शेतकऱ्यांच्या
आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. आत्महत्यांची कारणमीमांसा करणारे विचार वेगवेगळ्या
व्यासपीठांवर आणि माध्यमांमार्फत मांडले जात आहेत. आत्महत्यांचा अर्थ लावण्याचे आणि
त्यानुसार धोरणांना दिशा देण्याचे प्रयत्नसुद्धा वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या आकलनानुसार
आणि अजेंड्यानुसार करत आहेत. मॅक्स वेबर या समाजशास्त्रज्ञाची मदत घेऊन बोलायचे झाल्यास
जो तो आपापल्या मूल्यचौकटीतून या घटनांकडे बघतो आहे. या बघण्याचे असे जितके जास्त कोन
मिळतील तितके आपण त्या घटनांच्या मुळाशी पोहचू शकू.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांचा आजवर घेतलेला
तपास पाहता असे लक्षात येते की ’ भांडवली शेती समर्पक पध्दतीने करता न येणे आणि भांडवली
शेती करण्यात आलेल्या अपयशाची नीट व्यवस्था लावता न येणे ’ या कारणाची संभवनीयता नीट
तपासली गेलेली नाहीये.
इथे
सुरुवातीलाच हे लक्षात घेतले पाहिजे की आत्महत्यांची समस्या ही गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांची
नाही. गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की त्यांना मुळात भांडवली
पध्दतीची शेती करण्याचा पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे तो पर्याय हाताळताना निर्माण
होणाऱ्या दुःखाला त्यांना सामोरं जावं लागत नाही.
भांडवली
पध्दतीची शेती हा प्रकार पाश्चात्यांकडून आपल्याकडे पोहोचलेला आहे. त्याचे हार्डवेअर
आणि सॉफ्टवेअर हे पाश्चात्य मातीतच तयार झालेले आहे. प्रबोधन, औद्योगिक क्रांती, आधुनिकीकरण
इ. चा इतिहास पाठीशी असणाऱ्या पाश्चात्य समाजांमध्ये स्वाभाविक पध्दतीने आणि स्वाभाविक
गतीने भांडवली अर्थव्यवस्थेचा आणि तिचाच एक घटक म्हणून भांडवली शेतीचा उगम झाला. भांडवली
शेतीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्रित विकास पावलेले आणि परस्परानुरूप असे आहे.
हायब्रीड
बी-बियाणांचा वापर, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर, यांत्रिकीकरण आणि या सगळ्यांसाठी
जास्तीच्या पैशाची गरज ही भांडवली शेतीच्या हार्डवेअरची काही प्रमुख लक्षणे सांगता
येतील. तर जमीन, पिके, पाणी यांच्याकडे निव्वळ उत्पादनाचे घटक म्हणून बघणे, शेतीची
प्रक्रिया आध्यात्मिक, भावनिक ऊर्जा देणारी प्रक्रिया न राहता मुख्यत्वेकरून आर्थिक प्रक्रिया
बनणे, शेती ही सबंध जगण्याला तोलणारी गोष्ट न राहता जगण्याच्या काही ठराविक भागांपुरतीच
उरणे, शेती करणाऱ्यांच्या संस्कृतीत, मनोभूमिकेमध्ये, सवयींमध्ये बदल होणे इत्यादी
भांडवली शेतीच्या सॉफ्टवेअरची प्रमुख लक्षणे म्हणता येतील. पैकी मनोभूमिकेमधील बदलांची
उदाहरणे म्हणून मनाचा खंबीरपणा, हिशेबी वृत्ती, खर्चाबद्दलचा संयम, लाभहानीच्या शक्यतांची
नेमकी महिती करून घेण्याची सवय ही सांगता येतील. सणासमारंभांची असणारी संख्या, त्यावर
खर्च होणारा वेळ व पैसा, त्याला असणारे महत्त्व हे कमी होणे, तसेच मानाच्या, प्रतिष्ठेच्या
कल्पनांमध्ये बदल होणे इत्यादी संस्कृतीतील बदलांची काही उदाहरणे म्हणून सांगता येतील.
