वयाच्या
अवघ्या साडेतेविसाव्या वर्षी आपले जीवनपुष्प प्राणप्रिय देशावर आनंदाने ओवाळून
टाकणार्या शहीद
भगतसिंहाची ओळख एक सशस्त्र क्रांतिकारक आणि निस्सीम देशभक्त म्हणून सगळ्याच
भारतीयांना आहे. पण इतक्या कोवळ्या वयात आपले आयुष्य देशाच्या चरणी हसत हसत
अर्पण करणार्या शहीद भगतसिंहानी
आपल्या अल्पशा आयुष्यात सखोल चिंतन आणि मनन केलेले होते आणि विविध विषयांवर विविध पद्धतीने आपली मते व्यक्त केली
होती याची माहिती फारच कमी जणांना असेल. वयाच्या तेराव्या वर्षीच भगतसिंहानी असहकार आंदोलनात उडी घेतली होती. नंतर
वयाच्या सोळाव्या वर्षी घराचा आणि शिक्षणाचा त्याग करून ते स्वातंत्र्य चळवळीत पूर्ण वेळ
सहभागी झाले होते. आजोबा सरदार अर्जुनसिंह, दोन्ही काका आणि वडील यांच्याकडून
भगतसिंहांना अन्यायाविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढण्याचा तेजस्वी वारसा मिळाला होता. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच
विविध टोपणनावांनी विविध नियतकालिकांमधून लेखन केले. भगतसिंहानी वेळोवेळी केलेल्या आणि
नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या समग्र लेखनाबरोबरच त्यांनी लिहिलेले इतर
प्रदीर्घ लेख, केलेली
भाषणे, प्रसृत केलेली
घोषणापत्रे, लिहिलेली
पत्रे, कारागृहात
विविध ग्रंथांचे वाचन करताना केलेल्या नोंदवहीतल्या शेकडो
नोंदी अशा अनेक दस्तऐवजांचे संपादन करून हा पाचशे नव्वद
पानांचा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. मुळात हिंदी भाषेत २००४ साली प्रकाशित झालेल्या 'भगतसिंह के दस्तावेज' या संपादित ग्रंथामध्ये भगतसिंहांच्या ७६
दस्त ऐवजांचा समावेश होता. या दस्त
ऐवजांमध्ये आणखी काही दस्त ऐवजांची भर घालून दत्ता देसाई
यांनी २००७ साली भगतसिंहांच्या जन्मशताब्दी वर्षात मराठीतल्या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपादित केली होती.
या वर्षी २३ मार्च २०१६ रोजी 'शहीद
भगतसिंह समग्र वाड्मय' या
ग्रंथाची दुसरी विस्तारित आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या आवृत्तीत एकूण १२३ दस्त ऐवजांचा समावेश आहे. हिंदी
खंडातही नसलेले एकूण ४३ दस्त ऐवज या ग्रंथात समाविष्ट
केलेले आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर नोंदवल्याप्रमाणे
भगतसिंहांचे आजवरचे सर्व उपलब्ध लेखन एकत्र आणणारा हा भारतातील एकमेव ग्रंथ आहे.
वयाच्या
अवघ्या सतराव्या वर्षीच गंभीर स्वरुपाचे लिखाण सुरू करणार्या भगतसिंहांचे पुढच्या
उण्यापुर्या सहा-साडेसहा
वर्षातले विविध विषयांवरचे लेखन स्तिमित करणारे आहे. त्यांच्या तीव्र आकलनक्षमतेचे, असामान्य वस्तुनिष्ठतेचे, वैचारिक प्रगल्भतेचे, मांडणीतील स्पष्टतेचे आणि भाषेवरील प्रभुत्वाचे
मोहक दर्शन या
लेखनामधून होते. संपादकाने अनुक्रमणिकेत नोंदवल्याप्रमाणे या लेखनातील विषयांची वर्गवारी विद्यार्थी-युवकासांठी संदेश, स्वातंत्र्यासाठीच्या उठावांचा इतिहास, राजकीय कार्याबद्दलचे लेखन, आमूलाग्र समाजक्रांतीचा विचार, क्रांतिकारी नैतिकता, भाषा, साहित्य व समाज, आंतरराष्ट्रीय विचार, क्रांतिकारी चिंतन व अभ्यास आणि
व्यक्तित्व दर्शन अशी करता येते. यातून या सगळ्या लेखनाचा प्रदीर्घ पट आणि आवाका दिसून येतो.
शहीद
भगतसिंहांनी ’आजादी
की भेंट शहादते’ या
शीर्षकाची एक लेखमाला
'किरती’ नावाच्या नियतकालिकात लिहिली होती
ज्यामध्ये त्यांनी विविध चौतीस शहिदांच्या बलिदानाचा परिचय
वेगवेगळ्या लेखांद्वारे करुन दिला
होता. ह्या
लेखांमधून त्या सगळ्या शहीदांची भगतसिंहांनी केलेली वर्णने वाचताना अंगावर शहारे येतात.
