Thursday, 24 December 2015

मनमोहक भंडारदरा परिसर



या वीकेंडला भंडारदरा परिसरात सहलीला गेलो होतो. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातला हा भाग. सह्याद्रीत आजपर्यंत जे फिरलो त्यापैकी सगळ्यात जास्त मनमोहक असा हा परिसर वाटला. नगर, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांच्या सीमा जिथे भिडतात अशा ठिकाणी एकीकडे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई अशी जबरदस्त डोंगररांग आणि दुसरीकडे बेलाग रतनगडाकडून हरिश्चंद्रगडाकडे जाणारी डोंगररांग आणि यांच्या मध्यात जवळपास पन्नासेक किलोमीटरचा परीघ असलेला भंडारदरयाचा आरस्पानी जलाशय धारण करणारे प्रवरेचे उगमानजीकचे विस्तीर्ण खोरे. ह्या खोऱ्याचे मैदान इतके विस्तीर्ण आहे की लदाख मधल्या अतिदूर पसरलेल्या मैदानी खोऱ्यांची आठवण व्हावी.

या परिसरात बघण्यासारख्या, अनुभवण्यासारख्या गोष्टी इतक्या आहेत की आठवडाही कमी पडेल. देशातल्या सगळ्यात जुन्या धरणांपैकी एक असलेले 1926 साली बांधून पूर्ण झालेले विल्सन धरण हेही प्रेक्षणीय स्थळ आहे. धरणाशेजारी असलेले इरिगेशनचे गेस्टहाउस हेही  प्रेक्षणीय आहे. भरपूर मोठा कॅम्पस असलेल्या या ठिकाणी अगदी सहजपणे आम्हाला स्वर्गीय नर्तक (paradise flaycatcher), हळद्या (golden oriole), सुतार (woodpecker), तांबट (barbet)  इत्यादी पक्षी दिसले. या गेस्टहाउसचे लोकेशनही फार सुंदर आहे. इथून सकाळी आणि संध्याकाळी जलाशयाची आणि पर्वतरांगांची विहंगम दृश्ये दिसतात. या गेस्टहाउसमध्ये बॉबी सिनेमातल्या हम तुम एक कमरेमे बंद हो या गाण्याचं शूटिंग झाले होते अशी माहिती तिथल्या माणसांनी सांगितली. गेस्टहाउसची सध्याची परिस्थिती फारशी बरी नाही. खरं तर एक ऐतिहासिक आणि सुंदर वास्तू म्हणून सुद्धा या वास्तूचं जतन केलं गेलं पाहिजे.

धरण दगडी बांधकामाचे साधारण पाचशे मीटर लांब आणि ब्याऐशी मीटर उंच आहे. धरणातला एकूण पाणीसाठा अकरा टीएमसी इतका आहे. धरणाचे पाणी सोडण्यासाठीची रचना सौंदर्यदृष्टी दाखवून केलेली आहे. एक गेट असे ठेवले आहे की तिथून सोडले जाणारे पाणी मोठ्या गोलाकार पाषाणावरून खाली कोसळावे. अशा कोसळणाऱ्या प्रपाताचा एक छोटा धबधबाच तयार होतो. नवा मानवनिर्मित धबधबा. इंग्रज अधिकाऱ्यांनीच या धबधब्याचे Umbrella waterfall असे नामकरण केलेले आहे. धरणाच्या खालच्या बाजूला दोनेक किलोमीटर अंतरावर रंधा धबधबा नावाचा स्तिमित करणारा धबधबा आहे. हा धबधबा बघण्यासाठीची व्यवस्थाही छान केलेली आहे. बेसाल्टच्या काळ्या पाषाणाला अर्धवर्तुळाकृती आकारात खोदत खोलवर अरुंद दरीत कोसळणारा धबधबा मन प्रसन्न करतो.

