करत असतो. या बॅंक अकौंट्सची स्टेटमेंट्स टिपिकल आणि मजेदार असतात. मोठमोठ्या रकमांचे चेक्स सतत या अकौंट्समधून येजा करत असतात. बॅलन्स मात्र किरकोळच असतो. सराईतांना अशी अकौंट्स बघितली तरी ती खोका कंपन्यांची असल्याचे लक्षात येऊ शकते. सूत्रधार वापरत असलेल्या गुपित डायरीतल्या नोंदीसुध्दा मजेदार असतात. पान-पान भर त्यात कुणाकडून किती आले आणि ते कसे त्याला दिले याच्या सांकेतिक भाषेतल्या नोंदी असतात. शिवाय नव्या स्थापावयाच्या कंपन्यांच्या संभाव्य नावांसाठीचा उहापोहसुध्दा काही पानांवर बघायला मिळतो. इतक्या सगळ्या खोट्या कंपन्या तयार करायच्या म्हणजे तसे सोपे काम नसते. इतकी नावंसुध्दा कुठून आणणार? अब्जावधींचे व्यवहार करणारा सूत्रधार स्वतः मात्र फार श्रीमंत नसतो. या सगळ्या उपद्व्यापात त्याला काही कमिशनच तेवढे मिळते. मी तो हमाल भारवाही अशीच त्याची स्थिती असते.

एखादा घोटाळा उघडकीला आल्यानंतरच बर्‍याचदा खोका कंपन्यांची चर्चा होते आणि त्यांची तपासणी सुरु होते. मग कळते की कंपनीचा दिलेला पत्ता खोटा आहे, कंपनीचा काही व्यवसायच नाही, कंपनीचा डायरेक्टर झोपडपट्टीत राहतो, इत्यादी. पण हे साधारणपणे हिंदी सिनेमात सगळे झाल्यावर पोलीस लोक येतात तसेच असते. अर्थात संगणकीकरण, माहीती तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी गोष्टींचा परिणाम म्हणून थोडे थोडे धक्के बसताहेत. Registrar Of Companies च्या वेबसाईटवर पन्नास रुपये भरल्यास कुणालाही कुठल्याही कंपनीची इत्यंभूत माहिती मिळते. या सोयीमुळे एकप्रकारे छोटी क्रांतीच झालीय असे म्हणता येईल. विविध खात्यांकडे प्रचंड प्रमाणात उपलब्ध असणारा डाटा जर इंटिग्रेट केला आणि त्या त्या खात्याला उपलब्ध झाला तर आणखी मोठी क्रांती होऊ शकते. तंत्रज्ञानाचे असे कितीतरी फायदे पेंडींग आहेत. पण आपल्या देशात हे सगळे हळू हळूच होणार. किंबहुना ’हळू हळू होईल’ हे आपल्या देशासाठीचे समर्पक बोधवाक्य ठरू शकते. यात अनुप्रास आहे, वास्तववाद आहे आणि आशावादही आहे.

खोका कंपन्या ही जगभरच्या फायनॅन्शिअल रेग्युलेटर्सना आणि आर्थिक घोटाळ्यांना आळा घालणार्‍यांना छळणारा घटक आहे. अमेरिकेतसुध्दा यांचा उपद्रव कसा रोखावा यासाठीचे प्रयत्न तिथल्या रेग्युलेटरी बॉडीज करत असतात. विकसनशील देशांमध्ये भांडवली बाजारसुध्दा विकसनशील असतो. कार्पोरेट गव्हर्नन्स अविकसित असतो. रेग्युलेटरी बॉडीज विकसनशील असतात. म्हणजे त्यांचे शील विकास पावत असते. बर्‍याच ठिकाणी तर रेग्युलेटर्सच खोका रेग्युलेटर्स असतात. Shell कंपन्यांमधले Shell हे विशेषण तसे साक्षात्कारी स्वरुपाचे आणि अनेक ठिकाणी लागू पडणारे आहे. उदाहरणार्थ Shell Institutions, Shell Organisations वगैरे. म्हणजे कागदोपत्री अस्तित्व असणार्‍या संस्था, संघटना आणि व्यवस्था. नुस्त्याच टरफलासारख्या, दिशाभूल करण्यासाठीच्या. या संस्था संघटनांचे कागदावरचे नियम एक असतात आणि खरोखरचे वेगळे. यांचा खरा पत्ता फार कमीजणांना माहीती असतो. यांचे सूत्रधार कोण असतात आणि त्यांच्या डायर्‍यांमध्ये काय नोंदी असू शकतात हा खरेच रोचक विषय असू शकतो.