शहीदांच्या हौतात्म्यातील सौंदर्यावर फिदा झालेली भगतसिंहांची कविप्रतिभा या लेखांमध्ये
बहरून आलेली दिसते.
स्वत: भगतसिंह हौतात्म्यास ज्या चैतन्यमयी निश्चलतेने सामोरे गेले ते पाहता
त्याच्या कितीतरी आधी लिहिलेल्या या लेखांमध्ये त्यांनी
त्या हुतात्म्यांच्या समर्पण भावाने ओतप्रोत अशा भावभावनांचे अगदी तशाच प्रकारे केलेले वर्णन अनोखे आहे. डॉ अरुडसिंह
यांच्यावरील लेखाची सुरुवातच ते अशी करतात – “देशप्रेमाने वेडे होऊन जळत्या
दिव्याच्या पहिल्याच ज्वाळेत भस्म होणार्या एखाद्या मस्त पतंगाप्रमाणे त्यांनी आपले सर्व काही
स्वाहा केले”. श्री
मेवासिंह यांच्यावरील
लेखात ते लिहितात – “शेवटी
तो क्षणदेखील येऊन ठेपला. अहा! बघा तरी, तो ध्येयवेडा किती उत्साहाने फाशीच्या
तख्ताकडे चालला आहे! भीती
आणि काळजी
यांचा लवलेशही त्याच्या आसपास नाही”. भाई बालमुकुंद यांच्यावरील लेखात ते लिहितात – “भाई बालमुकुंदांना फाशी झाली. असे
सांगितले जाते, की त्या दिवशी त्यांच्या
आनंदाला पारावार
राहिला नव्हता. शिपायाच्या हातातून हात सोडवून घेत ते स्वतः फाशीच्या
तख्तावर जाऊन पोहोचले.
अहा! असे धाडस या क्रांतिकारकांशिवाय अन्य कुठे असेल. मृत्यूबाबत एवढी उपेक्षा दाखवण्याचे धाडस सर्वसामान्य लोक करूच शकत नाहीत”.
हुतात्म्यांच्या समर्पणांचे गुणगाण करणारी ही वर्णने वाचताना असे प्रतीत होते की
भगतसिंह एक प्रकारे स्वतःच्या भावी हौतात्म्याची पूर्वतयारीच करत होते. त्यांच्यात ओतप्रोत असलेली देशासाठी प्राणाची
आहुती देण्याची तीव्र समर्पणेच्छा या लेखांमधून दिसते. भगतसिंहांची ही तीव्र समर्पणेच्छा
त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी घरच्यांचा लग्नाचा आग्रह डावलताना वडिलांना लिहिलेल्या पत्रातही
दिसून येते.
पत्रात ते लिहितात – “माझे
जीवन भारतीय स्वातंत्र्याच्या
उच्च ध्येयासाठी
अर्पण करण्यात आलेले आहे. त्यामुळे आरामदायी व प्रापंचिक सुखांचे आकर्षण यांना माझ्या जीवनात काहीच स्थान
नाही. तुम्हाला आठवत असेलच, की
लहान होतो तेव्हा आजोबांनी
माझ्या मुंजीच्या वेळेस जाहीर केले होते, की मला देशसेवेसाठी अर्पण करण्यात आले
आहे. म्हणूनच मी त्यावेळची प्रतिज्ञा पूर्ण करत
आहे”.
या
ग्रंथात समाविष्ट असलेल्या भगतसिंहांच्या
’मी नास्तिक का आहे’ ह्या त्यातल्या त्यात प्रसिद्ध लेखाच्या अनुषंगाने भगतसिंह हे नास्तिक गृहस्थ होते इतपतच
माहिती सर्वसाधारणपणे वाचकांना असते. पण स्वच्छ आणि सुस्पष्ट अशा विश्लेषण शक्तीचे प्रत्यय
देणार्या ह्या लेखातून भगतसिंहांचा नास्तिक असण्यामागचा दृष्टिकोन त्याच्या खोली आणि रूंदीसकट
तर समजतोच शिवाय
त्यांच्या स्वतःकडेही तीक्ष्ण आणि परखड वस्तुनिष्ठतेने पाहण्याच्या क्षमतेचाही दाखला
देतो. ते या लेखात म्हणतात – “पोकळ
ऐट हा माझ्या स्वभावाचा नक्कीच एक भाग आहे. माझ्या
सहकार्यांत मी एक एकाधिकारशहा म्हणून ओळखला जात होतो......काही मित्र
गंभीरपणे तक्रार करतात की मी माझ्या नकळत माझी मते दुसर्यांवर लादतो.