धरणाच्या भिंतीच्या डाव्या बाजूपासून सुरू होउन संपूर्ण जलाशयाला फेरी मारून धरणभिंतीच्या उजव्या बाजूला परत येऊन मिळणारा पन्नासेक किलोमीटरचा रस्ता डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. या रस्त्याने बावीसेक किलोमीटरवर रतनवाडी गाव आहे. जलाशयात पुरेसे पाणी असेल तर इथे छोट्या लॉंचमधूनही जाता येते. रतनवाडीला अमृतेश्वराचे अतिशय सुंदर मंदिर आहे. ठाण्याच्या शिलाहारांपैकी असलेल्या झंझ राजाने हे शिवालय बांधले असे म्हणतात. या झंझ राजाने अशी बारा शिवालये गोदावरी भीमा नद्यांच्या खोऱ्यातल्या सह्य परिसरात वेगवेगळ्या नद्यांच्या उगमापाशी बांधली. गोदावरीच्या उगमाशी त्र्यम्बकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशी त्रिंगलवाडीला, बाम नदीच्या उगमाशी बेलगावला, तरहळ्याच्या धारणा नदीच्या उगमाशी, प्रवरेच्या उगमाशी रतनवाडीला अमृतेश्वर, मुळा नदीच्या मंगळगंगा प्रवाहाच्या सुरुवातीस हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वराचे तर पायथ्याशी खिरेश्वर गावात पुष्पावतीच्या आरंभी नागेश्वराचे, पूर गावात कुकडी नदीच्या उगमाशी कुकडेश्वराचे, मीना नदीच्या उगमाशी पारुंड्याला ब्रम्हनाथाचे, घोडनदीच्या उगमाशी वचपे गावात सिद्धेश्वराचे आणि भीमाशंकरच्या शेजारी भवरगिरीला भीमेच्या सान्निध्यात अशी ही बारा शिवालये आहेत. (संदर्भ: आडवाटेवरचा महाराष्ट्र, प्र.के. घाणेकर). पण नंतरच्या काही इतिहास संशोधकांनी या गृहीतकाला आक्षेप घेतलेला दिसतो. त्यांच्या मते अमृतेश्वराचे मंदीर बाराव्या-तेराव्या शतकातले असावे आणि यादव राजांपैकी कुणीतरी किंवा त्यांच्या मांडलिक राजांनी बांधलेले असावे. तसे छोटेखानी आणि सुबक असलेले हे मंदिर  खरंच फार सुंदर आहे. मंदिराचे शिखर विशेष सुंदर आहे. बेसाल्टच्या दगडात बांधलेले असले तरी यावरील कोरीवकाम नाजूक आहे. बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. मंदिराच्या पश्चिम दरवाजावर अतिशय प्रमाणबद्ध आणि सौंदर्यपूर्ण अशी दोन मिथुनशिल्पे आहेत. विशेष म्हणजे मंदिराला दोन दरवाजे आहेत. एक दरवाजा नाथ सिद्ध योग्यांसाठी होता असे म्हणतात. मंदिराच्या जवळच एक घाटदार चौरस आकाराची दगडात बांधलेली सुदर पुष्करणी आहे. पुष्करणीच्या कडेच्या भिंतींमध्ये दहा कोनाडे आहेत ज्यात सुबक विष्णुमूर्ती आहेत. पूर्वी इथे विष्णूच्या दहाही अवतारांच्या मूर्ती होत्या असे सांगितले जाते. विष्णुमुर्तींपैकी एक शेषशायी विष्णूची मूर्ती विशेष सुंदर आहे.

समोरच्याच रतनगडातून प्रवरा नदी उगम पावते. प्रवरेच्या कोवळ्या प्रवाहाच्या काठावर वसलेले रतनवाडी गाव सुंदर आहे. पावसाळ्यात इथले सौंदर्य विशेष खुलत असणार. इथे आदिवासी विकास विभाग आणि एम टी डी सी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी गावकऱ्यांना (महादेव कोळी) सुंदर पर्यटन निवासस्थाने बांधून हस्तांतरित केलेली आहेत. विशेष म्हणजे ही योजना इथे कार्यान्वित झालेली दिसते. बरेचसे पर्यटक या निवासस्थानांचा लाभ घेतात असे दिसले. अशा निवासस्थानाच्या मालकाला भाड्यापोटीच्या उत्पन्नाबरोबरच पर्यटकांच्या आहाराच्या, तंबू वगैरे पुरवण्याच्या कामातूनही उत्पन्न मिळते. रतनवाडी परिसरात  अशी साताठ निवासस्थाने असावीत. सरकारची ही स्थानिकांना रोजगार देणारी तसेच पर्यटनाला चालना देणारी योजना मला भारी वाटली. सरकारच्या अशा दुर्गम भागातही चांगल्या चालू असलेल्या योजना बघितल्या की माझे तर डोळे भरून येतात. आणि अशा कामात सहभागी असणाऱ्या सहकारी मंडळींबद्दल अभिमान वाटतो.