Saturday, 6 October 2012

गोष्ट मेंढा गावाची

मागच्या महिन्यात मिलींद बोकील यांनी लिहिलेले "गोष्ट मेंढा गावाची" हे पुस्तक प्रकाशित झाले (मौज प्रकाशन). पुस्तकात बोकीलांनी मेंढा (लेखा) या गडचिरोली जिल्ह्यातल्या गावात गेल्या काही दशकांमध्ये स्वयंशासनाचा जो प्रयोग झाला त्याचे फार सुंदर वर्णन केले आहे. "दिल्ली-मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार" अशी घोषणा घेऊन सर्वसहमतीने गावचा कारभार चालवणे अशी प्रक्रिया मेंढ्यात बर्‍याच काळापासून चालू होती. गावातलेच देवाजी तोफा हे गृहस्थ आणि मोहन हिराबाई हिरालाल हे सर्वोदयी कार्यकर्ते हे या चळवळीचे धुरीण. २००६ साली लोकसभेत मंजूर झालेल्या आणि २००८ साली नियमावलीसहित तयार झालेल्या वनहक्क कायद्यानुसार गावातल्या वनसंपदेवरचे सामुहिक हक्क मिळवणारे मेंढा हे भारतातले पहिले गाव (ऑगस्ट २००९). त्यानंतर गावाने आपल्या मालकीच्या बांबूची विक्री रीतसर लिलाव वगैरे करून व्हॅट भरून PAN, TAN वगैरे काढून केली. मे-जून २०११ मध्ये २१,५०,००० रुपयांची बांबूविक्री झाली आणि २०११-१२ या सालातल्या बांबूविक्रीसाठीची निविदा एक कोटी शहाण्णव हजारांची झाली.



मेंढा गावाने स्वतः होऊन शिक्षण, ग्रामविकास यासंदर्भातल्या योजनासुध्दा गावपातळीवर राबवल्या आहेत. बोकील पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे "मेंढा गावाच्या प्रक्रियांचे सारांशाने वैशिष्ट्य म्हणजे त्यातून त्यांनी सत्ता (पॉवर) या विषयाच्या चर्चेला हात घातलेला आहे". बोकील पुढे म्हणतात, "मेंढा गावातल्या प्रक्रिया मूलतः राजकीय प्रक्रीया आहेत. त्यांच्याकडे सर्वंकष राजकीय आणि सामाजिक चर्चेला खाद्य पुरवणार्‍या संकल्पना म्हणून बघायला पाहिजे. मेंढा हे त्या अर्थाने नवीन संकल्पना मांडणारे गाव आहे. गावाचा कारभार गावाने बघण्याचा मुद्दा असो, दिल्लीतले सरकार आपले आहे असे म्हणण्याचा असो वा आपल्या जंगलावर आपला ताबा हवा असे म्हणण्याचे असो; मेंढा गावाने आपल्याला विचार करण्यासाठी हा सगळा ऐवज पुरवलेला आहे".


नोव्हेंबर २०११ मध्ये मी, सतीश खंडारे आणि प्रकाश पोटे मेंढा गावी गेलो होतो. तेथे देवाजी तोफा यांना भेटणे आणि त्यांच्याकडून त्यांचे विचार आणि अनुभव ऐकणे हा अविस्मरणीय अनुभव होता. सोबत तेंव्हा मेंढा गावच्या ग्रामसभेच्या कार्यालयासमोर काढलेला फोटो जोडला आहे. फोटोत माझी मुलगी यशोदा, प्रकाश, सतीश, देवाजी आणि मी आहोत.