आणि माझे प्रस्ताव
मान्य करून घेतो.
त्यात काही अंशी तथ्य आहे हे मी नाकारत नाही.” नास्तिकतेबद्दलचे विवेचन करताना त्यांनी श्रद्धेच्या सकारात्मक
बाजूचीही पुरेशी दखल घेतलेली दिसते. त्यांची स्वतःच्या नास्तिकतेबद्दलची भूमिका त्यामुळेच
सहृदय, समतोल आणि शास्त्रकाट्याच्या
कसोटीवरून सिद्ध झालेली वाटते.
ते म्हणतात – “मला ठाऊकच आहे सध्याच्या
माझ्या परिस्थितीत (फाशीची शिक्षा होउन कैदेत असतानाच्या) माझी जर देवावर श्रद्धा
असती तर माझे आयुष्य सुसह्य झाले असते, माझ्या मनावरचा भार कमी झाला असता. उलट, देवावर विश्वास नसल्याने परिस्थिती जास्तच
बिकट, रुक्ष आणि असह्य झाली आहे. थोड्याशा गूढवादाच्या स्पर्शाने ती काव्यमय
झाली असती. पण माझ्या प्राक्तनाला सामोरे जाताना अशा प्रकारच्या कोणत्याही मादक कैफाची मदत
मला नको आहे. मी वास्तववादी आहे. विवेकाच्या जोरावर माझ्यातल्या नैसर्गिक
प्रवृत्तीवर मात करण्याचा माझा प्रयत्न आहे”. किती प्रांजळ आणि प्रगल्भ उद्गार आहेत
हे.
देशासाठी
प्राणाची आनंदाने आणि उत्साहाने आहुती देण्याचा निर्णय भगतसिंहांनी अगदीच अंत:प्रेरणेने
पण तरीही एका पातळीवर नियोजनपूर्वक घेतला असणार असे वारंवार लक्षात येते.
तसेच देशाच्या स्वातंत्र्याविषयी
त्यांनी खोलवरचा
विचार केला होता आणि त्यांच्या त्याबद्दलच्या विचारांना अभ्यासातून आलेली पक्की बैठक होती असेही दिसते. ते
म्हणतात – “प्रथमदर्शनी मी एखाद्या
दहशतवाद्यासारखे वागलो आहे असे
दिसते. पण मी दहशतवादी नाही. मी एक असा क्रांतिकारक आहे, की ज्याच्या एका दीर्घकालीन कार्यक्रमाविषयी काही निश्चित आणि ठोस अशा
कल्पना आहेत”. असेंब्ली
बॉम्ब केसमध्ये दिलेल्या जबानीत त्यांनी क्रांती म्हणजे काय याची
व्याख्या केलेली आढळते – “क्रांती म्हणजे सध्या
अस्तित्वात असणारी समाजव्यवस्था
संपूर्णपणे उलथवून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था
प्रस्थापित करणे. या ध्येयाच्या
पूर्तीसाठी आपले
ताबडतोबीचे उद्दिष्ट आहे – सत्ता
हस्तगत करणे. वस्तुस्थिती अशी आहे की, राज्यसंस्था म्हणजे शासकीय यंत्रणा हे
सत्ताधारी वर्गाच्या हातातले स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी व जोपासण्यासाठी वापरायचे एक हत्यार आहे. आम्हाला ते हिसकावून
घेऊन आमच्या ध्येयपूर्तीसाठी वापरायचे
आहे”. भगतसिंहांच्या ’युवा राजकीय कार्यकर्त्यांना पत्र’
या दस्त ऐवजाबद्दल
भगतसिंहांची पुतणी श्रीमती वीरेंद्र संधू यांनी “हा शास्त्रीय समाजवादी विचाराने भारतासाठी
क्रांतिकारक कार्यक्रमाचा प्राथमिक
आराखडा मांडण्याचा देशातील पहिलाच प्रयत्न असावा” असे म्हटल्याचे पुस्तकात नमूद केलेले आहे. भगतसिंह शास्त्रीय समाजवादाच्या
विचाराने संपूर्णपणे भारलेले जरी असले तरी ते जर अधिक काळ जगले असते तर त्यांनी त्या विचारांचा
नंतर भारतीय संदर्भात स्वतंत्रपणे विचार केला असता आणि स्वतःच्या प्रखर चिकित्सावादी दृष्टिकोनाच्या
साहाय्याने पुढचा वैचारिक प्रवास केला असता असे त्यांचे समग्र लेखन वाचल्यानंतर प्रतीत होत
राहते.