रतनवाडी पासून जवळच घनदाट झाडीच्या आत एक भूगर्भशास्त्रीय चमत्कार म्हणावे असे अद्भुत स्थळ लपलेले आहे. इथे बेसाल्टच्या पाषाणाला जवळपास वीस पंचवीस फूट रुंद  तीनेकशे फूट खोल आणि काही किलोमीटर्स लांब इतकी भेग गेलेली आहे. यातून जी एक अरुंद घळ तयार झालेली आहे तिला साम्रधची घळ (संधान व्हॅली असेही एक नाव) असे म्हणतात. साम्रध हे जवळच्याच गावाचे नाव. या घळीत उतरून आतमध्ये चालणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. आतमध्ये मोठमोठे पाषाणखंड विखरुन पडलेले आहेत. या खडकांच्या आणि दगडगोट्यांच्या मधून वाट काढत खाली उतरणे तसे जिकीरीचे आहे. पण जसजसे खाली उतरत जावे तसे शब्दश: निसर्गाच्या कुशीत गेल्याचा मन निववणारा अनुभव मिळतो. पूर्ण खाली उतरल्यानंतर एके ठिकाणी छातीएवढ्या पाण्यातून वाट काढत जावे लागते. काहीजण इथे दिवसभरासाठी किंवा मुककामासाठीही येतात.

रतनवाडीपासून पुढे गेल्यानंतर खोऱ्याच्या पश्चिम टोकाला घाटघर गावाजवळ एक छोटेखानी धरण आहे. इथेच कोकणकडा आहे जिथून खाली कोकणात गेलेल्या सह्यपर्वताचे रुद्रसुंदर दृश्य दिसते. कोकणकड्याच्या निम्म्यावर एक छोटेखानी धरण बांधलेले आहे. घाटघर धरणातले पाणी डोंगराआतल्या बोगद्यातून जाणाऱ्या पाइपवाटे खालच्या धरणापर्यंत नेवून वीज निर्मिती केली जाते. खालच्या धरणाशी reverse turbine यंत्रणा आहे जिचा उपयोग करून विजेची गरज नसतानाच्या वेळी वीज वापरून पाणी परत वरच्या धरणात सोडले जाते. असेच आणखी पाचेक किलोमीटर पुढे गेल्यानंतर घाटनदेवी नावाच्या ठिकाणावरून कोकणकड्याचे यापेक्षाही जास्त सुंदर दृश्य दिसते.

दोन मुक्कामांसाठी राहूनही तिथल्या ब-याच गोष्टी बघायच्या राहिल्या. कळसुबाइचा ट्रेक, रतनगडचा तसेच अलंग कुलंग आणि मदन यांचे ट्रेक ह्या जवळपास प्रत्येकी एखादा अर्धा दिवस द्यावा अशा गोष्टी आहेत. जलाशय भरलेला असताना बॅकवाटर्स मधले नौकानयनही बहारदार असते असे म्हणतात. इकडे येण्यासाठी जुलै ते डिसेम्बर हा सगळ्यात उत्तम कालावधी आहे असे म्हटले जाते. राहण्यासाठी इरिगेशन गेस्टहाउस शिवाय फॉरेस्टचे गेस्टहाउस, एम टी डी सी तसेच आनंदवन नावाचा एक खाजगी रिसॉर्ट असे ऑप्शंस आहेत.

No comments:

Post a Comment