आपल्या समाजात पाश्चात्यांकडून आलेल्या इतर सगळ्या आधुनिक गोष्टींचे जे झाले तेच भांडवली
शेतीचेही होत आहे, असे म्हणता येईल. भांडवली शेतीचे हार्डवेअर आपल्याकडे सहजी पोहोचलेले आहे, पण सॉफ्टवेअर अजून
सर्वत्र मुरलेले नाही. खेड्यांमध्ये तर या सॉफ्टवेअरचा मागमूसही दिसत नाही. याचा परिणाम
भांडवली शेतीत अपेक्षित यश न येण्यात आणि आलेल्या अपयशास नीट तोंड न देता येण्यात होऊ
शकतो.
भांडवली
शेती ही आधी सांगितल्याप्रमाणे भांडवली अर्थव्यवस्थेचाच घटक आहे. तिचा उदय पाश्चात्य
समाजांमध्ये झालेला आहे. मॅक्स वेबरने सिध्द केल्याप्रमाणे भांडवलशाहीचा उगम युरोपात
अशाच समाजांमध्ये झाला जिथे समूहमनाची घडण भांडवलशाहीच्या उगमास प्रेरक अशी होती. प्रॉटेस्टंटांपैकी
काल्विनपंथीयांमध्ये जीवनविषयक, आचार आणि विचारविषयक अशा श्रध्दा आणि समजुती होत्या
ज्यांचा उपयोग भांडवलशाहीस प्रेरक अशी मनोभूमिका तयार होण्यात झाला असे त्याने त्याच्या
’ प्रॉटेस्टंट एथिक्स अॅन्ड स्पिरिट ऑफ कॅपिटॅलिझम’ या ग्रंथात मांडले आहे. याचाच
विस्तार करून असे म्हणता येऊ शकते की भांडवली अर्थव्यवस्थेचा प्रसार/ विस्तार अशाच
समाजांमध्ये जास्त वेगाने झाला जिथे समूहमनाची घडण भांडवलशाहीस जास्त पोषक व अनुकूल
होती. भांडवली अर्थव्यवस्था जगभर जवळपास सर्वत्र
पसरलेली आहे. अर्थातच ज्या समाजांमध्ये या व्यवस्थेस पोषक अशी समूहघडण नाही त्या
समाजांमध्ये लोकांच्या आचारविचारांच्या सवयी, मूल्यरचना, समजुती इत्यादी सॉफ्टवेअरस्वरूप
गोष्टींमध्ये अनुकूल अशा प्रकारचे बदल होण्याची प्रक्रिया चालू असताना दिसते. आपल्याइथे
स्वाभाविकच महानगरांमध्ये ही प्रक्रिया जास्त वेगवान आहे. त्याखालोखाल शहरांमध्ये ही
प्रक्रिया दिसून येते. खेडी मात्र अजूनही या प्रक्रियेपासून तशी दूरच आहेत. याचा परिणाम
असा होतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत हिरीरीने
उडी घेऊ इच्छिणाऱ्या शहरी माणसाला पोषक मनोभूमिकेचा स्प्रिंगबोर्ड उपलब्ध असतो पण खेड्यातल्या
असे धाडस करणाऱ्यांना तो उपलब्ध नसतो.
शेतकऱ्यांच्या
आत्महत्यांवर जेव्हा जेव्हा चर्चा होते आणि त्यावर उपाय सुचवले जातात, तेव्हा केवळ
हार्डवेअरच्या अंगानेच विचार केला जातो. आवश्यक पतपुरवठा, योग्य तो भाव मिळणे, शासनाकडून
आर्थिक मदत मिळणे व यासारख्या इतर गोष्टींचा प्रामुख्याने उच्चार होतो. परंतू पूरक
सॉफ्टवेअर तयार होण्याच्या दिशेने उपाय सुचवले जात नाहीत. आधुनिकीकरण, शहरीकरण, उदारीकरण,
जागतिकीकरण इ. प्रक्रियांचा परिणाम म्हणून ग्रामीण, तसेच शहरी समाजातील जुन्या संस्था-
व्यवस्था- रचना संक्रमणाच्या अवस्थेत आहेत. शहरामध्ये या प्रक्रियांचा परिणाम म्हणून
नव्या संस्था- व्यवस्था- रचना जन्म पावतानाही दिसतात, ज्या नव्या बदलांना अनुरूप आहेत.