पुस्तकाच्या
’क्रांतिकारी चिंतन व
अभ्यास’ या विभागात तुरूंगात असताना
भगतसिंहांनी सुरुवातीस सुट्या कागदावर
नोंदवलेली आणि नंतरच्या काळात तुरुंगाधिकाऱ्यांनी रीतसर उपलब्ध करून दिलेल्या
वहीत केलेली टिपणे
दिलेली आहेत. या नोंदींमध्ये १०७ लेखकांची नावे आणि अवतरणे आढळतात. संपादकांच्या भाषेतच सांगायचे झाल्यास “यातून भगतसिंहांचे वैविध्यपूर्ण,
सखोल आणि जागतिक पातळीवरील साहित्याचे
वाचन आपल्यासमोर येते. बालमजुरीचा निषेध करणार्या छोट्या कवितेपासून ते
राज्यसंस्था आणि मानवी अधिकारापर्यंतचे
विविध पैलू जसे यात दिसतात; तसेच
भारत, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियाबाबतची आर्थिक आकडेवारी, संपत्तीच्या वाटपातील विषमता, कष्टकर्यांच्या शोषणाचे आकारमान व
भांडवली पद्धतीमुळे
या समाजांमध्ये होणारा विनाश हे जाणून घेण्यापासून ते मार्क्सची मूल्य
संकल्पना समजून घेण्यापर्यंतची भगतसिंहांची धडपड
त्यातून जाणवते.... “चिकित्सकपणा आणि स्वतंत्र
विचारशक्ती हे दोन गुण क्रांतिकारकांसाठी अपरिहार्य आहेत” असे सांगणारे भगतसिंह “...भारतीय क्रांतीचे बौद्धिक अंग हे नेहमीच कमकुवत राहिले....यासाठीच क्रांतिकारकाने
अभ्यास व चिंतन-मनन ही आपली पवित्र जबाबदारी मानली पाहिजे” असे जेव्हा तळमळीने सांगतात, तेव्हा त्यामागे त्यांची स्वतःची अल्पवयातील एवढी प्रचंड ज्ञानसाधना असते, हे विसरता येत नाही.”
पुस्तकामध्ये
मूळच्या हिंदी आणि इंग्रजी दस्तऐवजांचा मराठीतील अनुवाद अर्थवाही आणि सुलभ पद्धतीने केलेला दिसतो. पुस्तकाची विषयवार केलेली विभागणीही
समर्पक आहे. जिथे जिथे आवश्यक आहे तिथे
संदर्भासाठी, पार्श्वभूमी
समजावून सांगण्यासाठी तसेच खुलासेवजा
माहिती देण्यासाठी संपादकांनी संक्षिप्त प्रास्ताविके केलेली दिसतात. या
प्रास्ताविकांमधून अनेक ठिकाणी त्यांनी भगतसिंहांच्या विचारविश्वाचे तसेच
व्यक्तिमत्वाचे मर्म उलगडून दाखवलेले दिसते. भगतसिंहांचे अनेक अप्रकाशित दस्तऐवज
कष्टाने गोळा करून
त्यांचे अनुवाद करवून घेवून त्यांचे नेटकेपणाने संपादन करून हा महत्वाचा ग्रंथ सिद्ध
केला गेलेला आहे.
भगतसिंहांचे
सर्व प्रकारचे समग्र लेखन एकत्रित उपलब्ध करून देणारे हे पुस्तक भगतसिंहांविषयीचे आपले आकलन मोठ्या प्रमाणात विस्तारते. वरवर पाहता एक सशस्त्र
क्रांतिकारक आणि प्रेरणादायी हुतात्मा अशीच ओळख असणार्या या थोर माणसाबद्दलचा आपला
दृष्टिकोन हे पुस्तक वाचल्यानंतर पूर्णपणे पालटतो. सशस्त्र क्रांतिकारक,
तीव्र समर्पणेच्छा असणारा हुतात्मा,
सूक्ष्म आणि बहुपेडी राजकीय जाण असणारा मुत्सद्दी, शास्त्रीय समाजवादाबद्दल चिकित्सक विचार करणारा
अभ्यासक, जमिनीशी पक्की नाळ
असलेला कुशल
संघटक, जनमानसावर गारूड
करण्याचा अंगभूत
करिश्मा असणारा नेता या भगतसिंहांच्या विविध रूपांचे दिपवून टाकणारे दर्शन हे पुस्तक
वाचताना होते. भगतसिंह जर आणखी जास्त काळ जगले असते तर भारताच्या समाजकारणाची आणि राजकारणाची दिशा
कदाचित पूर्णपणे वेगळी झाली असती असे वाटत राहते. अशी दिशा देण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेकविध
गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना
तीव्रपणे येत राहतो.
(पूर्वप्रसिद्धी: सा. साधना)
(पूर्वप्रसिद्धी: सा. साधना)
No comments:
Post a Comment