Friday, 22 August 2014

माझ्या वडलांच्या काही प्रेरक आठवणी


माझे वडील श्री. रावसाहेब बलभीमराव गायकवाड म्हणजे आमचे सर्वांचे तात्या हे एक वेगळे व्यक्तिमत्व होते. अंगभूत चांगुलपणा, सचोटी आणि समोरच्या माणसाचे दुःख जाणून घेण्याचा कळवळा याच्या जोरावर त्यांनी त्यांच्या ब्यांऐंशी वर्षाच्या आयुष्यात शेकडो माणसे जोडली. उत्तर सोलापूर तालुक्यातल्या कोंडी गावात त्यांचा जन्म झाला. शिक्षण घेणे, गावातून शहरात येणे आणि सरकारी नोकरी करणे या तिन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या घराण्यात पहिल्यांदाच केल्या. त्या अर्थाने नवी पायवाट चोखाळण्यासाठी लागणारे धाडस आणि आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. सरकारी सेवेत निवड झाल्यानंतर जेंव्हा दूर कोकणातल्या दापोली गावात रुजू होण्यासाठी ते जायला निघाले तेंव्हा त्यांच्या कोंडी गावातल्या घरी हलकल्लोळ उडाला होता. आता काही आपला पोरगा परत येणार नाही याच विचाराने सगळ्यांचा विलाप चालू होता. त्यावेळेस त्यांचे वडील त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी सगळ्यांना धीर दिला. मुळात कुणबिकीची वहिवाट सोडून गावात किराणा दुकानाचा व्यवसाय करणारे वडील बलभीमराव गायकवाड यांच्याकडूनच त्यांना वेगळे धाडस करण्याचा वारसा मिळाला होता.

तात्या जुन्या आठवणी सांगत त्याप्रमाणे आपल्या गावापासून, गणगोतापासून दूर आणि वेगळेच हवापाणी असणार्‍या कोकणातल्या गावात नोकरीसाठी म्हणून राहताना सुरुवातीला त्यांना मानसिक त्रास झाला. पण नंतर मात्र ते त्यांच्या नोकरीत चांगलेच रमले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याच्या कुष्ठरोग नियंत्रण पथकात त्यांनी गावपातळीपासून ते जिल्हापातळीवर कामे केली. खेड्यापाड्यातले कुष्ठरोगी शोधून काढणे आणि त्यांचा अक्षरशः पिच्छा पुरवून त्यांना गोळ्याऔषधे देणे आणि उपचार करणे असे काम त्यांनी आणि त्यांच्या टीमने एखाद्या मिशनसारखे केले. गावातली माणसे सकाळ उलटली की कामावर जात आणि उपलब्ध नसत. शिवाय त्यांना गोळ्याऔषधे खाण्याचा कंटाळा असे. यावर उपाय म्हणून तात्या आणि त्यांच्या टीममधली माणसे पहाटे लवकर उठूनच घरून निघत आणि सकाळी लवकरच गावात हजर होत. गावोगावी सकाळच्या वेळी केल्या जात असलेल्या अशा व्हिजिटचा मोठा परिणाम कुष्ठरोग निर्मूलनाच्या कामावर झालेला असणार आहे. तात्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. त्यावेळेस तिथल्या त्यांच्याबरोबर काम करणार्‍या इतर कर्मचार्‍यांनी तात्यांबद्दलच्या सांगितलेल्या आठवणी फारच हृद्य आणि तात्यांच्या कामावरच्या निष्ठेचा उलगडा करणार्‍या होत्या. तात्यांनी त्यांच्या सहकार्‍यांना गावातली व्हिजिट न चुकवण्याबद्दल बोलताना असे सांगितले होते की व्हिजिटच्या दिवशी तुम्ही मेलात तरी तुमचा मुडदा व्हिजिटसाठी पोहोचला पाहिजे. सरकारी नोकरीत काम करतानासुद्धा कामाबद्दल इतकी निष्ठा आणि जिव्हाळा बाळगण्याची त्यांची वृत्ती विलक्षण म्हणावी अशीच होती. मला स्वतःला सरकारी नोकरीत काम करताना त्यांची ही वृत्ती अत्यंत प्रेरणादायी वाटते.