लाफ्टर क्लब, स्पोर्टस क्लब, रस्सा मंडळ, महिला मंडळ, सकाळी फिरायला जाणाऱ्यांचे मंडळ,
भिशीमंडळ इत्यादींसारख्या गटरचना असोत वा पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दलची वेगवेगळी पुस्तके/ मासिके असोत किंवा ताणतणावांपासून
मुक्ती देणारे आधुनिक बाबा- बुवा असोत, ही त्यांची उदाहरणे म्हणून सांगता येतील. ग्रामसमाजात
मात्र या नव्या संस्था- व्यवस्था- रचना तयार
होण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसत नाही. उलट पारंपारिक शेतीस अनुरूप असे जुने सॉफ्टवेअरसुध्दा
सबंध स्वरूपात उपलब्ध नसल्याची दुर्धर परिस्थिती सध्या ग्रामीण समाजात आहे.
उदाहरणार्थ
पूर्वीचा ग्रामसमाज व्यक्तींच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्याचे कार्यसुध्दा करायचा,
पण आता मनोरंजनविषयक कल्पनांमध्ये बदल झाला आहे. शिवाय त्या पूर्ण करण्याचं कार्यही
पूर्वीच्या संस्था/ व्यवस्था पार पाडत नाहीत.
भांडवली
पध्दतीची शेती करावी की न करावी अशा प्रकारचा प्रश्नच बाद व्हावा अशी सध्याची परिस्थिती
आहे. तेव्हा जे कुणी हा पर्याय वापरू इच्छितात, आर्थिक परिस्थिती नसतानाही तसे धाडस
करू इच्छितात अशांना तसे करताना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांमध्ये सुयोग्य सॉफ्टवेअरचा
अभाव हासुध्दा एक महत्त्वाचा घटक आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तणावप्रसंगी उपयोगाला
येतील अशा आधार-व्यवस्था ( सपोर्ट सिस्टिम्स ) तयार करणे, नवउद्योजकांसाठी शहरांमध्ये
प्रशिक्षणाच्या, मार्गदर्शनाच्या जशा सोयीसुविधा असतात, तशा सोयीसुविधा उपलब्ध करणे,
भांडवली शेतीस आवश्यक असणाऱ्या हिशेबाच्या, खर्चाच्या, बचतीच्या आर्थिक सवयी व्यक्तींमध्ये,
गटांमध्ये विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादींसारख्या उपाययोजनाही शासन किंवा
स्वयंसेवी संस्था यासंदर्भात करू शकतात.
(पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, मार्च २००७)
(पूर्वप्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, मार्च २००७)
खुपच छान लेख....मी स्वतःला या अनुभवातून गेलो आहे. माध्याकडे पुर्ण हार्डवेहर होते. ते वापरायचं कसं याचा अनुभव सुध्दा होता. पण व्यावसायीक दृष्चीकोन नव्हता जो भांडवली शेतिसाठी अत्यंत आवश्यक आहे.
ReplyDeleteत्यामुळे भंडवल उभा करून,आधुनिक शेती करून व उत्तम उत्पादन घेवूनही मी अपयशी ठरलो. माझे काही मित्र अजूनही अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने क्षमता नसतानाही कर्ज काढून भांडवली शेती करत आहेत व अधिकाधीक कर्जामधे डुबून जात आहेत.
धन्यवाद!
ReplyDelete