गावात पाळेमुळे असणार्‍या एकत्र कुटूंबात जडणघडण झाल्यामुळे आणि शिक्षण घेऊन बाहेर पडणारे कुटूंबातले पहिलेच सदस्य असल्यामुळे शिक्षणरुपी वाघिणीचे दूध कुटूंबातल्या इतर सदस्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. परिणामी वेगवेगळ्या ठिकाणच्या शहरातल्या आमच्या घरात कायमच एक किंवा दोन चुलतभावंडे शिक्षणासाठी राहत असत. पोटची चार मुले, बाहेरची दोघेतिघे आणि नवरा नोकरीत पूर्ण रमलेला अशा स्थितीत माझी आईच संसाराचा गाडा एकहाती चालवत असे. आपल्याला जे मिळाले ते आपल्यापैकी इतरांनाही मिळावे आणि ’शहाणे करूनी सोडावे सकळ जन’ अशी वृत्ती दोघांकडेही समान असल्यामुळे आमच्या घरी शिक्षणाची पाणपोयी सतत चालू राहिली.
 
एकूण आठ भाऊ आणि एक बहीण अशा त्यांच्या मोठाल्या एकत्र कुटूंबाचा वडिलांना भारी अभिमान होता. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीनिमित्ताने फिरताना त्यांचा जीव मात्र त्यांच्या गावातल्या गोतावळ्यात गुंतलेला असे. फिरतीची नोकरी करता करता फिरण्याची आवड निर्माण झाल्याने त्यांनी वेगवेगळ्या भागात राहणार्‍या पाहुण्यारावळ्यांशी कायमच जिवंत संपर्क ठेवला होता. या सगळ्या पाहुण्यारावळ्यांच्या नावांची आणि पत्त्यांची अद्ययावत अशी मास्टरलिस्ट त्यांच्याकडे कायमच उपलब्ध असे. एकत्र कुटूंबातल्या एकूण एकोणीस मुलींची लग्ने जमवणे आणि नंतर लग्न करून देण्याची जबाबदारी स्वतःकडे घेऊन लग्नाचे इव्हेंट मॅनेजमेंट रीतसर करणे या कामात ते अग्रभागी होते. या सगळ्या अनुभवामुळे त्यांच्याकडे लग्न लावून देण्यासाठी मार्गदर्शक अशी एक लांबलचक यादीच सिद्ध झाली होती. लग्न लावून देण्याची जबाबदारी नव्यानेच पार पडणारे बरेच जण त्यांच्याकडे ही यादी न्यायला येत. या यादीत वाजंत्री, घोडेवाला पासून ते पूजेच्या वेळी वाटण्यासाठी लागणारी चिल्लर नाणी इथपर्यंत सगळ्याच गोष्टींचा समावेश असे.

त्यांनी स्वतः शिक्षणाचा परीसस्पर्श अनुभवला असल्यामुळे आणि मूळच्या वेगळे काहीतरी करण्याच्या स्वभावामुळे त्यांनी आम्हा मुलांच्या शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिले. चांगल्या आणि निरोगी वाढीसाठी आवश्यक अशी मोकळीक आणि स्वातंत्र्यही दिले. याचाच परिणाम म्हणून नव्वदच्या दशकात मार्गदर्शनाच्या पुरेशा सोयीसुविधा नसतानाही सोलापुरसारख्या भागातल्या एकाच कुटूंबातल्या दोन भावंडांनी देशात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेत यश मिळवण्याची किमया होऊ शकली. १९९३ सालच्या युपीएससीच्या परीक्षेत माझी भारतीय राजस्व सेवेत निवड झाली तर १९९७ सालच्या परीक्षेत माझा धाकटा भाऊ सुशीलची भारतीय रेल्वे ट्रॅफिक सेवेत निवड झाली. मधला भाऊ समीर मराठी साहित्य या विषयात शिवाजी विद्यापीठात सुवर्णपदक मिळवून सर्वप्रथम आला तर मोठी बहीण उर्मिलाने तिच्या कर्णबधिर मुलीला अथक प्रयत्नांनी इतर नॉर्मल मुलामुलींसारखे शिक्षण देण्याचे काम केले. या सगळ्या कामात अर्थातच आमच्या आईचाही सिंहाचा वाटा होता.

साठीत नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा वेगळा अध्याय त्यांनी सुरू केला. माझ्या मधल्या भावाच्या नुकत्याच सुरू झालेल्या औषधाच्या दुकानाची निम्मी जबाबदारी त्यांनी निवृत्तीनंतरच्या काळात घेतली. दुकानाची जबाबदारी आणि इतर सामाजिक कामे यामुळे ते नोकरीच्या काळात होते तितकेच व्यस्त निवृत्तीनंतरच्या काळातही असत. सकाळी लवकर उठून फिरण्याचा व्यायाम करून तयार होता होता त्यांची दिवसभराच्या कामाची लांबलचक यादी तयार झालेली असे. दुकानात काम करणार्‍या कामगारांच्या बारिकसारिक घरगुती अडचणींमध्ये मदत करण्यापासून ते चौकातल्या व्यापार्‍यांची संघटना बांधणे अशी वेगवेगळी कामे ते अतिशय आवडीने करत. व्यवहारातली सचोटी, वागण्यातली ऋजुता आणि हिशोबातला चोखपणा यामुळे ते व्यापार्‍यांच्या वर्तुळातही लोकप्रिय होते.

तात्या सश्रद्ध जरी असले तरी अंधश्रद्ध नव्हते. ईश्वर आपल्या पाठीशी आहे ही त्यांची ठाम समजूत होती. “गॉड इज ऑलमायटी” हे त्यांचे आवडते वाक्य होते. ईश्वराप्रती आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी त्यांना फारशा कर्मकांडांची गरज भासत नसे. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ह्या संतोक्तीतल्या देवाच्या संकल्पनेचेच त्यांनी जास्त अनुसरण केले.
      
वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांची तब्ब्येत खणखणीत होती. मला एकही गोळी किंवा औषध नाही असे ते अभिमानाने सांगत असत. मूळची चांगली प्रकृती आणि जोडीला नियमित व्यायाम यामुळे हल्लीच्या कुठल्याही लाईफस्टाईल डिसिझपासून ते मुक्त होते. एकदा त्यांना त्यांच्या उत्तम प्रकृतीचे रहस्य काय असे विचारले असता त्यांनी त्यामागची त्रिसूत्री सांगितली होती. ती म्हणजे सतत कार्यमग्न असणे, शिस्तबद्धता आणि जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टीकोन. या त्रिसूत्रीचे पालन केल्याने त्यांना अतिशय आनंदी आणि प्रसन्न असे दीर्घायुष्य लाभले आणि त्यांची प्रकृती निरोगी राहिली. त्या त्या मौसमात मिळणारी फळे आवर्जून खाणे, सर्व प्रकारच्या भाज्यांनी युक्त असा चौरस आहार घेणे हेही त्यांच्या निरोगी प्रकृतीचे एक कारण होते. युरोपच्या सफरीवर गेलेले असताना वयाच्या ऐंशीव्या आपण एका दमात आयफेल टॉवर चढून गेलो होतो ही गोष्ट ते अतिशय अभिमानाने सांगत. आपण सहज शंभरी पार करू अशी त्यांची आशावादी कांक्षा होती. पण दुर्देवाने दीडेक वर्षापूर्वी एका अपघातात त्यांच्या डोक्याला इजा होऊन मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि त्यांची इच्छा अपूरी राहिली. अपघातानंतरची दीडेक वर्षे मूळच्या चांगल्या तब्ब्येतीच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी चांगलीच झुंज दिली. शेवटी वीस जून 2014 रोजी त्यांची प्राणजोत मालवली.

आज जरी ते शरीररुपाने आमच्यात नसले तरी त्यांच्या अनेक निरलस कृतींनी शेकडो लोकांच्या आयुष्यात त्यांनी जो प्रकाश निर्माण केला त्यांच्या स्मृतींच्या रुपाने ते नेहमीच आमच्यात असतील. सरकारी नोकरी सेवाभावी आणि मिशनरी वृत्तीने करणे, जीवनाविषयी नेहमी स्वीकारशील आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे, नेहमीच समोरच्या व्यक्तीतल्या चांगल्या गोष्टींना महत्व देणे आणि आजूबाजूच्या लोकांच्या अडचणीत त्यांना मदत करण्यासाठीची कृतीशील करुणा अंगी असणे ही त्यांची वैशिष्ट्ये आम्हा सगळ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहतील.
                       मल्हार आणि यशोदा या दोन नातवंडांबरोबर तात्या  

No comments:

Post a Comment